देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

तूच दिले मला हे जगणं : आंबेडकरवादी कवितासंग्रह

कवी बी. अनिल यांचा आंबेडकर
वादी कवितासंग्रह तूच दिले मला हे जगणं  यातील कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणार्या कविता आहेत.

हे महामानवा,
तूच शिकवले तर्कवितर्क आणि बुध्दिशास्त्र
आणि जीवनशास्त्र
अशा अनेक पिढ्या आल्या आणि जगल्या
अगदी स्वाभिमानशून्य
तसं मीही जगलो असतो
पण तुझ्यामुळे आज माझ्या जगण्यास अर्थ प्राप्त झाला.
(पृ.९)

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या संविधानाच्या मुल्यांचा वारसा या कवितासंग्रहात दिसून येतो.

धगधगतो हा जाळ नखशिखांत
सांग शांतीचे रोपटे लावू कसं?
(पृ.११)
अन्याय अत्याचार याविषयी कवी मन विद्रोहाची भूमिका बजावते. कवी मनाचा बंडखोरपणा कवितेतून दिसून येतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला दूरदर्शीपणा, बुध्दाचा वैचारिक वारसा कवितेतून सहजपणे व्यक्त होतो.

असावी माणसं माणसासारखी
एकमेकांशी प्रेमाने वागणारी
चुकले असेल थोडं फार
तर हक्काने समजावून देणारी
(पृ.१३)
ही कविता वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ठरते.

कोरोना विषयी लिहिलेली कविता देखील लक्षवेधी ठरते.
हे कोरोना करा
तू जेव्हा जाशील
तेव्हा ठेवून जाशील उद्ध्वस्त खाणाखुणा
माणसांच्या कथा पिढ्यानपिढ्या
(पृ.१७)
राजकारणी सत्ता आणि भाडखाऊ  मिडीयावरील कवितेचा आशय वाचकांना ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांची आठवण देऊन जातो.

या अध्यात्म झुंडी
तर्काला बेइमान होऊन
तुडवत सुटतात तळ आणि तळ
जन्म पुर्व जन्माचे भ्रमित मनोपटलावर
रचत जातात सरण जन्माजन्मांतरीचे
(पृ.१४)
गुलाम शास्त्र विरोधी विद्रोहाचा एल्गार कवीने कवितेत पुकारला आहे. देशाच्या इतिहासात अध्यात्म झुंडी मुळे अनेक पिढ्या बरबाद झाल्या हे सत्य नाकारता येत नाही.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ कवी बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके, वि. दा. करंदीकर, यांच्या नंतर दलित कवी कवयित्री देखील १९५६पासून आंबेडकरवादी जाणिवा घेऊन पुस्तक आणि भाकरी साठीचा संघर्ष कथन करू लागले. त्र्यंबक सपकाळे, बाबुराव बागुल, यशवंत देव, हिरा बनसोडे, यशवंत मनोहर या दिग्गज कवी कवयित्रींनी आंबेडकरवादी साहित्याला प्रतिष्ठेचे स्थान मराठी साहित्यात मिळवून दिले.
साहित्य हे संसारातील मानसिक, भावनिक, वैचारिक प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करत असते. प्रत्येक साहित्यकृतीची सृजनशीलता वाचकांना अंतर्मुख करणारी ठरते. यात केवळ भावभावना नसतात तर एक सकारात्मक दृष्टीकोन देणारा विचार असतो. अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या जगातून आशावादी किरण देणारा विचार कवी, कवयित्री पेरत असतात.
याच साहित्यकृतीच्या माध्यमातून सदरचा कवितासंग्रह वाचकांना आंबेडकरवादी जाणिवा देणारा ठरेल यात शंका नाही.

होय, मी आहे माओवादी
तत्पूर्वी मी आंबेडकरवादी आहे
इथल्या मातीतली विषवल्ली उपटून
जर मी पेरत असेन क्रांती
शेतकर्यांची, कष्टकर्यांची आणि शोषितांची
जर क्रांती करणं गुन्हा असेल
तर तो गुन्हा मी करणार आहे
मानवतेसाठी इथल्या जात्यंध गढीला
सुरूंग मी लावणार आहे.
(पृ.१८)
वर्णवर्चस्वाचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे.  प्रत्येक मानवाला लादलेले विचार नाकारण्याचा अधिकार आहे. कर्मकांड विरोधी भाषा विवेकी आणि जागृत सुज्ञ माणूस बोलू शकतो हे आंबेडकर वादाने जगाला दाखवून दिले आहे.

तेव्हा वैचारिक मागासलेल्यांनी
उभारले अनेक पिंजरे
त्यात आयात केला वर्गीय सिध्दांत
काही ठिकाणी पांढरपेशी खादीवाद
आणि अविवेकी सनातनवाद
(पृ.१९)
मुक्तछंद प्रकारातील कविता आंबेडकरवादी जाणिवांनी भरलेल्या आहेत.
प्रज्ञा, शील, करुणेचा चिंतनगर्भ झरा या कवितेच्या विचारातून वाहत आहे. असे जाणवते.

रोगी आहे कोणी, जखम त्याची धुवू
मित्र आहे कोणी, सत्य तेच बोलू
या भू मातेशी इमान आम्ही राखू
धम्म तो एकच समतेचा मानू
(पृ.२१)

संपूर्ण जगाला बुध्दाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही हे सत्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६साली जाहीरपणे मांडले होते. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन अनेक कवी कवयित्री लिहू लागले. सम्यक ज्ञानाचा वारसा लेखनातून साकार होऊ लागला.

तूच दिले मला हे जगणे हा कवितासंग्रह मानवी नितीमूल्यांना अधोरेखित करणारा आंबेडकरवादी जाणिवांचा कवितासंग्रह आहे.

भय वाढत चाललंय इथे
कुठली अजान आणि कुठली प्रार्थना
आसमंत व्यापत चालली विकृत माणसं
मग दोष का द्यावा श्वापदांना
(पृ.२६)
माणसाच्या मनातील जनावर अत्यंत विकृत आणि घातक ठरत आहे. कुठे उरली नाळ आणि नाती हा प्रश्न वाचकांना विचारप्रवृत्त करतो.

दरवर्षी येते जयंती
तसं दरवर्षी येत असतं नवचैतन्य
दररोज उगवणार्या सूर्यासारख
दरवर्षी बहरत असणार्या वसंत ऋतूसारख
दरवर्षी बरसणार्या पावसासारख
तसं आम्ही आतून उमलून जातो
आणि हे चैतन्य प्रतिबिंबासारखं रूजत जातं
कवितेतून, कथेतून, तुझ्या ग्रंथातून, व्याख्यानातून, गाण्यातून
(पृ.२७)
भीम जयंतीच्या माध्यमातून जल्लोष साजरा करतांनी बाबासाहेबांनी पेरलेले विचार लाखो अनुयायी स्वीकार करतात.
बाबासाहेबांनी दिलेल्या बुध्दतत्वातून कवी मन खंबीर होत जाते.
मुक्तपणे विहार करणारे मानवी मन या कवितासंग्रहात साकारले आहे.
वांझ वैचारिक सत्तेला उलथून टाकले पाहिजे हा आंबेडकरवादी जाणिवांचा अनुभव कवी मनातून व्यक्त होत जातो.
बाईचा धर्म महासागरासारखा अथांग ठरतो ही जाणीव देणारी कविता बाय तुझा धर्म कोणता? ही कविता लक्षवेधी ठरते.

किती दिवस भीत रहायचं बाजारबुणग्यांना आणि शोषकांना?
फोडावेच लागतील खडक आणि ओंजळीने पाणी प्यावे लागेल?
(पृ.४३)
विद्रोहाचा एल्गार पेरणारी प्रत्येक कविता वाचकाला अंतर्मुख करते.

तुझ्या नावाला मी जेव्हा साद घालतो
तेव्हा थोतांड रचणारी माणसं अस्वस्थ होतात
त्यांना सत्य नाकारता येत नाही तुझ्यातलं
(पृ.५०)
जाणिवांचे पंख घेऊन मुक्त आकाशात विहार करणारी कविता लोकशाही देशातील भयानक अवस्था सहजतेने कथन करत जाते ही विशेषता या कवितासंग्रहाची आहे.
आंबेडकरवादी वैचारिक वारसा देणारा हा कवितासंग्रह कृतज्ञता व्यक्त करणारा ठरतो.
यापुर्वी देखील बी. अनिल यांनी अनेक कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, ललित संग्रह, आत्मचरित्र, भाषांतरित साहित्य या माध्यमातून लेखन ठसा साहित्य क्षेत्रात उमटविला आहे.
आंबेडकरवादी जाणिवांचा अनुभव देणारा कवितासंग्रह तूच दिले मला हे जगणं या साहित्य कृतीचे वाचक नक्कीच स्वागत करतील अशी अपेक्षा ठेवून कवीच्या लेखन प्रवासाला अनेक शुभेच्छा व्यक्त करते.

पुस्तकाचे नाव
तुच दिले मला हे जगणं
कवी बी. अनिल
अदिती प्रकाशन ठाणे
किंमत २००₹
संपर्क ९८६०१३३९५०

समीक्षक
प्रज्ञा हंसराज बागुल दिग्रस जि यवतमाळ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!