
ओडिशात शुक्रवारी टाकलेल्या छाप्यानंतर जनतेकडून लुबाडलेला पैसा परत करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर दिला होता. त्यानंतर शनिवारी प्राप्तिकर विभागाने ओडिशातील मद्या उत्पादक कंपन्यांच्या समूहावरील कारवाई तीव्र केली आहे. आयकर अधिकाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत सुमारे रोख २२५ कोटी रुपये जप्त केल्यानंतर शनिवारी बोलांगीर जिल्ह्यातील सुदापारा भागात एका देशी दारू उत्पादकाच्या घरातून रोख रकमेने भरलेल्या २० पिशव्या जप्त केल्या.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुदापारातून जप्त केलेल्या रकमेची मोजणी केली जात असून, ही रक्कम ५० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शुक्रवारी मोजणीसाठी स्टेट बँकेच्या (एसबीआय) बोलंगीर येथील मुख्य शाखेत रोख रक्कम असलेल्या १५६ पिशव्या रक्कम मोजण्यासाठी घेऊन गेले होते. या कारवाईसाठी प्राप्तिकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर गेल्या तीन दिवसांपासून भुवनेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी या छाप्याविषयी आणि अन्य तपशील सांगण्यास नकार दिला. त्यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले, की आमचे सहकारी या संदर्भात काम करत आहेत. सुमारे १५० अधिकारी मद्या उत्पादक कंपन्यांच्या समूहावर छापे टाकत असल्याचे समजते. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्यांदरम्यान विविध ठिकाणांहून जप्त केलेल्या ‘डिजिटल दस्तावेजां’च्या पडताळणीसाठी प्राप्तिकर विभागाने हैदराबादमधील आणखी २० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत