बाबासाहेबांची धम्मक्रांती – प्रा.डी.डी.मस्के
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही एकाकी घडलेली घटना नाही. धर्मांतराची ही कृती विचारपूर्वक करण्यात आलेली होती.ज्या धर्मात तुम्हाला प्रतिष्ठा नाही, स्वाभिमान व विकासाला संधी नाही म्हणून विज्ञानवादी असलेला बौध्द धर्म स्विकारुन मानवमुक्तीसाठी क्रांती घडवून आणली असे विचार प्रा.डी.डी. मस्के यांनी व्यक्त केले.ते अणदूर ता. तुळजापूर येथे 67 वा धम्मचक प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक सिध्दार्थ जाधव होते. या कार्यक्रमात प्रा.मस्के यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरांची टप्पे विषद केली.
एक,- 1907 ला बाबासाहेब मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले.म्हणून त्यांचा सत्कार जानेवारी 1908 मध्ये करण्यात आला त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळूसकर गुरुजींनी बाबासाहेबांना त्यांनी लिहीलेले “बुध्द चरित्र” भेट दिले. “बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, केळूसकर गुरुजींच्या पुस्तकाच्या प्रभावाने मी बुध्द धर्माकडे वळलो.
दोन,- 10 मे 1924 रोजी बार्शी येथे घेतलेल्या परिषदेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 33 व्या वर्षी अत्यंत महत्त्वपूर्ण असे ,” देशांतर नामांतर की धर्मांतर” हे भाषण केले. स्वाभिमान जपण्यासाठी हे तीन पर्याय दिले.
तीन,- सप्टेंबर 1933 मध्ये सुभेदार विश्वास गंगाराम यांना लिहीलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की, माझा कल बौध्द धर्माकडे आहे.
चार,- 1934 ला दादर मुंबई येथे बांधलेल्या बंगल्याला “राजगृह” असे नाव देतात.
पाच,- 13.ऑक्टोबर 1935 रोजी येवले येथे “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही.” म्हणजेच बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली.
सहा,- 08 जुलै 1945 रोजी मुंबई येथे “पिपल्स एज्युकेशन सोसायटीची” स्थापना करुन तिला,”प्रज्ञा शिल करुणा” हे ब्रीद वाक्य दिले.
सात,- जुन 1946 रोजी सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना करुन “बुध्द भवन” व “आनंद भवन” अशी दोन सभागृहाचे नामकरण केले.
आठ,- 02 मे 1950 रोजी दिल्लीत प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बुध्द जयंती साजरी केली. बाबासाहेब म्हणतात की, बुध्द धर्म हा नीतीधर्म आहे.
नऊ,- जून 1950 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे जागतिक प्रतिनीधीसमोर बाबासाहेबांचे,”भारतातील बुध्द धम्माचा उदय आणि ऱ्हास ” या विषयावर भाषण झाले.
दहा,- जूलै 1951 बाबासाहेबांनी भारतीय बौध्द संघाची स्थापना केली व “बौध्द उपासना पाठ” ही पुस्तिका प्रकाशित केली.
अकरा,- नोव्हेंबर 1951 ला “बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाच्या लेखनाला प्रारंभ.फेब्रुवारी 1956 ला ग्रंथात पूर्ण झाला त्याच्या 80 प्रती अभिप्रायार्थ विद्वानांला पाठवल्या.
बारा,- मे 1954 ब्रह्मदेशातील रंगून येथील बुध्द जयंती कार्यक्रमास उपस्थित राहीले.
तेरा,- 1954 ला बाबासाहेबांनी ,”दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” ची स्थापना केली.04 मे 1955 ला त्याचे रजिस्ट्रेशन केले.धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळाली.
चौदा,- 25 डिसेंबर 1954 रोजी देहूरोड येथे बाबासाहेबांच्या हस्ते बुध्द मूर्तीची विहारात स्थापना केली.
पंधरा,- 1956 ला “जनता” वृत्तपत्राचे नामकरण “प्रबुध्द भारत” करण्यात आले.
सोळा,- धर्मांतराची घोषणा केल्यापासून बरोबर 21 वर्षांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयांयासह नागपूर येथे धर्मांतर केले तो दिवस धम्मचक प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी संयोजक आर.एस.गायकवाड,फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे धाराशीव (उस्मानाबाद) जिल्हा समन्वयक कैलास गवळी सर,नळदूर्गचे कार्यकर्ते किशोर बनसोडे, शासनमान्य ऑडिटर चंद्रकांत शिंदे,नागरिक, महिला,तरुण मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत