बौद्ध धम्म संवर्धनासाठी जयंतीचे उत्सव हे प्रबोधनाचे महोत्सव ठरावेत !

– सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर
खारघर, नवी मुंबई
दि.१९ एप्रिल:
जयंतीचे उत्सव हे बौद्ध धम्म संवर्धनाच्या दृष्टीनं प्रबोधनाचे महोत्सव ठरावेत यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, हे दिवस बौद्ध समाजानं सण म्हणून स्वतंत्रपणे साजरे करावेत. ते करताना बौद्ध धम्मात इतर कोणत्याही विचारांची भेसळ होऊन संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी जयंती उत्सव मंडळानी घ्यावी असे रोखठोक प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी खारघर येथे बोलताना केले.
युगंधर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमातील प्रबोधन सत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल जी. जाधव होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्ती लढ्याशी संबंधित बौद्ध इतिहास, साहित्य आणि संस्कृतीचे अनेक संदर्भ देत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रा. आनंद देवडेकर पुढे म्हणाले की, इतर समाज सुधारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं चुकीचं नाही. कृतज्ञता व्यक्त करणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आणि बौद्ध समाजानं ती नेहमीच व्यक्त केली आहे; परंतु ही कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माला साजेशा सामाजिक पुनर्बांधणीच्या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. स्वीकारलेल्या बौद्ध धम्मात विविध विचारांनी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आणि समाजात बौद्ध संस्कृती रुजविण्याचे मुख्य ध्येय नजरेसमोर ठेवून जयंती उत्सव मंडळानी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेसह जयंतीचे उत्सव हे स्वतंत्रपणे सण म्हणून साजरे करावेत असेही प्रा. देवडेकर आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.
संस्थेच्या वतीनं अध्यक्ष अनिल जी. जाधव यांच्या हस्ते प्रा. आनंद देवडेकर यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाच; परंतु खूप वर्षांनी मित्रभेटीनं आनंदीत झालेल्या कोषाध्यक्ष एकनाथ कांबळे यांनी सहकुटुंब प्रा. आनंद देवडेकर यांचा स्वतंत्रपणे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
या प्रसंगी चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. या प्रबोधन सत्राचे प्रास्ताविक उपाध्यक्ष आर.जी. त्रिभुवन यांनी केले तर अध्यक्ष अनिल जी. जाधव यांनी आभार मानले. सिद्धार्थ मेश्राम, उत्तम तरकसे, आव्हाड यांच्यासह कार्यक्रमात खारघर स्थित मराठा सेवा संघाच्या मान्यवर कार्यकर्त्यांसह अनेक जण बहुसंख्येने उपस्थित होते त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत