पोराचा बंगला..

--- नंदू वानखडे
घडी घडी अर्ध्या राती, बाप उठू लागला
पोराचा बंगला त्याले, जेल वाटू लागला..
वेळेवर देत नाही, कुणी इथं पाणी
नाही जसं वाटे घरी, ओळखीचं कोणी..
अनोळखी घरामधी, उर फाटू लागला..
पोराचा बंगला त्याले, जेल वाटू लागला…
काय बोलू कुणासंग, बोलेचं ना कोणी..?
गुलु गुलु बोलत दोघे ,राजा आणि राणी
हाका मारू मारू त्याचा, झेंडू दाटू लागला…
पोराचा बंगला त्याले, जेल वाटू लागला…
गाडी माडी सारंच आहे, पोरा तुझ्या घरी
कसा राहू झाली माही, माह्या मनी चोरी..
परक्याच्या घरी जसे, दिवस काटू लागला..
पोराचा बंगला त्याले, जेल वाटू लागला…
एके दिवशी होते सारे,झोपेमध्ये चूर
सोडूनिया गेला बाप, दूर लांबदूर..
कळले तो, आपुलकीचे घर गाठू लागला…
त्याले वाटे आयुष्यात, केली मोठी भूलं
पदराले गाठी बांधून, शिकवली मुलं
पोरापुढे हरला बाप, धुळ चाटू लागला…
पोराचा बंगला त्याले, जेल वाटू लागला…
— प्रा.नंदू वानखडे, मुंगळा
जि.वाशिम-9423650468
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत