धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज.

६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. पंचशील ध्वजांनी सजलेल्या दीक्षाभूमीवर शुक्रवारपासून अनुयायांचे आगमन सुरू झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली लाखो लोकांसोबत येथेच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्याची आठवण म्हणून लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर येतात. यंदा शुक्रवारपासूनच दीक्षाभूमी परिसरात गर्दी वाढायला लागली आहे.
शनिवार २१ ऑक्टोबरपासून दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी मुख्य सोहळा पार पडणार असून रविवारपासून भदंत आर्य सुरई ससाई यांच्यामार्फत रोज बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाईल. २३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता दीक्षाभूमी परिसरात पंचशील ध्वजारोहण समारंभ पार पडेल. सोमवारी दिवसभर धम्मपरिषदही आयोजित केली जाणार आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता धम्म पहाट होईल.
धम्मदीक्षा सोहळ्याची सुरुवात शनिवारी महिला मेळाव्याने करण्यात येईल. राज्याच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महिला मेळाव्याचे उद्घाटन पार पडेल. यावेळी ‘प्रॉब्लम ऑफ रूपी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीची फलश्रुती’, ‘भारतात स्त्रियांच्या अत्याचाराचा कळस’, ‘आंदोलनात महिलांची भूमिका’ आदी विषयांवर चर्चासत्र पार पडतील. महिला मेळाव्यानंतर संविधानाचा जागर हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. याशिवाय ‘गटार’ या नाटकाचेही सादरीकरण होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात श्रीलंकेचे रेव्ह.डब्ल्यू. धम्मरत्न थेरो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. थायलंडच्या डॉ. अफिनिता चाई चाना यांचीही यावेळी उपस्थिती राहील. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई असतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत