आर्थिकनोकरीविषयकभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
जातीचे अर्थशास्त्र !

- माझ्या एका मित्राला कोलकाता येथे नोकरी मिळाली. प्राचीन इतिहास काळात सम्राट अशोकाने बंगाल सागरातील ताम्रलिप्ती बंदर ते थेट आजच्या अफगाणिस्तानातील काबूल कंदाहार पर्यंत मोठा हमरस्ता बांधला होता. पुढे मध्ययुगीन शेरशाह सुरी बादशहाने त्याच्या काही भागाचे नूतनीकरण केले. आधुनिक काळात इंग्रजांनी हा हमरस्ता नव्याने बांधून त्याला ग्रॅंड ट्रंक रोड असे नाव दिले. तर मित्राला या ग्रॅंड ट्रंक रोडवरील वीजेच्या दिव्यांची देखभाल करण्याचे काम मिळाले होते. त्याच्या अखत्यारीत काही भाग पश्चिम बंगालचा होता तर काही भाग बिहारचा होता. नियुक्ती पत्र देताना मालकाने सांगितले होते की, ‘या दिव्यांच्या देखभालीसाठी जे साहित्य लागेल ते सोबत दिलेल्या यादीतील दुकानदारांकडूनच घ्यायचे ! यांपेक्षा वेगळ्या दुकानांतून घेतलेल्या साहित्याचे पैसे मिळणार नाहीत.’ हा काही तरी कमिशन वगैरेचा प्रकार असेल असे समजून मित्राने होकार दिला व कामावर हजर झाला. तिथे गेल्यावर त्याला समजले की, त्या यादीतील सर्व दुकानदार जैन आहेत ! जैन मालक बसलाय मुंबईत पार्ल्याला आणि त्याचे बिझनेस नेटवर्क थेट बंगाल बिहारच्या जैन लोकांशी ! ही जातीय बांधिलकी बघून तो इंजिनीअर मित्र थक्क झाला !
‘जातीचे अर्थशास्त्र’ म्हणतात ते हेच ! मध्यंतरी मराठवाड्यात गेलो होतो. स्वागत करायला एक प्राध्यापक आले होते. स्टेशनला भेटले व आम्ही घरी जाण्यासाठी रिक्शा स्टॅंडवर गेलो. तिथे ‘जयभीम’ लिहिलेली रिक्शा लागली होती व एक खेडवळ माणूस रांगेत उभा होता. आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो तर त्याने सहजगत्या सांगितले की, ‘पाव्हणं ! तुमी म्होरं व्हा !’ मला आश्चर्य वाटले. त्या गावकऱ्याचे आभार मानून मी मित्रासह रिक्शात बसलो. थोडे पुढे गेल्यावर मित्राने मला सांगितले की, तो गावकरी केवळ जातवाल्याच्या रिक्शात बसतो. म्हणून त्याने ‘जयभीम’ लिहिलेली रिक्शा सोडली ! हे ऐकून मी कपाळाला हात लावला ! जातीचे अर्थशास्त्र हे असे आहे. माझा एक मित्र एलआयसीत ॲाफिसर आहे. त्याने पटेल लोकांचा किस्सा सांगितला. ही पटेल मंडळी केवळ पटेल लोकांनाच आपला बिजनेस देतात. त्यांचे एक नियतकालिक निघते. त्यात देशभरातील सर्व पटेलांच्या उद्योगधंद्यांची माहिती असते. ते नियतकालिक वाचून पटेल मंडळी आपल्या जवळचे उद्योजक - पुरवठादार निवडतात व धंदा करतात ! जो कोणी बेईमानी करेल त्याला एक रुपयाचा दंड करतात व त्याची माहिती या नियतकालिकात छापतात ! मग त्याला कोणीही पटेल आपला ‘बिजनेस’ देत नाही ! म्हणून एक रुपयाचा दंड होऊ नये , या भीतीने सगळे उद्योजक पटेल एकमेकांशी इमानदारीने वागतात !
तुम्ही सारस्वत बॅंक हे नाव वाचले असेल. तुम्हाला वैश्य बॅंक व सीकेपी बॅंक देखील माहित असेल. परंतु मला खात्री आहे की , तुम्ही चर्मकार अथवा मातंग अथवा सुतार – लोहार – भिल्ल – वडार अशी बॅंक ऐकली नसेल ! तशी बॅंक अस्तित्वातच नसल्याने ती तुम्हाला माहित होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही ! ‘जातीचे अर्थशास्त्र’ म्हणजे काय , हे आता तुमच्या लक्षात आले असेल. ‘आपल्या जातीचा पैसा आपल्याच जातीत फिरवणे’ हे जातीच्या अर्थशास्त्राचे मुख्य तत्व आहे. जिथे बॅंका जातीच्या नावाने चालतात तिथे ‘वर्गीय’ अर्थशास्त्राऐवजी ‘जातीय’ अर्थशास्त्राची चलती असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जातीचे अर्थशास्त्र मोठमोठे उद्योजक देखील पाळतात. टाटा व गोदरेज या कंपन्यांचे शेअर होल्डर्स हे मुख्यत: पारशी आहेत. जगात अनेक चांगले मॅनेजर असूनही रतन टाटाने आपला वारसदार म्हणून सायरस मिस्त्री हा पारशी निवडला व हात पोळून घेतले. मारवाडी आपल्या कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्याने मारवाड्यांना देतो तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ते ब्राह्मणांना देतात. उत्पादन क्षेत्रांतील उच्चजातीय राज्य जिल्हा स्तरावरील वितरक म्हणून आपले जातभाई नेमतात, हे तर जगजाहीर आहे.जातीच्या अर्थशास्त्रात सिंधी समाजाचे उदाहरण नेहमी सांगण्यात येते. 1947 साली देशाची फाळणी झाली व सिंध प्रांतातील सिंधी भारतात निर्वासित म्हणून आले. सरकारने त्यांच्यासाठी अनेक शहरांत ‘सिंधी कॅालनी’ वसवल्या. हे निर्वासित सिंधी फार गरीब होते. घरदार - नोकरीधंदा, शिक्षण असे होते नव्हते ते सगळे फाळणीत गमावले होते. त्यांनीही जातीचे अर्थशास्त्र वापरले. जीवाचा आटापीटा करून एका सिंधी माणसाने तेलाचे दुकान टाकले तर सगळे सिंधी तेथूनच तेल घेऊ लागले. मग कोणी चपलांचे तर कोणी किराणा मालाचे दुकान टाकले. सगळे सिंधी तेथूनच चपला व किराणा माल घेऊ लागले. असे होता होता सिंधी समाजाचा पैसा सिंधी समाजातच फिरू लागला. आज सिंधी समाज हा देशातील एक श्रीमंत समाज समजला जातो. या श्रीमंतीमागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक कारण हे जातीचे अर्थशास्त्र आहे.
महाराष्ट्रात जातीच्या अर्थशास्त्राचे चांगले उदाहरण मराठा समाजाचे आहे. महाराष्ट्राच्या गावखेड्यातील सहकार चळवळ म्हणजे मराठा जातीच्या अर्थशास्त्राचा नमुना आहे. साखर कारखाने , सहकारी बॅंका , दूध उत्पादक संघ , पतपेढ्या या अशा माध्यमांतून मराठा समाजाने आपले जातीय अर्थशास्त्र नीट उभारले व त्याआधारे राजकारणावर पकड बसवली. आंबेडकरी समाजात ‘मनात आले की राजकारणात उडी मारा’ , ‘मनात आले की समाजसेवा करा’ , ‘मनात आले की धम्मकार्य करा’ , ‘मनात आले की शाळा काढा’ असे प्रकार सर्रास चालतात. मराठा समाजात असे कधीही होत नाही. तिथे आधी सहकार चळवळीत स्वत:ला सिद्ध करावे लागते. हे सिद्ध करताना चांगले वाईट अनुभव येतात. चांगल्या वाईट माणसांना भिडावे लागते. या रसायनातून उद्याचा लोकप्रतिनिधी व मंत्री तयार होतो. त्यामुळे तो जातीय हितसंबंधांपासून तसूभरही हलत नाही. किंबहुना त्याच्या मागे उभी असलेली सहकार यंत्रणा त्याला तशी हालचाल करू देत नाही. या तुलनेत बौद्ध , चर्मकार , मातंग , भिल्ल , वडार ; एवढेच नव्हे तर धनगर , माळी , वंजारी , कुणबी असे ओबीसी कुठे आहेत ? तरीही आम्ही राजकीय सत्तेची स्वप्ने बघत असू तर आम्ही मूर्खांच्या नंदनवनात नांदत आहोत , असेच म्हणायला हवे ! जशी ग्रामीण भागातील सहकारी चळवळीवर मराठा समाजाची पकड आहे तशीच शहरी भागातील सहकारी चळवळ ब्राह्मण समाजाच्या ताब्यात आहे. जनकल्याण सारख्या अनेक नागरी बॅंका ब्राह्मण समाजाने निर्माण केल्या आहेत. ब्राह्मण समाजाच्या आर्थिक प्रगतीखेरीज दुसऱ्या विचारसरणीच्या तडजोडवादी कार्यकर्त्यांना मिंधे करून ठेवण्यासाठी या बॅंकांचा चांगलाच उपयोग होतो. या पार्श्वभूमीवर आपण काय करीत आहोत ? हा प्रश्न फुले-आंबेडकरी चळवळीने स्वत:ला विचारायचा हवा. मराठा समाजाच्या एकेका तालुक्यात पाच पाच कोटी रुपयांचे भागभांडवल असणाऱ्या पतपेढ्या आहेत. आमच्याकडे अजून एखादी चांगली चालणारी पतपेढी नाही, बॅंक तर खूपच दूरची गोष्ट राहिली !वास्तविक पाहता , आपल्याकडे हे कार्य करू शकतील असे कार्यकर्ते आहेत. परंतु राजकीय धुरंधर त्यांना दिशा देण्यात अपयशी ठरले आहेत. वस्तुत: प्राध्यापक , शिक्षक , डॉक्टर्स , इंजीनीयर , शासकीय अधिकारी- कर्मचारी , यांनी व्यापलेला एक भक्कम असा मध्यम वर्ग आंबेडकरी समाजात निर्माण झालेला आहे. हा वर्ग देशभर पसरलेला आहे. मात्र त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो अंबानी- अडानी , महिंद्र - बिर्ला , जैन - थापर , पटेल - सिंधी - मारवाडी यांच्यावर अवलंबून राहतो. उरलीसुरली कसर मराठ्यांसारख्या प्रभुत्वशाली शेतकरी जातींचे व ब्राह्मण उद्योजक भरून काढतात. त्यामुळे जातीसंस्थाविरोधी आंबेडकरी समाजाचा पैसा जातीसंस्था समर्थक उद्योजक भांडवलदार यांच्या तिजोरीत जातो ! याच पैशांच्या आधारे हे जातीसंस्था समर्थक उद्योजक भांडवलदार देशातील ब्राह्मण्यवादी संघटनांना पोसतात ! म्हणून जिओ कंपनीचे सिम वापरून फुले आंबेडकरवादाच्या गप्पा मारणाऱ्या कार्यकर्त्यांचे हसू येते.
एका अर्थाने पाहू गेल्यास, आंबेडकरी समाज आपल्याच हाताने आपल्या गुलामीच्या बेड्या मजबूत करीत आहे. या बेड्या तोडण्यासाठी निव्वळ सामाजिक कार्यक्रम देवून चालणार नाही तर आर्थिक कार्यक्रम देखील द्यावा लागेल ! हा कार्यक्रम देण्यासाठी समाजातील बुद्धिवाद्यांनी मनमोकळी चर्चा करणे आवश्यक आहे. जातीसंस्था निर्मूलन हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी ‘जातीचे अर्थशास्त्र’ समजून घेणे आवश्यक आहे. भारतातील भांडवलाला जे जातीचे बांध पडले आहेत ते बांध तोडण्यासाठी काय करावे लागेल , यांवर सखोल चिंतन मनन करावे लागेल. एकदा का हे ‘जातीय’ भांडवल ‘वर्गीय’ झाले की मग जातीसंस्था निर्मूलनाची लढाई सोपी होईल !
तारीख : 11 जुलै 2022. —-शुद्धोदन आहेर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत