जयंती तर साजरी झाली मूळ समस्यांचे काय?

अनिल वैद्य
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती उत्साहात साजरी झाली.डी जे. डेकोरेशन,गीतकार इत्यादीवर लाखो रुपये खर्चही करण्यात आले.मोठ्या प्रमाणावर वर्गणीतून पैशे जमा केले गेले. तेव्हढी ऐपत आहे म्हणून करू शकलो. हेही खरेच!
वैचारिक कार्यक्रम सुद्धा झाले.
प्रबोधन करण्यासाठी जयंती मंडळानी व्याख्यानमाला आयोजित केल्या. .आयोजकांमध्ये उत्सव साजरा करण्याची जिद्द दिसून आली.
हे सर्व मानवी स्वभावाला धरून आहे.ज्या महामानवाने मृतप्राय समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून जिवंत केले तो समाज कृतज्ञता व्यक्त करणारच!
परंतु काही गंभीर समस्या सुद्धा पुढे आल्या आहेत.
खाजगीकरणा मुळे आरक्षण नष्ट होणे हे मोठे संकट पुढे आले आहे. त्याचाही विचार सामूहिक रित्या झाला पाहिजे म्हणून हा लेख लिहत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा दिवस
जगभर साजरा होतो परंतु आंबेडकरी समाजात तो दिवस सना सारखा साजरा केला जातो.
या निमित्ताने
भारतीय संविधान,सविधानिक मूल्य इत्यादींवर सर्वत्र चर्चा झाली.
काही जयंती समित्यांनी विशेषांक प्रकाशित केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा
गौरव करणे गरजेचे आहे. नविन पिढीला हे माहिती झाले पाहिजे. जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले. स्पर्धा आयोजित केल्या.
समता सैनिक दल यांचे अभिवादन आणि पथसंचल कार्यक्रम याने जयंती कार्यक्रमाला अधिक महत्व आले. नाशिकला एक आगळा वेगळा उपक्रम मोहनभाऊ आडांगळे यांनी राबविला. कोट पॅन्ट अर्थात सूट परिधान करून रॅली काढली.त्यांचे म्हणणे आपण सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरां सारखे दर्जेदार पोशाखात राहिले पाहिजे.
या उपक्रमाला माझे समर्थन आहे.
जयंती निमित्ताने 18 तास अभ्यासाचा उपक्रम राबविण्यात आला.
यातून नुकसान काहीच नाही. सामाजिक उत्तरदायित्व किंवा समाजभान निर्माण करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले यावर दृष्टी टाकू या.28 सप्टेंबर 1952 ला मुंबईला शेडूल्ड कास्ट फेडरेशन आणि इतर संघटनांनी आयोजित कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटा”
समता प्रस्थापित करणे हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मान चळवळीचा उद्देश आहे.त्या साठी त्यांनी विविध उपदेश केले. शिक्षण घ्या . राजकारण ही मास्टरकिल्ली आहे. बौद्ध धम्माचे आचरण. आणि सरकारी नोकरी.
सरकारी नोकरी बाबत ते म्हणाले, “इतरांच्या मनातील विषमतेची भावना नष्ट करण्यासाठी तुम्ही सरकारी नोकरीत गेले पाहिजे. जो समाज सरकारी नोकरी मध्ये असतो त्याची ऊर्जितावस्था होते.”
ते असेही म्हणाले की ब्राह्मणाचे महत्व या साठी आहे की सरकारी नोकरीत आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मोक्याच्या जागा पटकवा.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपदेशानुसार थोडीफार प्रगती होत असताना.
सरकारी उपक्रमाचे खाजगीकरण करणे सुरू आहे. त्या मुळे आरक्षण नष्ट होत आहे.ते शेवटच्या घटका मोजत आहे.
त्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपदेशा
नुसार सरकारी नोकरी पासून वंचित व्हावे लागत आहे.ही अत्यंत गंभीर बाब आहे. वरून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर लागू करण्याची मंजुरी
सर्वोच्य न्यायालयाने सरकारला दिली आहे. या मुळे आंबेडकरी समूहाची झोप उडायला पाहिजे.
शत्रूची चाल ओळखून आपली मोर्चेबांधणी केली पाहिजे.
जयंती साजरी करताना या विषयाचे मात्र गांभीर्य दिसले नाही.
पुढे काय करायचे .?आपली भूमिका काय असेल? या वर चिंतन व्हावे आणि सामूहिक कृती सुध्दा करावी लागेल.
डॉ बाबासाहेबांचे गुणगान, मनुवाद आणि नेत्यांवर टिका अनेक लोकांना फार आवडते.
वक्ता ते ओळखून असतो. टाळ्या मिळवितो.हे सोपे असते. हे ओळखले पाहिजे.
ज्या शिक्षण आणि सरकारी नोकरी मुळे आंबेडकरी समाज पुढे आला
त्यावर संकट आले आहे. त्याचे काय?
अशा मूळ समस्यांचे काय?
सध्याची परिस्थिती पाहता
विदेशात नोकऱ्या शोधल्या पाहिजेत.
तरच या पुढे प्रगती होईल . त्या साठी आधी जे लोक तिकडे गेले त्यांनी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. काही लोक अमेरिका,इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, जपान , नार्वे , दुबई, कॅनडा इत्यादी देशात काम करीत आहेत. त्या देशातील नोकरीचे निकष काय आहेत?हे त्यांनी सांगितले तर येथे तशी तयारी विद्यार्थी करतील.
उदाहरणार्थ जापान मध्ये नोकरी करण्यासाठी जापनीज भाषा अवगत असणे गरजेचे आहे
अशा प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा.
अन्यथा आपल्या देशात सरकारी नोकऱ्या नष्ट केल्या जात आहेत. खाजगीकरण झपाट्याने झाले आणि होत आहे. आता सरकारी नोकरीच्या भरवशावर राहू नये. मात्र शासन प्रशासनात जाण्याचा प्रयत्न सुद्धा सोडू नये.समाजाची देशात प्रतिमा निर्माण करण्याचा तो मार्ग आहे.
विद्यार्थी 8 व्या वर्गात असताना पासून विदेशाची तयारी करावी तरच भवितव्य आहे.
दुश्मन चाल करून आला आहे त्याची चाल ओळखून आपली मोर्चेबांधणी केली पाहिजे.
शैक्षणिक संस्थेत प्रवेश, शिष्यवृत्ती इत्यादी विद्यार्थांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत. आ ट्रॉसिटी कायदा निष्प्रभ होत आहे.बौद्धांना अनुसूचित जातीचे केंद्र सरकारचे आरक्षण घेण्यासाठी महार लिहावे लागते अशा गंभीर समस्या आहेत.
या विषयांवर लिहिणारे व उपाय शोधणारे जयंती विशेषांक हवेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तेच म्हटले,माझा उदो उदो करण्यापेक्षा माझ्यासाठी महत्वाचे जे आहे ते करा .मला वाटते सरकारी नोकऱ्या खाजगीकरण केल्यामुळे गेल्या . थोडेच बाकी आहे तेव्हा तरुण पिढीला रोजगार कसा मिळेल ?
त्यांना उद्योग उभा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदत केली पाहिजे.
ही चिंता व चिंतन करणे गरजेचे आहे.
आता गुणगाण करणे थोडे कमी व्हावे. मर्यादेत व्हावे. कोणत्या बाबींना प्राथमिकता द्यावी
हे निश्चित केले पाहिजे.
आपल्याकडे विद्वान लोक आहेत .ते समस्या शोधू शकतात. त्यावर उपाय योजू शकतात. सक्रिय लोक त्यावर कार्यरत होऊ शकतात. जयंती सारखे सामुहीक प्रयत्न व्हावेत.राजकीय सत्ता नाही म्हणून काहीच होणार नाही ही भावना सोडून दिली पाहिजे. सत्ता हवी हे खरे आहे पण तो पर्यंत समस्येने उग्र रूप धारण केले असेल.
आता संपूर्ण शक्ती शिक्षण आणि देश विदेशातील नोकऱ्या , उद्योग या साठी लावणे प्राथमिक गरज आहे. विषमता नष्ट करण्यासाठी समाजाची प्रगती होणे गरजेचे आहे.
हे प्रयत्न जयंती जशी समूह भावनेने केली जाते त्याच समूह भावनेने
व्हावेत .
शत्रू मारा करीत असताना आम्ही
आनंद उत्सव साजरा करून संतुष्ट होऊ नये.तर आता जयंती साजरी झाली आता मूळ समस्या वर काम करण्याची गरज आहे.
(दैनिक बहुजन सौरभ.नागपूर दिनांक 30 एप्रिल 2025 ला प्रकाशित )
✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत