डॉ. आंबेडकर आणि बुद्ध धम्म

सिद्धार्थ गौतमाचा जन्म इ. स. पूर्व 563 वैशाख पौर्णिमा रोजी झाला. कालांतराने सिद्धार्थला शक्यसंघाचा सभासद करून घेतले. त्यानंतर सुमारे आठ वर्षांनी शक्य सीमेलगत असलेल्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व कोलिया मध्ये मोठा संघर्ष सुरू झाला तेव्हा हा प्रश्न युद्धानेच निकाली काढावा असा विचार पुढे आला. तेव्हा सिद्धार्थ आणि त्याला विरोध केला तेव्हा त्याच्यापुढे युद्ध किंवा कुटुंबावर बहिष्कार व गृहत्याग हा पर्याय ठेवण्यात आला. त्यावेळी सिद्धार्थाने गृहत्याग हा पर्याय स्वीकारला आणि दुःखाच्या शोधासाठी सिद्धार्थ घराबाहेर पडला. या जगामध्ये सुखाचा शोध घेण्यासाठी ग्रह त्याग केल्याची अनेक उदाहरणे सापडतील पण दुःखाचा शोध घेण्यासाठी ग्रह त्याग करणारा पहिला व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ गौतम होता. इसवी सन पूर्व 588 मध्ये त्यांना दुःखाचा शोध लागला पण दुःखाचा शोध निघालेला सिद्धार्थ त्यांनीच निवडलेल्या वाटेने एकटाच चालत राहिला. चालता चालता या सिद्धार्थाचा तथागत कधी झाला हे त्यालाही कळाले नाही.
तथागत याचा अर्थ जसे बोलतो तसेच आचरण करतो तो तथागत. हा तथागतांनी नवा धम्म सांगितला. त्या धम्माचा केंद्रबिंदू ईश्वर नाही तर सामान्य माणूस होता. त्या माणसाचे नाते ईश्वराची जोडले नाही तर माणसाशीच जोडले. माणसाचे माणसाशी नाते हेच श्रेष्ठ मानले. त्याचप्रमाणे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे व ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा या धम्माचा पाया होता. सदाचार आणि शील मार्गाचा अवलंब करून दुःख दूर करता येतं हा दुःख निवारण्याचा मूलमंत्र तथागतांनी दिला. अज्ञानाचा अंधार नष्ट करून माणसाने स्वतः स्वयंप्रकाशित होण्याचा विचार हा तथागतांच्या धम्माचा भाग होता. अशा प्रकारच्या धम्मांचा 45 वर्ष प्रचार आणि प्रसार करणाऱ्या तथागताचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले.
परंतु तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्ध तत्त्वज्ञानाचे काटेकोरपणे पालन करणे, धम्माचे आचरण करणे याकडे हळूहळू दुर्लक्ष होताना दिसू लागले. या जाणिवेतून महा कश्यप यांच्या नेतृत्वाखाली पहिली धम्म संगीत घेण्यात आली. त्याचा उद्देशच मुळी बुद्ध वचनाचे पालन व त्याचे शुद्धत्व राखणे व बुद्ध तत्त्वज्ञानाचे सुसंगत संकलन करणे हा होता. त्यानंतर आयुष्यमान यश यांच्या नेतृत्वाखाली दुसरी संगती घेण्यात आली पण या संगीतिंना शह देण्यासाठी तिसरी धम्म संगती घेण्यात आली. पुढे भिक्खू संघात मतभेद निर्माण झाले. बुद्ध धम्मात आपल्या सोयीनुसार बदल करण्यात आले. यातूनच महायान, हीनयान असे धम्मात पोटभेद निर्माण झाले. अशा अवस्थेतच बुद्ध धम्माचा राजाश्रय संपुष्टात आला. ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व वाढले. परकीय मुसलमानांनीही बौद्ध धम्मावर आक्रमण केली. यातून भारतातील बौद्ध धम्माला उतरती कळा लागली. भारताबाहेर मात्र हा धम्म रुजायला सुरुवात झाली.
त्यानंतर अनेक शतकानंतर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः बौद्ध धम्माचा स्वीकार करून व त्यांच्या लाखो अनुयायांना या धम्माची दीक्षा देऊन या धम्माचे पुनर्जीवन केले. हा धम्म स्वीकारत असताना महायान किंवा ही ज्ञान याकडे न वळता नव्यान स्वीकारला (यान म्हणजे मार्ग) म्हणजेच बुद्धांच्या मूळ तज्ञानाचा धम्म स्वीकारला. म्हणून बाबासाहेबांचा बौद्ध धम्म हा फिल्टर धम्म होता असे म्हटले जाते. डॉ. आंबेडकरांचा धर्मांतराचा निर्णय हा अचानक किंवा भावनिक नव्हता तर त्यांनी जवळपास 20 वर्षे जगातील विविध धर्माचे वाचन केले होते. परंतु बुद्ध धम्मा विषयी त्यांच्या मनात पूर्वीपासून आकर्षण होते. ते एका भाषणात (24 मे 1955) म्हणतात, “माझे बुद्ध धर्माचे वेड फार पुरातन आहे” याचे कारण म्हणजे डॉ. आंबेडकर मॅट्रिक पास झाल्याच्या निमित्ताने 1908 मध्ये एक सभा घेण्यात आली होती व या सभेत डॉ. आंबेडकर यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर (गुरुजी) यांनी त्यांचे बुद्ध चरित्र हे पुस्तक भेट दिले होते. त्यांचा डॉ. आंबेडकर यांच्या मनावर खोल परिणाम झालेला होता पण डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरास हे एकमेव कारण होते असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण डॉ. आंबेडकरांच्या अगोदर बुद्ध धम्माच्या अनुषंगाने विविध घटना घडलेल्या होत्या. यांचा त्यांनी अभ्यास केला नसेल असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण डॉ. आंबेडकरांचे वाचनाचे वेड सर्वश्रूत आहे. डॉ. आंबेडकर पूर्व काळातील घटनांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.
- 1879 मध्ये सर ऍडमिन अर्नोल्ड यांचे ‘लाईट ऑफ एशिया’ हे बुद्धाचे काव्य चरित्र प्रकाशित झाले. या ग्रंथाच्या हजारो प्रती खपल्या त्यामुळे सर एडमिन अर्नोल्ड हिरो ठरले. त्याचप्रमाणे 1885 मध्ये भारतात त्यांची बुद्धावर बरीच व्याख्याने झाली आणि त्यांच्या व्याख्यानमालेलाअभूतपूर्व प्रतिसाद देखील मिळाला.
- 1880 मध्ये सिलोन येथील पानतुरा या शहरात बुद्ध आणि ख्रिश्चन धर्मावर एकाच वेळी जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. ही व्याख्याने भिकखू गुणानंद व डेव्हिड यांची झाली. या व्याख्यानाची चर्चा देशभर झाली. या व्याख्यानांचा परिणाम म्हणून काही जणांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या दरम्यानच दक्षिण भारतात बौद्ध चळवळ सुरू झालेली दिसून येते.
- 1880 मध्येच मद्रास मध्ये पंडित दास यांनी शालेय बौद्ध असोसिएशनची स्थापना केली व बुद्ध वर्ग सुरू केले.
- 1891 मध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना झाली व याद्वारे महाबोधी नावाचे मासिक सुरू करण्यात आले. पुढे या ग्रंथातच डॉ. आंबेडकरांनी बुद्ध व त्याचे भवितव्य हा लेख लिहिलेला दिसून येतो.
- 1894 मध्ये गेचे बुद्धाचे महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी अनागरिक धम्मपाल यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले ते आंदोलन आज पुन्हा सुरू करण्यात आले आहे म्हणजे या आंदोलनाला सुमारे 130 वर्षाचा इतिहास आहे.
- 1902 मध्ये धम्मपदाचे मराठी इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यात आले.
- 1907 मध्ये पी नरसू यांचा ‘इसेन्स ऑफ बुद्धिझम’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला.
या सर्व घटकांचा डॉ. आंबेडकरांनी अभ्यास केला नाही असे म्हणता येणार नाही त्यामुळे या सर्व घटनांचा ही प्रभाव त्यांच्यावर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांनी 1956 रोजी धर्मांतर केले असले तरी बुद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्धार त्यांनी अगोदरच केलेला दिसून येतो हे खालील बाबी पाहिल्यानंतर लक्षात येते. - 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला होता त्यावेळी त्यांनी त्या परिसरातील बौद्ध लेण्याला भेट दिली होती. बौद्ध भिक्खू विषयी आदर व्यक्त केला होता.
- 1934 च्या दरम्यान डॉ. आंबेडकरांनी मुंबई येथे घर बांधले त्याला राजगृह असे नाव दिले.
- 1936 मध्ये इटालियन भिकू यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याजवळ अप्रत्यक्षरीत्या बौद्ध धम्म स्वीकार असल्याची इच्छा व्यक्त केली होती.
- 1942 मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशनचे अधिवेशन नागपूर येथे भरले होते त्या परिसराला डॉ. आंबेडकरांनी बुद्ध नगरी असे नाव दिले होते.
- 1948 मध्ये डॉ. आंबेडकरांनी पी नरसू यांचा ‘इसेन्स ऑफ बुद्धिझम’ हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला होता विशेष म्हणजे हा ग्रंथ ज्या प्रेस मध्ये छापला त्या प्रेस चे नाव ‘बुद्धभूषण’ होते.
- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन मे 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माईसाहेब यांच्यासोबत दिल्ली येथील बिर्ला बुद्ध मंदिरात धम्मदीक्षा घेतल्याचाही उल्लेख आढळतो. त्यानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धर्माची जाहीरपणे दीक्षा घेतली व आपल्या लाखो अनुयायाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली परंतु त्यांनी स्वीकार लेला धम्म हा महायान होता ना हीनयान, त्यांनी स्वीकारला धम्म हा नवयान होता. बुद्धाचा मूळ धर्म होता. बुद्धानंतर त्यांच्या विचारातील भेसळ बाजूला ठेवून त्यांनी या धम्माचा स्वीकार केला. बुद्धाने मनपे होते मी मुक्ती दाता नाही मार्ग दाता आहे. हा विचार डॉ. आंबेडकरांना भावला होता.
या अनुषंगानेच ते महाबोधी मासिकात लिहिलेल्या लेखात असे म्हणतात की, “बुद्धांनी अहंकार पूर्णपणे जिंकून टाकला होता हे त्यांचे वेगळेपण आहे. मी ईश्वर आहे किंवा मी ईश्वराचा पुत्र, प्रेषित आहे, मी मोठा दाता आहे अशी भूमिका बुद्धांनी कधीच घेतली नाही” त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारताना धर्म आणि धम्म यातील फरक करताना धर्म हा व्यक्तिगत आहे तर धम्म हा सामाजिक आहे हे स्पष्ट केले होते. डॉ. आंबेडकरांनी पारलौकिक जगाशी जोडणारा कर्म सिद्धांत नाकारला, जग हे ईश्वरांनी निर्माण केले आहे या कपूल कल्पित कल्पनेला तिलांजली दिली त्याचप्रमाणे देव, दैवी चमत्कार, कर्मकांड हा बुद्ध धम्माचा भाग नाही म्हणून या सर्व कल्पनांचा त्याग केला. ब्रह्म, यज्ञ, आत्मा किंवा पुरोहितांनी रचलेल्या कथा अज्ञान अंधश्रद्धा या सर्व बाबी नाकारल्या व तथागतांनी मानवाला केंद्रबिंदू मांडणारा धम्म स्वीकारला. धम्म हा धर्मग्रंथात नसतो तर तो धम्म आचरणात असतो हा महत्त्वपूर्ण विचार बाबासाहेबांनी स्वीकारला. डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेला बुद्ध समाजाचा मानसशास्त्रज्ञ होता. हा बुद्ध कुणाला आशीर्वाद देत नाही, नवसाला पावत नाही त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांचा बुद्ध धम्म माणसाला कर्मकांड, पुनर्जन्म, अज्ञान, अंधकार, मोक्ष या मार्गाकडे घेऊन जात नाही तर अज्ञान अंधश्रद्धा व शोषणाच्या अंधारातून बाहेर काढून माणसाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा, मैत्री या मूल्याचे दर्शन घडवत ‘अत्त दीप भव’ म्हणजेच स्वयंप्रकाशाकडे घेऊन जातो. डॉ. आंबेडकरांचा नवयान विज्ञानवादी आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते तथागत हे मानवी मनाचे दुःख शोधणारे महान डॉक्टर आहेत पण त्याचबरोबर ते विषमतेचे विरोधक आहेत. त्यांची विषमता निर्मूलनाची चळवळ म्हणजेच त्यांचा धम्म आहे. ते दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, दुःखाच्या मुळाशी जाऊन दुःख समूळ नष्ट करण्याचा मार्ग सांगतात, हा दुःख निरोधाचा मार्ग म्हणजेच त्यांचा धम्म आहे.
त्याचप्रमाणे बुद्धाचे तत्त्वज्ञान मानवनिर्मित गरीब श्रीमंत स्त्री पुरुष श्रेष्ठ कनिष्ठ अशा विषमतेवर आधारित विभाजनालाही विरोध करते. त्याचप्रमाणे मानवनिर्मित जाती पोटजाती या मार्गाने येणाऱ्या विषमतेला ही विरोध करते. डॉ. आंबेडकर म्हणतात बुद्ध धम्म आणि जाती जातीय मानसिकता एकत्रित राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर म्हणतात बुद्धाचा धम्म केवळ एका व्यक्तीचे, एका समूहाचे किंवा एका देशाचे कल्याण करत नाही तर बुद्धाचा धम्म जगाची पुनर्रचना करू शकतो. डॉ. आंबेडकरांच्या विचाराने भिकू संघरक्षित प्रभावित झाले. त्यांनी बाबासाहेबांची तीनदा भेट घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरु मानले. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या कल्पनेतील बुद्ध व बुद्ध धम्म या आधारे ‘डॉ. आंबेडकर अँड बुद्धिझम’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कोलंबिया विद्यापीठात शिकवला जातो. हा ग्रंथ जगातील 26 देशात गेला म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांच्या कल्पनेतील बुद्ध व बुद्ध धम्म या सर्व देशात गेला. 2018 मध्ये या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या बुद्ध व बुद्ध धम्म ही कल्पनेच्या अनुषंगानेच भिकू संघरक्षित देखील असे म्हणतात की बुद्ध बनणे सोपे नाही, बुद्ध बनणे म्हणजे बुद्ध म्हणून ओळख सांगणे नाही, बुद्ध बनणे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्त्वज्ञान आचरणात आणणे. बुद्ध बनण्यासाठी केवळ पंचशील, त्रिशरण येणे एवढे पुरेसे नाही तर ते आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. स्वतःमध्ये स्वतःच्या मनात व अंतकरणात मूलभूत परिवर्तन घडवून आणणे म्हणजे बुद्ध बनणे होय.
थोडक्यात डॉ. आंबेडकरांच्या कल्पनेतील बुद्ध हा ईश्वर नाही तर वैश्विक ज्ञानाचे प्रतीक आहे. मूलभूत परिवर्तनाचा पासवर्ड म्हणजे बुद्ध आहे आणि बुद्ध अन्यायी होणे म्हणजे कर्मकांड, अंधश्रद्धा, जाती, पोट जाती, दुष्कृत्य, विषमतेचा नकार देणे होय. त्यामुळे या धम्माचा स्वीकार करणे सोपे नाही. या अनुषंगानेच डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात (14 जानेवारी 1951) म्हणतात “या धर्मात येत असताना सोबत जाती-पोटजाती घेऊन येता येणार नाही. ज्यांना बुद्धतत्त्व ज्ञानावर विश्वास आहे हे तत्वज्ञान स्वीकारण्याची आवड आहे त्यांनीच या धर्मात यावे. येथे बारभाईची खिचडी करून चालणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी बुद्ध धम्म आचरणात आणण्यासाठी धम्माचा स्वीकार केला आहे त्यांनी या धम्माचा प्रचार प्रचार आपल्या खेड्यातील लोकांपर्यंत घेऊन जाण्याची शपथ घ्यावी” असा डॉ. आंबेडकर उपदेशही करतात; परंतु आज स्वाभिमान आत्मसन्मान सत्तेसाठी गहाण ठेवून समरस्ते तर रस घेणारे प्रतिक्रांतीच्या दारात लाचार होऊन उभ्या असलेले स्वयघोषित हरिजन नेते विचारवंत यांना बुद्धाचा धम्म, डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा विसर पडला आहे.
तसेच आजही जाती पोटजाती भेदाच्या शेणातील किड्यांना तेथेच राहण्याचा मोह आणि अभिमान वाटतो त्यांना बुद्ध कसा कळणार. ही वस्तुस्थिती असली तरी या देशातील कोणत्याही माणसाला स्वाभिमानाने, सन्मानाने, समतेने जगायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, हे कुणालाही नाकारता येणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य मान्य करणे तथागताच्या जयंतीनिमित्त खरे अभिवादन ठरेल.
डॉ. सुरेश वाघमारे
ज्येष्ठ विचारवंत, लातूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत