“सरकारचा धाकच राहिला नाही” राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली टिका.

बाळासाहेबांचे विचार घेतल्याचे सांगायचे आणि मराठी भाषेसंदर्भात काहीच करायचे नाही, अशी सरकारची कृती आहे. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्यासाठी शिंदे सरकार कारवाई का करत नाही, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली.
न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याची कार्यवाही होत नसल्यामुळे मनसेकडून खळ्ळखट्याक भूमिका घेण्यात आली आहे. पाषाण येथील मनसे कार्यकर्त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मनसेकडून मुंबई, ठाणे शहरातील दुकानांची इंग्रजीतील नावे हटवण्यात आली आहेत. यासंदर्भात राज यांच्याकडे विचारणा केली असता सरकारची यासंदर्भात बोलघेवडी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार अनेक मुद्द्यांवर केवळ तोंड वाजवित आहे. बाळासाहेबांचे विचार घेतल्याचे सांगायचे आणि मराठी भाषेसाठी काहीच करायचे नाही, असे सरकारचे धोरण आहे. मशिदीवरील भोंगेही सरकारला काढता आले नाहीत. काही झाले की बाळासाहेबांचे विचार-बाळासाहेबांचे विचार करायचे आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणायचे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही कार्यवाही होत नसेल तर सरकारचा धाक राहिला नाही असे दिसते, अशी टीका राज यांनी केली.
राज्यातील वाढती गुंडगिरी, अमली पदार्थांची विक्री संदर्भात पोलिसांना चोवीस तासांची मोकळीक दिली तर ते असले सर्व प्रकार मोडीत काढतील. अमली पदार्थ तस्करीमागे कोण आहे, त्यासाठी पैसा कोठून येतो, याचा शोध घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत