
छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या सरकारने नुकतेच ‘राजीव गांधी किसान न्याय योजने’अंतर्गत तब्बल २४ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण १ हजार ८९५ कोटी रुपये हस्तांतरीत केले. या योजनेअंतर्गत पैसे हस्तांतर करण्याचा हा तिसरा टप्पा आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी २८ सप्टेंबर रोजी बलौदाबाजार-भाटापारा जिल्ह्याच्या सुमाभाटा गावात आयोजित ‘कृषक-सह-श्रमिक संमेलन’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात या निधीचं वाटप करण्यात आलं.
शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं व त्यातून त्यांच्या उत्पन्नातही वाढ व्हावी या हेतूने छत्तीसगड सरकारने ‘राजीव गांधी कृषी न्याय योजने’ची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५ हजार ७५० कोटी रुपये वर्ग करण्याचं लक्ष्य छत्तीसगड सरकारने ठेवलं आहे.
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने २१ मे २०२० रोजी या योजनेची छत्तीसगडमध्ये सुरुवात झाली. राजीव गांधी कृषी न्याय योजनेच्या माध्यमातून चार टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५ हजार ७५० कोटी रुपये वर्ग करण्याचं नियोजन आहे. पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात १५०० कोटी रुपये हे योजना सुरू झाली त्याच दिवशी अर्थात २१ मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते.
योजनेच्या प्रारंभीच्या काळात धान्य, मका आणि ऊस अशा पिकांचा समावेश होता. २०२०-२१ वर्षात दुबार व तिबार पिकांचाही समावेश योजनेत करण्यात आला. या योजनेचा दुसरा हप्ता राज्य सरकारकडून २० ऑगस्ट २०२१ रोजी चुकवण्यात आला. यात राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांना १५२२ कोटी रुपये खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत