जरांगे पाटील जर सभा घेऊन दबाव निर्माण करत असतील तर आम्ही मोठी सभा घेऊ– विजय वडेट्टीवार

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे मराठा समाज शक्तिप्रदर्शन करत असेल तर आम्हालाही ओबीसी संघटनांची मोठी सभा घ्यावी लागेल.असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जरांगे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, सभेसाठी विशेष कृती समिती आम्ही स्थापन केली आहे. आम्ही साडेतीनशे जातींचा ओबीसी समाज आहोत हे कोणीही विसरू नये. सध्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अदृश्य शक्ती पाठिंबा देत असल्याचे दिसून येते. पुढील महिन्यात संविधान दिनाचे औचित्य साधून आम्ही नागपुरात भव्य सभा घेण्याची तयारी करीत आहोत.
ते म्हणाले, जरांगे-पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, आरक्षण जाहीर करता येणार नाही. त्यांनी सरकारला दहा दिवसांची मुदत दिली असली, तरी अशी मुदत घालून आरक्षण देता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली जातील. त्यामुळे या विषयावर ठोस भूमिका घेण्याची सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी आमची मागणी आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असते. महायुतीत ते शक्य नाही. भाजप त्यांचा केवळ वापर करून घेत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत