
बुद्धा!
आज तू सुध्दा हवा होतास माझ्या सोबतीला
तुझ्या हाताला धरून तुला फिरवून दाखवल्या असत्या
तुला केंद्रित ठेवून दगडात खोदलेल्या लेण्या
अजिंठा… वेरूळ… बेडसे…भाजे नि कार्ला सुद्धा
तुझी निरागस करूणा तुझ्या दगडी हास्यतही मला दिसते रे
परंतु मला करूणा दिसत नाही असंख्य मानवी मांसाल ओठांत
तेव्हा मला गरगरायला होतं
काय अशी प्रतिक्रिया झाली
या पृथ्वीवर भटकणाऱ्या मानवी मनातल्या विकृतीत
जोपर्यंत तुझ्या लेण्यांचं संरक्षण निसर्गावर सोपवलं होतं
तोवर तुझ्या साऱ्या लेण्या सुरक्षित होत्या.
निसर्गाने जपल्या त्या छातीशी घट्ट कवटाळून
जेव्हा दिसल्या त्या विकृत मानवी हातांना
तेव्हा त्यांनी नासधूस नि विद्रुपही केल्या लेण्यांना
बुद्धा!
तुला या पृथ्वीवरून मिटवणे आज असंख्य हातांनाही शक्य नाही रे
तू सामावलेला आहेस
तू साठलेला आहेस
या पृथ्वीच्या अणूरेणुंच्या कणाकणांत
त्या प्रत्येक अणूरेणूत जेव्हा न्युट्रॉन प्रोटांच्या टकरा होतात ना
तेव्हा त्यांचं संक्रमण तुला टाळून
तुला वगळून होत नाही
बुद्धा!
तू सुद्धा पाहिलीच असशील की रे
तुझी प्रज्ञा… तुझी करुणा… तुझी समाधी… तुझ्या हयातीत
आज दिसते आम्हाला
तुझी प्रज्ञा… तुझी करुणा.. तुझ्याच भूमीच्या मातीत
बुद्धा,
तुझं त्रिरत्न
तुझं चातारी आर्य सत्य
तुझं पंचशील
तुझं अष्टशील
तुझं दसशील
तुझा प्रतित्यसमुत्पाद तुझा सापेक्षतावाद
तुझे चौऱ्याऐंशी हजार उपदेश
मी पाहतोय लेण्यांमधील प्रत्येक दगडांच्या कणाकणात
तुझ्या बोधिसत्वाच्या पाचशे सत्तेचाळीस जातक कथा
तू सांगितलेले तीनशे नव्वद मानवी स्वभाव
मी पाहतो आहे…
मी पाहतो आहे…
मी पाहतो आहे…
सर्व प्रियजनांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा…!
संतोष रामचंद्र जाधव परिस्पर्श स्वप्नोत्सव शहापूर ठाणे 7507015488
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत