ठाकरे + ठाकरे = मराठी-अशोक सवाई

(राजकीय भाषा सक्ती)
महाराष्ट्रात मराठी व मराठी माणूस या महत्त्वाच्या मुद्द्यावर उद्धव व राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले. ते बरे झाले. तसा सुरवातीला उद्धव ठाकरेंना राजकारणात रस नव्हता ते आपल्या फोटोग्राफीत खुश होते. उलट इकडे व्यंगचित्रकार राज यांना राजकारणाची आवड होती. पुढे शिवसेनेची धुरा आपल्यालाच सांभाळावी लागेल असे गृहीत धरून ते काकांसोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरे सोबत शिवसेनेत काम करू लागले. परंतु शेवटी पुत्र प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवला निवडल्यावर राजची राजकीय महत्त्वाकांक्षा दुखावली गेली. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच २००५ ला शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा आपला नवीन पक्ष काढला. नंतर २००९ मध्ये झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. परंतु पुढच्या निवडणूकीत तोच आंकडा सापशिडी सारखा गरर्कन खाली येवून पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला. नंतर त्यांचा पक्ष राजकीय दृष्ट्या वनवासात गेला. नंतर दरम्यानच्या काळात त्यांनी बरेच राजकीय प्रयोग केले. कधी भाजपच्या विरोधात तर कधी भाजपशी जवळीक साधणारी भाषणे ठोकली. मध्यंतरी ते अमित शहांची भेट सुद्धा घेऊन आले होते. भाषणासाठी लोकांची गर्दी होत होती पण त्याचे रूपांतर मत मिळवण्यात होत नव्हते. धरसोड वृतीमुळे व काकांसारखी त्यांची भाषणशैली असल्यामुळे महिला श्रोत्यांच्या माना खाली जात होत्या. व इतर नेत्यांची मिमिक्री करत असल्याने कदाचित सुसंस्कृत महाराष्ट्राने त्यांच्या पक्षाला राजकीय वनवासात पाठवले असावे. इकडे भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी वैध-अवैध मार्गाने शिवसेनेत जबर फोडाफोडी करून शिवसेनेला मोठे खिंडार पाडले. त्यामुळे शिवसेना अतिशय कमजोर झाली. आणि एकनाथ शिंदेंच्या माथ्यावर गद्दाराचा शिक्का बसला. अशा वेळी उद्धव व राज यांना एकत्र आणण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले पण यश येत नव्हते. कारण एकत्र येण्यासाठी आपणहून पुढाकार घेणे म्हणजे राजकीय नेत्यांचा ईगो हर्ट्झ होण्यासारखे असते. एकत्र येण्यासाठी काहीतरी मोठे कारण असावे लागते. जेणेकरून आपला ईगो हर्ट्झ होणार नाही व एकत्र ही येता येईल. पण मला उद्धवच्या भाषणातील हिंदूस्थान हा शब्द खटकला. आपल्या भारत देशात अनेक धर्म/जाती/पंथ/रीती रिवाज/ बोली भाषा सुखाने नांदतात अशा भारताला केवळ हिंदूस्थान म्हणने म्हणजे भाजपच्या हिंदू राष्ट्राला अप्रत्यक्षरित्या खतपाणी घातल्या सारखे होय. हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घेतले पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून दोघा भावांना एकत्र येण्याची संधी मिळवून दिली. त्यानंतर उद्धव व राज यांनी एकत्र मेळावा घेवून जनतेसमोर आपापली भाषणे ठोकली. महाराष्ट्रात इव्हीएमच्या सहाय्याने भाजपने एकप्रकारे विरोधी पक्षाला नसल्यासारखे करून ठेवले होते. दोघा भावांच्या एकत्रीकरणामुळे विरोधकांना एक नवसंजीवनी मिळाली. तर इकडे भाजपातील मराठी आमदार/खासदारांमध्ये उभा पेच ठाकला. जर हिंदी भाषेचे समर्थन केले तर जनता शाब्दिक अर्थाने झोडपून काढेल नाही केले तर दिल्ली तख्तचे
वज़ीर-ए-आज़म डोळे वटारतील. म्हणून ते चिडीचूप बसले. असेच म्हणावे लागेल. पण साहेब, राजकारण ही एक नागमोडी वळणाची वाट आहे. वाटेवर वळण आले की वळावे लागते नाही वळले की वाट लागते. अशा या वाटेवर अनेक वळणे येत असतात. भल्याभल्या राजकारण्यांना पुढचे राजकीय वळण कसे येईल याचा अंदाज येत नाही. ज्यांना येतो ते आपली सोय आधीच करून ठेवतात. तर अशाच एका राजकीय वळणावर उद्धव व राज यांची भेट झाली. एकमेकांना मिठ्या बिठ्या मारल्या. उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी. पण उद्धव व राज ठाकरेंना हेही माहीत असायला पाहिजे. ज्या राजकीय वाटेवरून तुम्ही चालत आहात त्याच वाटेवर बेरकी किंवा गोडबोले शत्रू सुद्धा असतात. तुमची दिशाभूल करून तुम्हाला एकमेकां विरोधात दोन वेगवेगळी वळणे कधी घ्यायला लावतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. उद्धव राजाजी धीरे चलना, सियासत में जरा संभलना, हां बडे धोके है… बडे धोके है इस राह में। असो!
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्राने महाराष्ट्रावर हिंदी भाषा जबरदस्तीने थोपवणे. एक भाषा मग एक देश, मग एक हिंदू राष्ट्र. पुढे असा त्यांचा अजेंडा असू शकतो. त्यासाठी हिंदीची सक्ती ही चाचपणी असू शकते. याच निर्णयामुळे दक्षिण भारताने हिंदीची सक्ती करण्याऱ्या केंद्राय आदेशाला तेथून हुसकावून लावले. मग भाजपवाले एवढेसे तोंड करून मोठ्या आशेने हिंदीला घेऊन महाराष्ट्रात आले. पण महाराष्ट्राने ही 'सौ सोनार की, एक लोहार की' वाला मराठी घन घालत मुख्यमंत्र्यांना हिंदीचा फतवा म्हणजे जी आर मागे घेण्यास भाग पाडले. व तोंडघशी पाडले. तसे ते वारंवार तोंडघशी पडतच राहतात. आता आपली लाज वाचावी म्हणून हिंदी सक्तीच्या आदेशाची समिक्षा करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ताथूरमाथूर समिती नेमण्यात आली. काय आहे साहेब जगातील सर्वच भाषा जर त्यात शिवीगाळ सारखे अभद्र शब्द नसतील तर त्या भाषा आपापल्या क्षेत्रात सुंदरच असतात. त्या भाषेतील ऐब कुणीही काढू शकत नाही. आपली मराठी भाषा लवचिक आहे. तिला जशी वळवली तशी ती वळते. मी भाषाप्रेमी असून मला माझी मराठी मायबोली तर आवडतेच आवडते. पण हिंदीतही मी माझे लिखाण करत असतो. याची वाचकांना कल्पना आहे. शिवाय उर्दू मिश्रित हिंदी, युपी बिहारची भोजपुरी गुजरातची गुजराती याही भाषा मला बोलायला, ऐकायला व हिंदी लिपीत लिहायला आवडतात. हा माझा ऐच्छिक प्रश्न आहे. या भाषा मी बोलाव्यात की बोलू नये यावर कोणाची जबरदस्ती असू शकत नाही. आणि ती असूही नये. माझ्या अनेक मित्रांशी मराठी+हिंदी+उर्दू असा मिश्रित संवाद होत असतो. मी हिंदी भाषा कुठेही शिकायला गेलो नाही. जुने दर्जेदार हिंदी चित्रपट व ब्लॅक & व्हाईट दूरदर्शनवर येणाऱ्या हिंदी बातमी पत्रावरून शिकलो. अनेक लोक अनेक भाषा आपापल्या इच्छेप्रमाणे शिकत असतात बोलत असतात. प्रत्येक भाषेला आपली एक अस्मिता असते ती प्रत्येक मूळ भाषिक व गैरभाषिकांनी जपायला पाहिजे. आपल्या देशात अनेक भाषा सुखाने नांदत आहेत. म्हणून भारत देश अखंडित आहे. जर कोणत्याही राजकारण्यांनी आपल्या अल्प राजकीय लाभापायी त्यात दुही माजवून भाषेभाषेत झगडे लावण्याचा प्रयत्न केला तर देशात यादवी माजेल. अराजकता माजल्यावर देश खंडित व्हायला वेळ लागणार नाही. हे राजकीय नेत्यांनी व त्यांच्या समर्थकांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही भाषेसाठी कोणावरही सक्ती व्हावी, मारहाण व्हावी, हिंसा व्हावी याच्या मी सक्त विरोधात आहे. सर्व भारतीय भाषांची जननी ही पाली भाषा आहे. म्हणजे सर्व भाषा या एकमेकींच्या बहिणी आहेत. अगदी संस्कृत सुद्धा. कोणी म्हणतात संस्कृत ही सर्वात जुणीपुराणी भाषा आहे. हे खोटे आहे. ब्राह्मणांनी पाली भाषेवर संस्कार करून ती संस्कारित केली तिलाच आताची संस्कृत म्हणतात. हे लक्षात घेतले पाहिजे. असो!
भाजपचा खासदार निशिकांत दुबे नावाच्या मूर्ख माणसाने मराठी भाषा व मराठी माणसांविषयीची मळमळ बाहेर ओकली. मराठी माणूस आमच्या भाकरीवर जगतो मराठी माणसा जवळ व महाराष्ट्रात काय आहे? आमच्या जवळ कोळसा खानी आहेत. वगैरे काय काय बोंबलला. अरे मूर्ख माणसा! महाराष्ट्रातील मराठी माणसा जवळ काय नाही ते सांग. आमच्या मराठी माणसाच्या महाराष्ट्रात शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही मजबूत विचारांची ताकद आहे. याच साखळीने महाराष्ट्रा सोबत देशालाही शौर्य, शिक्षण, आरक्षण व संविधान दिले. ज्या संविधानावर भारत देशाचा कारभार चालतो. महाराष्ट्राने देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लढवय्यी महार व मराठा बटालियन दिली ज्यामुळे तुमच्या सारखे मूर्ख माणसे सुद्धा सुखाची व शांत झोप घेवू शकतात. मराठी माणसाच्या महाराष्ट्रात निसर्गाचे वैभव लाभलेली मुंबई आहे. जिच्यावर तुमच्या भाटजी-शेठजींचा (भटजी शेटजी हे शब्द महात्मा फुलेंनी लिहलेल्या पुस्तकात आहेत) अजूनही कपटाचा तिरका डोळा आहे. तिच्यात सामावलेले देशाच्या घटनाकाराचे चैत्यभूमी सारखे प्रेरणास्रोत आहे. तिथून तुमच्या सारख्या मुर्खांना सोडून साऱ्या देशाला प्रेरणा मिळते. दीक्षाभूमी आहे जिथे जगातील लाखो लोक उडण खटोले बुक करून केवळ आणि केवळ घटनाकाराचे दर्शन व बौद्ध धम्म दीक्षा घेण्यासाठी येतात हे जागतिक कीर्तीचे ऐतिहासिक स्थळ व प्रेरणास्थान आहे. आमच्या इथे नैसर्गिक वनश्रीने नटलेली हिरवीगार कोकणपट्टी आहे. विशाल सागराचा किनारा आहे. तुमच्या सारखे मुर्ख मिटक्या मारत मासे, झिंगे खाता ना? ते आमच्या इथलेच आहे. इथे निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. सर्वात जास्त धरणे आमच्याचकडे आहेत. आमच्या इथे सांस्कृतिक संत परंपरा आहे. आमच्या इथे रत्नागिरीचा हापूस आंबा, चिकू, जळगावच्या केळी, नाशिकचे द्राक्षे, नागपूरच्या संत्री/मोसंबीचे उत्पादन घेणारे बागायतदार आहेत. जे उत्पादन परदेशात जाते. जो हा अव्वल दर्जाचा माल खावून तुमच्या मुर्खांची जिव्हा सुदृढ बनून आमच्या मराठी माणसाला व महाराष्ट्रला अभद्र बोंबलण्यासाठी लपलपते ना? ती महाराष्ट्रातील मराठी माणसामुळेच. आणि शेवटी आमच्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून जे लोक जिथे येतात त्या मुंबईत नौकरी धंदे, उद्योग उदीम करून स्थाईक होतात ते मराठी माणसाच्या सौहार्द व सहिष्णुते मुळेच, म्हणून आमच्या मुंबईला मिनी इंडिया सुद्धा म्हणतात. मुंबईत आलेल्या प्रत्येक परक्या लेकराला तिने आसरा दिला. मुंबईने त्यांना कधी उपाशी पोटी झोपू दिले नाही. तिने कित्येक दुसराच्या लेकरांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवून मोठे केले. जागतिक कीर्तीच्या हस्ती बनविल्या. काय नाही महाराष्ट्राच्या मराठी माणसा जवळ? ते सांग मुर्खा.
उद्धव राज एकत्र आले खरे पण त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. परिक्षा आहेत. या दोघा भावाकडून मराठी माणसांच्या अपेक्षा सुद्धा खूप वाढल्या आहेत. पहिले आव्हान म्हणजे येतो येतो म्हणणारा जन सुरक्षा कायदा. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात येवू शकते अशी समाज माध्यमातून जोरदार चर्चा सुरू आहे. जनतेलाच अशी भीती वाटत असेल तर. उद्धव, राज व इतर समविचारवंतानी, संघटनांनी एकत्र येऊन हा कायदा सरकारला रद्द करायला भाग पाडले पाहिजे व जनतेला दिलासा दिला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एम एम सी म्हणजे मुंबई महानगरपालिका संस्था, नगरपालिका, वगैरेंच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. त्यासाठी ईव्हीएममध्ये निवडणूका न घेता मतपत्रिकेवर घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांना भाग पाडायला पाहिजे. या निवडणूका जर मतपत्रिकेवर घेतल्या तर पुढची विधानसभा निवडणुक सुद्धा निवडणूक आयुक्तांना मतपत्रिकेवरच घ्यावी लागेल. तिसरा मुद्दा प्रधानमंत्री यांचे परममित्र असलेले गौतम अडाणी यांच्या घशातून मुंबईची धारावी व महाराष्ट्रातील इतर सेक्टर वाचवायला पाहिजे. बंद झालेल्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. मुलांचे शैक्षणिक अनुदान, त्यांच्या वसतीगृहांचे प्रश्न, शाळांची भरमसाठ वाढलेली फी, रोजगार, महागाई, आरोग्य अशा तमाम आघाड्यांवर लढावे लागणार आहे. ठाकरे बंधू व सहकारी निदान जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात व मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात जर यशस्वी झाले तर त्यांच्या उदोउदोचा देशात डंका पिटेल. ही काटेरी वाट जरी असली तरी जनतेच्या दायित्वासाठी ती तुडवावी लागेल. ही वाट त्यांनी यशस्वीरित्या पार केली तर महाराष्ट्रात पुढचा राज्यकारभार हा ठाकरे बंधूंचा असेल.
– अशोक सवाई
91, 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत