मोबाइल चोरट्यांमुळे रेल्वे प्रवास्याची झाली दुखापत
डेक्कन एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला चोरट्यांनी मोबाइल चोरण्यासाठी ट्रेनमधून खेचल्याची घटना बुधवारी कुर्ला रेल्वे स्थानकात घडली. त्यात प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.
वीराग जगताप (३२) असे या जखमी प्रवाशाचे नाव आहे. ते पुणे येथील राहणारे आहेत. काही कामानिमित्त ते पुण्याहून मुंबईला डेक्कन एक्स्प्रेस या गाडीने येत होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास गाडी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ आली. या वेळी जगताप दरात उभा राहून मोबाइलवर बोलत होते. त्याच वेळी रेल्वे रुळालगत दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातामधील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगताप यांनी प्रतिकार करताच आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढले.
इतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. तेथे गस्त घालणाऱ्या कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाठलाग करून चोरी करणाऱ्या अमित शेख (२८) आणि नूर सय्यद (२७) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी झालेल्या प्रवाशावर उपचार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत