राज्यशासनाने पदे भरण्यासाठी एमपीएससी कडे सादर केले मागणीपत्र

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) विविध विभागांतील २२ हजार ५८९ पदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर केले आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये सुमारे २ लाख ४० हजार पदे रिक्त आहेत. राज्य शासनाचे एकूण ३१ मुख्य विभाग आहेत. या विभागांनी नोकरभरतीसाठी एमपीएससीकडे मागणीपत्रे सादर करण्यास सुरुवात केली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ३१ विभागांनी २२,५८९ पदांची भरती करण्यासाठी मागणीपत्रे सादर केली आहेत. त्यात गट अ-४ हजार, गट ब-५ हजार ५०३ आणि गट क संवर्गातील १३ हजार ८६ पदांचा समावेश आहे. त्यापैकी आता पर्यंत २१ हजार ४८२ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांमध्ये नऊ हजार अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तसेच राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांनी रिक्त जागा भरण्याचा रेटा लावल्यामुळे पुढील काळात मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकरभरती केली जाणार आहे. त्यानुसार विविध विभागांच्या स्तरावर वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत