मुख्य पान

शेतकऱ्यांच्या मरण यातनास,आजचे स्वयंघोषित कृषीपुत्र नेत्यांचा ब्राह्मण्यग्रस्त विचारच कारणीभूत !

काया पूरती लंगोटी,फिरती नांगराचे पाटी !
एक घोंगड्या वाचुनी, स्त्रिया नसे दुजे शयनी
ढोरा मागे सर्वकाळ,पोरं फिरती रानोमाळ
ताक कन्या पोटभरी,धन्य म्हणे संसारी
सरकारी पट्टी नेट,पडे तीन शेंड्या गाठ
कर्ज रोखे लिहिले आठ,निर्दय मारवाडी काट
अज्ञान्याला समजत नाही,कुलकर्ण्याने लिहिले काही
वकिलाची महागाई,न्यायाधीशा दया नाही
पाप पुण्य जेथे नाही,पैशापुरते दादाभाई

  • म.ज्योतिबा फुले

राष्ट्रपिता,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारी कार्यास विनम्र अभिवादन ! महात्मा ज्योतिराव फुले यांनी 18 व्या शतकामध्ये हजारो वर्षापासून सामाजिक,धार्मिक, राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक गुलामीच्या जोखडात असलेल्या स्पर्श हिंदू गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा आलूतेदारांच्या अनेक जाती असो किंवा जनावरासारखा जीवन जगणारा अस्पृश्य समाज असेल, यांच्या “कल्याणाचा” विचार मांडत असताना या देशातील ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादावर प्रचंड मोठे हल्ले शेतकऱ्यांचा आसूड,गुलामगिरी सारख्या महत्त्वपूर्ण क्रांतिकारी ग्रंथातून करत या देशांमध्ये “सामाजिक समता” प्रस्थापित करण्याचा मोठा यशस्वी प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी या देशांमध्ये सर्वप्रथम विशेष प्रतिनिधित्वाची गरज ब्रिटिश अधिकाऱ्यांना पटवून देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हंटर कमिशनला आपले लेखी निवेदन गोरगरीब शेतकऱ्याच्या वेशातच जाऊन दिले.त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथल्या गोर-गरीब शेतकरी आणि अस्पृश्यांच्या “कल्याणाचा” विचार मांडला आणि त्यांच्यासाठी खास अशा काही सवलती करण्यात याव्यात अशी शिफारस केली,खरंतर महात्मा फुले यांच्या या प्रक्रियेस आपण आरक्षणाची किंवा विशेष प्रतिनिधित्वाच्या तरतुदीची सुरुवात सुद्धा म्हणू शकतो.

महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 18 जुलै 1883 रोजी,पूर्ण केला.10 डिसेंबर 1882 ला महात्मा फुले यांनी मुंबई शेतकऱ्यांची स्थिती यावर व्याख्यान दिले होते.1875 मध्ये पुणे परिसरात शेतकऱ्यांनी सावकाराविरुद्ध व जमीनदार होता विरुद्ध आंदोलन केले त्याचे नेतृत्व महात्मा फुले यांनी केले होते.ज्योतिबा फुले यांच्याच अथक प्रयत्नातून चर्चा होऊनच “डेक्कन एग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट” हा कायदा पास झाला होता.महात्मा ज्योतिबा यांनी यशस्वी केलेले हे देशातील पहिले शेतकरी आंदोलन होते.महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या अवनीतीचे कारण ब्राह्मणाच्या धर्मात शोधले,त्याचे अत्यंत सत्य वर्णन आसुडात केले आहे.खरचं किती किती निरीक्षण व कळवळा फुल्यांना शेतकऱ्या विषयी होता,याची प्रचिती शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातून येते. शेतकऱ्यांचे दुःख वर्णन करताना त्यांची लेखणी शेतकऱ्यांप्रती अत्यंत भावुक आणि ब्राह्मणासंबंधी विद्रोही होत तितक्याच ताकदीने ब्राह्मण ब्राह्मण्यवादावर आसूड ओढते. शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्मकांड आणि अंधश्रद्धा जोपासत वागतो,याला ब्राह्मणाचा धर्म धर्मकारणीभूत आहे.ब्राह्मणांनो तुम्ही शेतकऱ्यांची लूट थांबवा,असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्याचा आसूड मध्ये देतात. तर धर्माच्या माध्यमातून लादलेली गुलामी धर्म विध्वंसातूनच नष्ट केली पाहिजे,असे महात्मा ज्योतिबा फुलांचे स्पष्ट मत होते. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात महात्मा फुले म्हणतात की, “तुम्ही आपल्या सर्व बनावट पोथ्या जाऊन टाका माळी कुणबी धनगर वगैरे शेतकऱ्यास खोटे उपदेश करून आपली पोटे जाऊ नका” !

वास्तविक पाहता गावगाड्यातील स्पर्श हिंदूच असलेल्या केवळ ब्राह्मणासारखे एकेरी धोतर नेसल्याबद्दल शूद्र शेतकऱ्यांसह शिंपी वगैरे जातीच्या लोकांना ब्राह्मणांनी जिवानिशी मारण्याच्या शिक्षा दिल्या. ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मण म्हणतात की हल्लीचे भट ब्राह्मण शेतकऱ्यांच्या विष्टा खाणाऱ्या गायांचे मूत्रास पवित्र तीर्थ मानून त्यांच्या सेवनाने शुद्ध होतात,आणि तेच भट ब्राह्मण आपल्या मालकीच्या धर्माच्या ही हिमायतीने शूद्र शेतकऱ्यास “नीच” मानतात.यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी होऊ शकेल का ? असा महत्त्वाचा प्रश्न महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात निर्माण करतात.

आज ही सामाजिक,राजकीय,
धार्मिक, आर्थिक,न्यायिक व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात वर्तमानात विविध साधन व माध्यमातून बंधने लादुन ब्राह्मण्यग्रस्त विचार शेतकऱ्यास संपवित आहे. तर विज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यात अंधश्रद्धा पसरवून आपले आसान बळकट ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात.आजच्या शेतकऱ्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूडातील “मुक्तिवाद” आजच्या शेतकऱ्यांनी आचरणात आणायची नितांत गरज आहे.शेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मण्यवादाच्या विचाराने ग्रस्त असलेल्या नेत्यांकडून मदतीच्या अपेक्षा केल्या तर,जग बुडाले तरी ब्राह्मण ब्राह्मण व ब्राह्मण्य वादानेग्रस्त असलेले नेते आपल्याला मदत करणार नाही.याची खात्री बाळगूनच शेतकऱ्यांनी आता आपल्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी समोर आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आसूडात महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुचवलेले अत्यंत महत्त्वाचे उपाय अमलात आणण्याची गरज आजच्या काळामध्ये आहे. आज ही शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करून त्यांना सर्व साधने मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो नाहीत,याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची कार्यपद्धती व ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादाचा शेतकऱ्यावर असलेला प्रभाव हा आहे.त्याचबरोबर आज राज्य आणि देशात शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे,स्वतःला कृषी पुत्र म्हणणारे नेते सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत,जे याच ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादाच्या विचाराचे “हस्तक” आहेत.त्याच बरोबर हे सर्व प्रस्थापित नेते मंडळी शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार ब्राह्मण्यग्रस्त मानसिकतेतून करत असल्यामुळेच आज शेतकऱ्याची वाईट स्थिती दिसून येत आहे.ही गंभीर आणि वास्तविक परिस्थिती कोणी ही नाकारू शकत नाही.कारण आपण पाहत आहोत की,सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपायोजना आणि वास्तवात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या “आत्महत्या” या परिस्थितीकडे आपण पहिल्यास लक्षात येईल की,राज्यातील कुणबी शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करणारे नेते हे ब्राह्मण्यग्रस्त आहेत.हे वास्तविक सत्य आता खुद्द शेतकऱ्यांनीच लक्षात घेतले पाहिजे.

गाव कुसाच्या गाव-गाड्यांमध्ये “स्पृश्य हिंदूच” राहून सामाजिक, आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक गुलामगिरी केलेल्या आजच्या नेत्यांना आणि तथाकथित स्वयंघोषित समाज सुधारकांनी, शेतकरी नेत्यांनी,आमदाराने खासदार,मंत्र्यांनी,भाडोत्री साहित्यिक आणि लेखकांनी थोडा विचार करायला पाहिजे की,महात्मा फुले नसते तर आपलं काय झालं असतं ? गावकुसातील गाव गाड्यांमध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादी विचार ग्रंथांनी ठरवून दिलेल्या “चौकटीतच” आपलं काम करावं लागत होतं. मग ते काम चांगले असो किंवा वाईट असो.हा इतिहास आपण विसरलात काय ? कधी वेळ मिळाला तर गावगाड्यातील ती चौकट काय होती ? तिथं व्यक्तिमत्व विकास आणि बुद्धीप्रामान्यवादाला संधी (विशेष प्रतिनिधित्व) होते का ? ती चौकट कशी होती ? याचं आणि संविधानाने मिळालेले हक्क व अधिकारातून कोणते परिवर्तन झाले, याचे चिंतन,मनन करण्यासाठी तुमच्या आत्ताच्या ही जीवनातील कर्मकांड आणि अंधश्रद्धेचे,जातीय मिथ्या अभिमानाचे ओंगळवाणे ओझे थोडे बाजूला करून पहा म्हणजे लक्षात येईल की,काय आपल्याला शिक्षणाचा,नोकरीचा आणि वेग-वेगळे उद्योग व्यवसाय करण्याचा अधिकार होता का ? आमदार आणि खासदार होण्याचा तर विचारच सोडून द्या ? आज आपल्या जीवनामध्ये जे अमुलाग्र बदल झालेले आहेत ते फक्त आणि फक्त ज्योतिबा फुले आणि 19 व्या शतकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे झाले आहेत.ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

विजया अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
भिमनगर (नागेश नगरी) उस्मानाबाद.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!