कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल.

शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले आहे.
पहिला पुरावा – महसुली दस्तऐवज : खासरा पत्रक, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, पाहणी पत्रक, नमुना नंबर एक हक्क नोंद पत्रक, क पत्रक, नमुना नंबर दोन हक्क नोंद पत्रक, कुळ नोंदवही, सातबारा उतारा यांसारख्या महत्त्वाच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हा पुरावा ग्राह्य धरला जाईल.
दुसरा पुरावा – जन्म व मृत्यू रजिस्टर : रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म व मृत्यू झालेल्या गावातील संबंधित तहसीलमध्ये अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुक नक्कल मध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
तिसरा पुरावा – शैक्षणिक दस्तऐवज : रक्त संबंधामधील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
चौथा पुरावा – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दस्तऐवज : अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा देखील पुरावा प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
पाचवा पुरावा – कारागृह विभागाचे दस्तऐवज : रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिजनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हे दस्तऐवज देखील प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
सहावा पुरावा – पोलीस विभागाचे दस्तऐवज : गाववारी, गोपनीय रजिस्टर सी एक आणि सी दोन, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे आणि एफ आय आर रजिस्टर यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जातील.
सातवा पुरावा – सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिट्ठी, ठोकपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक तसेच या विभागातील इतरही अन्य जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत त्यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी वैध घरातील.
आठवा पुरावा – भूमी अभिलेख विभागाकडील महत्त्वाचे दस्तऐवज – पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रति बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक यामध्ये जर नोंद असेल तर हा पुरावा देखील यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
नववा पुरावा – जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : माजी सैनिकांच्या नोंदीमध्ये कुणबी नोंद आढळल्यास हा पुरावा देखील हे प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी ग्राह्य धरले जाणार आहे.
दहावा पुरावा – जिल्हा वक्फ अधिकारी : यांच्याकडील मुंतखब या कागदपत्रात जर कुणबी नोंद असेल तर हा देखील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
अकरावा पुरावा – शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील रेकॉर्ड : यामध्ये रक्त संबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्विस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. परंतु हे रेकॉर्ड 1967 पूर्वीचे असणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे.
बारावा पुरावा – जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तऐवज : जर रक्तसंबंधांमधील नातेवाईकाचे आधीच कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत