दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

संत गाडगे महाराज जयंती निमित्त विशेष लेख ……..

संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त थोडक्यात त्यांच्या जीवन आणि कार्याचे स्मरण आणि थोडासा उजाळा ………

आता वाचा सविस्तर लेख …….

अस्वच्छता अंधश्रद्धा,अज्ञान यांना मुळासकट उखडून काढण्यासाठी संत गाडगे बाबांनी तळमळीने कार्य केले आहे . हा संत म्हणजे हल्लीच्या सो कॉल्ड संत,बापू सारखा पैसा,मौजमज्जा, किंवा कोणत्याच व्यभिचारात अडकणारा नव्हता तर,देवळात जाऊ नका तिथे देव नसून पुजाऱ्याचे पोट असते,सावकाराचे कर्ज काढू नका,पोथी पुराणे,मंत्र-तंत्र,चमत्कार, देवदेवस्की वर विश्वास ठेवू नका,अडाणी राहू नका अशी शिकवण आयुष्यभर लोकांना देणारे ते पुरोगामी विचारांचे संत होते !

त्यांनी कधी लोकसेवेच्या नावावर कोणतं मंदिर वगैरे बांधायला वर्गणी काढली नाही,पैसा जमा केला नाही . लोकांच्या अस्मितेला स्पर्श करून त्यांना देणगीसाठी प्रवृत्त केलं नाही,किंवा एखादे मंदिर बांधले म्हणजे देश महासत्ता होईल असा ही गैरसमज कधी पसरवला नाही,उलट माणसातच देव आहे हे शोधणाऱ्या या आधुनिक संताने लोकांनी देणगी दिलेल्या पैशातून अनाथ लोकांसाठी,रंजल्या- गांजलेल्यांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा,अनाथालय,आश्रम,विद्यालय सुरू केले . दिन-दुबळे,अनाथ हेच त्यांचे देव होते व यांच्यातच ते रमत असत. गाडगेबाबांच्या मुलाच्या बारश्याच्या वेळी त्यांनी रूढीप्रमाणे दारू-मटणाच्या जेवणाच्या परंपरेला लाथाडून गोडधोड जेवण ठेवले होते .हा त्याकाळातील परंपरेला दिलेला फार मोठा छेद होता .जबरदस्त धक्का होता.गाडगेबाबा जवळ नेहमी एक खराटा असायचा,ते ज्या गावात जायचे ते गाव झाडून स्वच्छ करीत,अंधश्रध्दा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, पण काही नालायक वृत्तीची लोकं “स्वच्छ भारत अभियान” नावाने मोहीम राबवताना गांधींचा चष्मा दाखवतात,सोबत या अभियानाचा जनक म्हणून स्वतःचाच प्रचार करतात, अशांची गाडगेबाबांच्या झाडूच्या शेजारी उभे राहण्याची देखील लायकी नाही, हीच लोकं क्रांती-प्रतिक्रांती खेळ खेळतात,आधुनिक संत गाडगेबाबांना डावलून स्वच्छता अभियानात स्वतःचा चेहरा प्रेझेंट करून, येणाऱ्या पिढीच्या वैचारिक मूल्यात आपली प्रतिक्रांती घुसवतात आणि हे करण्यासाठी त्यांची संपूर्ण टीमच नेहमी तत्पर असते !

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला , राम – कृष्ण हिंदू देवदेवता नाकारल्या , पण डॉ . बाबासाहेबांचे परममित्र आयुष्याच्या अखेर पर्यंत गोपाला गोपाला , देवकी नन्दन गोपाला गात राहिले !

अर्थात डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज सदैव मित्रत्वाच्या नात्याने सोबतच राहिले होते , ते दोघेही एकाच ध्येयाच्या दिशेने चालणारे वाटसरु होते !

समता आणि ममता हाच आजचा धर्म आहे . असे सांगत गाडगेबाबांनी प्रस्थापित धर्म नाकारला ,आणि कर्मठरूढी , अंधश्रद्धा ,कर्मकांडावर आपल्या प्रवचनातून जबरदस्त असे प्रहार केले !

तुम्ही जर मला या आधी भेटला असतां तर मी धर्मशाळा बांधण्याऐवजी शिक्षणासाठी शाळा बांधल्या असत्या . असे संत गाडगेबाबा प्रज्ञासुर्य , ज्ञानमहर्षी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात . एव्हढेच नाहीतर पंढरपुरची धर्मशाळा डॉ . बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नांवाने करतात !

स्वच्छतेच्या विचारा बरोबरच शैक्षणिक विचाराने झपाटलेल्या गाडगेबाबांनी आपल्या प्रवचनांतून घोषवारा केला की ,
खर्चु नका देवाधर्माच्या नावाखाली पैसा
शिक्षणासाठीच खर्चा पैसा ,घडवा समाज सुशिक्षित ऐसा !

पोटचा एकुलता एक पोरगा वारल्या नंतर स्थितप्रज्ञ असणारे गाडगेबाबा डॉ . बाबासाहेबांचे ६ , डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाल्याचे कळताच एखाद्या बापाचा एकुलता एक पुत्र निर्वतवा आणि त्या बापाने धायमोकलुन रडावे , विलाप करावा तसाच विलाप गाडगेबाबांनी डॉ . बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा च्या वेळी केला !

परिणामी त्यांनी अन्नपाणी त्यागुन आवघ्या पंधरा दिवसांत म्हणजे २० , डिसेंबर १९५६ रोजी आपला देह त्यागला !

डॉ .बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबां पेक्षा सोळा वर्षानीं लहान होते . म्हणूनच गाडगेबाबां डॉ . बाबासाहेबांवर अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाने प्रेम करीत होते . जीव , माया लावीत होते !

संत गाडगेबाबा संत तुकारामांना आपले गुरू मानत,देवभोळ्या व्यक्तींपासून ते नास्तिक व्यक्तीपर्यंत सर्वांना ते आपल्या कीर्तनात मग्न ठेवीत असत, हल्ली कीर्तन म्हणजे फॅशन आणि विशिष्ट धर्माचे विचार थोपविण्याचा सरळ सोप्पा अड्डा झाला आहे,म्हणूनच कीर्तनाच्या नावाखाली स्त्रियांनी असेच वागावे,हेच घालावे,अमुक संस्कृती जपावी, मर्यादा पाळाव्यात वगैरे सांगून एकार्थाने मनोस्मृतीला सुप्तपणे गोंजारलं जात आहे. गाडगेबाबांच्या किर्तनाविषयी बोलताना एकदा चरित्रकार प्रबोधनकार , केशव ठाकरे म्हणाले की,”गाडगेबाबांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे,माझ्या ताकदी बाहेरचे काम आहे .गाडगेबाबांनी आळंदी,नाशिक,पंढरपूर,देहू या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या.गरिबांसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, नदी काठी घाट बांधले, कुष्ठरोग्यांची सेवा केली,अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था केली. म्हणूनच तर थोर पत्रकार आचार्य अत्रे यांनी गाडगेबाबां बद्दल उद्गार काढले होते की , संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील समाजवादाचे पुरोगामी विचारांचे प्रचंडअसे व्यासपीठ आहेत असे उद्गार काढले होते !

इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की,कोणीही महापुरुष,संत सहज होत नाही त्यासाठी त्या त्या काळातील व्यवस्थेविरिद्ध बंड पुकारून छाती ठोकून , दंड ठोकून उभे रहावे लागते . येणाऱ्या परिस्थितीला वाकवण्याची धमक त्यांच्यात असते . पण अशीही काही विरोधक प्रवृत्तीची जमात जिवंत आहे जी पुरोगामी विचारांच्या क्रांती विरुद्ध प्रतिक्रांतीचा खेळ मांडून अशा महापुरुषांना त्यांच्या विचारांना दाबू इच्छिते,येणाऱ्या पिढीला Revolution and counter revolution हत्यार वापरून या विचारांपासून दूर ठेवू इच्छिते,त्यांचे हे मनसुबे हाणून पाडायला आपण या पुरोगामी समाज सुधारण्याच्या गोष्टी वेळोवेळी मांडणे,लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे कारण, अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर,”माणूस मर्त्य आहे पण त्याचे विचार मर्त्य नाही” हे मॅझिनी चे मत खोडून काढताना म्हणाले होते माणूस मर्त्य आहे आणि त्याचे विचार ही मर्त्य आहेत,जर का त्याच्या विचाराचे संवर्धन करणारा समाज तयार झाला नाही तर..म्हणून विचार संवर्धित करून त्यावर क्रिया करणे महत्वाचे आहे !

संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम

   तसेच फेसबुक वरील सर्व मित्रांना संत गाडगे महाराज जयंती निमित्त 

हार्दिक शुभेच्छा
आणि मंगल कामना !

प्रस्तुतकर्ता – विठ्ठल साळवी ( बौद्धाचार्य )
माझगाव ताडवाडी ( मुंबई )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!