
लेखक – सुरेश भवर मो. नंबर – ९९७०६२३७४५
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समिती मध्ये भाषण करतांना काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ते मुद्दे आज ही अनिर्णीत आहे. त्याची उकल आजतागायत होऊ शकली नाही. देशहिताच्या दृष्टीने उपस्थीत केलेले मुहे हे फार महत्वाचे आहेत व त्याची अंमलबजावणी व निर्णय लावणे आवश्यक आहे. त्या मुद्द्यांच्या दृष्टीने आज प्रजासत्ताक भारत खरेच त्या प्रमाणे टाटचाल करीत आहे का? ह्या ६५ व्या प्रजासत्ताक दिनी आवलोकन केले पाहीजे. प्रथम आपण कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते बघु.)
बाबासाहेब म्हणतात,
‘चांगल्या राज्यघटनेबद्दल सर्व सभासदांनी तज्ञांनी, जेष्ठ नेत्यांनी माझ्यावर स्तुति सुपनांचा वर्षाव केला असला तरी मला हे नमूद केलेच पाहिजे की, देशाची घटना चांगली वाईट हा मुद्दा गौण आहे. परंतु घटनेमधील तरतुदींवर अंमल करणे हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. चांगल्या घटनेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली नाही तर ही घटना चांगली असूनही वाईट ठरु शकते. उलटपक्षी घटनेतील तरतुदींचा काटेकोरपणे अंमल झाल्यास सर्वसाधारण घटनाही चांगली ठरू शकते. ते पुढे म्हणाले की भविष्यात भारतीय लोक या घटनेचा किती अंमल करतात द कसा अंगल करतात त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. माझे मन आज चिंताग्रस्त आहे, २६ जानेवारी १९५० रोजी आपण प्रजासत्ताक राज्यात प्रवेश करणार आहोत. आपले हे प्रजासत्ताक राज्य आपण टिकवू शकणार आहोत काया की निजलेले स्वातंत्र्य पुन्हा गमविणार आहोत ? ही कटू वस्तुस्थिती नाकारून चालावयाची नाही. आपण आपले स्वातंत्र्य गमावले त्याला आपल्या भारतीयांची प्रतारणा आणि देश द्रोह काही अंगी कारणीभूत होता. आणि म्हणून माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की भारतीय घटनेचा अंमल करतांना जात, धर्म, पंथ, प्रदेश ही कवचे मोडीत काढून देशहीत व सामाजिक हिताकरीता भारतीय पुढे येतील काय? किंवा या भेदाभेदीच्या बंधनातच अडकून राहतील?
संसदीय लोकशाही भारताला नवी नाही ती अत्यंत प्राचीन आहे. भगवान बुद्धांच्या कालखंडात बौद्ध भिक्कु संघाची कार्यपद्धती संसदीय लोकशाहीचा नमुना होता. बौद्ध संघाचे नीती, नियम, प्रस्ताव, ठराव, प्रतोद, मतदान पद्धती इत्यादी बाबी संसदीय लोकशाहीचे नमुनेच होत. बौद्ध सम्राटांनी सुद्धा काही अंशी ह्या पद्धतीचा अवलंब केला होता म्हणून त्यांच्या राज्यात सुवत्ता आणि शांतता नांदत होती. दुर्देवाने ही संसदीय लोकशीही पद्धती आपण काही काळाकरिता गमावली याचे कारण जातीभेद, धर्मभेद, पंथभेद, प्रांतभेद, भाषाभेद अश्या अनेक भेदाभेदातून आपण परकीयांसमोर नांगी टाकून आपले स्वातंत्र्य गमावले आहे.
डॉ. बाबासाहेब म्हणतात २६ जानेवारी १९५० च्या प्रजासत्ताकदिनी आपण राजकारणात एक व्यक्ती व एकच मुल्य हे तत्व स्विकारणार आहोत परंतु आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या विषम आर्थिक व सामाजिक रचनेमुळे “एक व्यक्ती एक मूल्य’ हे तत्व आपण नाकारत राहू याचे कारण वर्ण व्यवस्था, जातीय व्यवस्था, विषम अर्थ व्यवस्था उच्च जातीतील मनुष्य श्रेष्ठ आणि कनिष्ठ जाती मधील मनुष्य नीच ही असमानता आपण कशी दूर करणार? विद्यामान अर्थव्यवस्थेत मुठभर लोक अत्यंत धनाढ्य आहेत, तर देशातील बहुसंख्य लोक आपार दारिद्र्धात जीवन जगत आहेत. ही विषमता आपण कशी दूर करणार? आपल्याला राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे. देशामध्ये सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि न्याय भाताचे तत्व स्विकारले पाहिजे. परंतु दुर्दैवाने आजही स्वातंत्र्य समता व बंधुत्व या त्रयी एकत्र व एकोप्याने नांदतांना आढळत नाही. आपण वरील विसंगती दूर केली पाहीजे नाहीतर विषमग्रस्त आणि त्रस्त असलेले लोक हा राजकीय लोकशाहीचा महाल उद्धवस्थ करून टाकतील. असा इशाराही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे.
आज आपला भारत देश प्रजासत्ताक म्हणून ६८ व्या वर्धत पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्य पूर्व काळातील व प्रजासत्ताक पूर्व काळातील अंतिम पिढीतील स्वातंत्र्याचा खरा साधक, असेल तर निश्चित रुपाने त्यांच्या डोळ्यातून दीनवाणे अश्रू ओघळत असतील. कारण जनतेला असे वाटत होते कि प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर परत भारत देश सुवर्णमय व दिव्यरूप होईल. पण आज आपण बघत आहोत, मुठभर लोक श्रीमंत झालेले आहेत, विकासाची गंगा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या भागात, लोकांत वाहते आहे. जे स्वप्न आमच्या शहीदांनी स्वातंत्र्य योध्यांनी स्वातंत्र्य प्रेमी जनतेने बघीतले होते. शासक जनसेवक बनतील व समानता निर्माण होऊन शासन सर्वसामान्य जनतेचे असेल व सामान्य जनतेने चालवलेले असेल. कित्येक हर्गापासून साम्राज्यशाहीवाल्यांनी भारतातील जनतेचे चालविलेले शोषणाचे व दमनाचे क्रूर चक्र समाप्त होईल, परंतु हे दुष्टचक्र बनुन अधिकच गतिमान झाले आहे. सामाजिक व आर्थिक जिवनाचा अधोगतीचा आलेख वाढत आहे.
कधी काळी “हम हिंदूस्थानी एक हैं” ची आरोळी देत सर्व जगाला भारतीय एकात्मतेची ग्वाही देत होतो. पण आजच्या परिस्थितीत जाती, धर्म, वंश, संप्रदाय व अंधश्रद्धा हे राक्षस बनून भारत देशाला मानसिक गुलामी व विघटनाच्या बेड्यांनी जखडत आहे. सामाजिक, राजनैतिक व आर्थिक शोषणाने सामान्य जनता गरीबी व दारिद्र्याच्या खाईत लोटली जात आहे. बहुसंख्य भारतीय रोजी रोटी साठी मोताद बनत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम शोधणारा, भटकणारा तरुण युवक निराशा व हताश होऊन शेवटी काहीकालावधीनंतर गुन्हेगारीकडे वळला आहे. अमिषाला कारवायांना बळी पडून तो नकळत देशद्रोही बनतो आहे. भारताचा खरा आधार शेतकरी व शेतमजूर रोज दारिद्र्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. भारतीय स्त्री कधी इतकी भितीग्रस्त, क्षतीग्रस्त नव्हती ती या प्रजासत्ताकात आहे कारण याला राजकीय नेतेच कारणीभूत आहेत मग ते सत्ताधारी असो की विरोधी.
ह्या भारताचे दुसरे रुप गगनचुंबी व प्रशस्त महालात दिसून येत आहे. या भव्य दिव्य इमारतीत, आधुनिक राजवाड्यात स्वार्थी राजकारणाचे, मतलबी शासनाचे, काळ्या बाजाराचे, भ्रष्टाचाराचे तसेच देशद्रोही डाव रचले जातात. कॅबरे डान्सबार, रंगीत संगीत ओल्या पाठ्यर्त्यांचे रंग उधळले जातात. खुर्चीचा खेळ येथे रंगला जातो. २० टक्के निधी योजनांसाठी वापरायचा व ८० टक्के निधी अधिकारी, राजकीय सत्ताधारी व विरोधी नेते यांनी निधी कसा फस्त करायचा याची गणिते येथेच सोडवलेली जातात. त्याच्या जोडीला असते मदीरा व गरजू नागवलेली अबला.
किती हे लोकशाहीचे विडंबन आहे. भारतीय समानतेची व लोकसत्ताक राष्ट्राची प्रजातंत्राची जीवनयात्रा या लोकनेत्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्देशहीन बनवली आहे व होत आहे.
आज अतिरेकी, स्मगलर्स, फुटीरवादी, जातीयवादी, कुटील राजकारणी, भ्रष्ट शासक, भारतीय स्वातंत्र्य धोक्यात आणीत आहेत. देशाच्या धुरिणांना शहीदांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची त्यागाची थोडी जरी लाज वाटली, महान द्रष्ट्या प्रजासत्ताक घटनेच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण झाली तरी भारताच्या सुवर्ण युगाचा मार्ग सापडेल.
जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती है बसेरा । वी भारत देश है मेरा !!
ह्या गीताचे सार्थक करावयाचे असल्यास आजच्या राजकीय कर्णधारांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे मगच राज्यकारभार करावा. नाही तर कधी तरी ऐकावेच लागेल,
जब एक ही उल्लू काफी था, बरबाद गुलिस्ता करने कौ, अब हर शाख पे उल्लू बैठे है, अन्जाम गुलिस्ता क्या होगा।
लेखक: सुरेश भवर समतानगर, सातपूर कॉलनी, नाशिक-४२२००७ मो. नंबर ९९७०६२३७४५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत