ठाण्यात भाजपला ‘जशासतसे’ उत्तर

शिंदे गटाचा निर्धार, भिवंडी मतदारसंघावर दावा करण्याची तयारी
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण व भिवंडी या तिन्ही जागांवर दावा करत दबावतंत्र अवलंबिणाऱ्या भाजपला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली आहे. बुधवारी दिवसभर पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठका झाल्या. यावेळी भाजपच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून भिवंडी मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे.
महायुतीत मिठाचा खडा पडू नये, यासाठी भाजप नेत्यांच्या जाहीर दबावतंत्राला आतापर्यंत उत्तर देणे शिंदे गटाने टाळले होते. मात्र मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून त्यातूनच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे, भिवंडीसह मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणवरही दावा ठोकला होता. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही गायकवाडांची बाजू उचलून धरली. त्यानंतर गेले काही महिने या प्रकारांकडे दुर्लक्ष करणारे शिंदे गटाचे नेते
बुधवारपासून प्रतिहल्ल्याची रणनीती आखण्यासाठी अचानक सक्रिय झाल्याचे दिसले.
शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या तातडीच्या बैठका बुधवारी आणि गुरुवारी झाल्या. पक्षाचे समन्वयक नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त झाली. कल्याण आणि ठाणे सोडायचे नाहीत, असे यावेळी ठरले. शिवाय भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम, शहापूर, भिवंडी ग्रामीण या भागांत शिवसेनेची मोठी ताकद आहे. जिल्हा परिषद तसेच पंयाचत समित्यांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे, असे सांगत भिवंडीवरही दावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती आहे. अर्थात, शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहीरपणे यावर भाष्य केले नसून जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, हा सूर कायम ठेवला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत