प्रेम आणि हिंसा भाग – ३. -अशोक सवाई.

सुरक्षेच्या दृष्टीने अजून काही महत्त्वाच्या टिप्स.
१) खेड्यापाड्यातील आयांनी सुचवलेला सर्वात सोपा व बिनखर्चाचा उपाय म्हणजे मिरची पावडर पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे सारखा उपयोग करणे. आडमार्गाने किंवा जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी मुली या स्प्रेचा उपयोग करून अडचणीत आपली सुटका करून घेवू शकतात. नंतर घरी घडलेला प्रकार सांगून पालक पोलीस ठाण्यात तक्रार देवू शकतात.
२) स्व रक्षणासाठी मुलींनी कराटे सारखे प्रशिक्षण जरूर घ्यावे.
३) आपल्या मोबाईल मध्ये घरच्यांचा फोन नंबर सहित, सर्व सुरक्षा यंत्रणेचे नंबर, आपल्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाचा नंबर, जवळच्या पोलीस स्टेशन मधील महिला अधिकारी व कर्मचारी, आपल्या वार्ड/ प्रभागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, तसेच जिवाभावाच्या मैत्रीणींचे नंबर सेव करून ठेवावे. तसेच एका छोट्या डायरीत हे सर्व नंबर नोंदवून ती डायरी पर्स च्या चोरकप्प्यात ठेवावी.
४) आय टी इंडस्ट्रीज क्षेत्रातील महिलांनी/मुलींनी पिक्अप व्हॅन मध्ये एकटे असल्यास घरच्यांशी घर येईपर्यंत सतत बोलत राहावे. तसेच व्हॅन नेहमीच्या रस्त्यावरून धावत आहे की नाही याची वेळोवेळी खात्री करून घ्यावी.
५) आपल्या आईपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. तिच्यासारखी जिवाभावाची व तुमच्यावर प्रेम करणारी मैत्रीण या जगात दुसरी नाही. तुमचं कुणावर प्रेम असल्यास व प्रेमविवाह करण्याची इच्छा असल्यास आपल्या जोडीदाराची व त्याच्या घरच्यांची पूर्ण माहिती आईला द्यावी. आई वडीलांच्या सल्ल्याने योग्य विचार करून योग्य निर्णय आपल्याच बाजूने देईल याची खात्री बाळगावी.
६) आपली खाजगी माहिती व आर्थिक व्यवहाराची माहिती कुणालाच देवू नये अगदी आपला प्रियकर जरी असला तरी लग्न होईपर्यंत तरी वरील माहिती देवू नये स्वतःबद्दल फक्त जुजबी माहिती द्यावी. यावरून तुम्हाला कळेल की तो तुमच्यावर खरोखर प्रेम करतो की नाही.
७) मित्र मैत्रिणींच्या एकांतातील पार्टीला वडीलांच्या कडक शिस्तीचा बडगा दाखवून शक्यतोवर जाण्याचे टाळावे. पार्टीत येणारे सर्वच लोक चांगल्या मनाचे असतील असं म्हणता येणार नाही. जायचे असल्यास आपल्या आईवडिलांना पूर्ण कल्पना द्यावी व आपण ठरलेल्या वेळेतच घरी येवू याची खात्री आईला देवून त्याच वेळी घरी परतावे. तसेच आपल्या सुरक्षेचा पूर्ण आढावा घेवूनच घरातून निघावे व घरी येईपर्यंत गाफील राहू नये.
८) दुचाकीवरून कुठेही जायचे असल्यास दुचाकीच्या ठाकठिकीचा आढावा घ्यावा. व जुजबी तांत्रिक माहिती करून घ्यावी.
९) सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही बाबा टाबा, बापू टापू, अम्मा टम्मा यांच्या सावलीला ही उभं राहू नये. अगदी आईला ही विरोध करावा तिलाही बाबा जवळ जाण्यापासून रोखावे. एक गोष्ट लक्षात घ्यावी. या जगात भगवान गौतम बुद्धाशिवाय कुणीही घोर ज्ञान साधना केली नाही. तरीही त्यांनी चमत्काराला नकार देऊन विज्ञानाचा स्विकार केला. तेव्हा कोणत्याही बाबा टाबाच्या नादी लागू नये. बाबा लोक रासायनिक द्रव्याचा वापर करून हातचलाखी करतात. व चमत्कार करत असल्याचे सांगतात. या जगात चमत्कार नावाची कोणतीही चीज नाही हे आपल्या मनात पक्के ठसवून घ्यावे. कार्यकारण भाव असल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते. हे नेहमी लक्षात ठेवावे.
१०) महत्त्वाचे म्हणजे दररोज वाचनासाठी कमीतकमी तासभर द्यावा. वाचनामुळे तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव समोरच्यावर पडतो. बोलण्यातून त्याला अर्धी मात देवू शकता. दररोजचे वर्तमान पत्र जरूर वाचत जावे त्यातून जगातल्या घडामोडी समजतात. व आपल्या अनुभवाची शिदोरी वाढत राहते.
मुलींनो तुम्ही सर्व दृष्टीने आत्मनिर्भर व्हा. मग तुम्हाला कोणाच्याही मदतीची अपेक्षा किंवा गरज राहणार नाही. तुम्ही तुमच्या जयमतीवर स्वतःच्या हिंमतीवर स्वतःची लढाई स्वतःच लढू शकाल. अन् जिंकूही शकाल. नाही तर ज्याच्यामागे लपायला जाल तोच तुम्हाला कापायला निघेल अशी आजची परिस्थिती आहे. हे लक्षात ठेवा. वडीलधारी या नात्याने अन् तुमच्या काळजीपोटी तुमच्या हिताच्या चार गोष्टी सांगितल्या. मग पुढे त्यावर अंमल करणे न करणे हे तुमचं काम आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत