जामिनावर सुटलेला काळा घोडा समका कालीन व्यवस्थेला फैलावर घेणारी कविता

डॉ.डी एस सावंत
एम.कॉम एल एल एम.
एमबीए फायनान्स एम फिल
लॉ पीएच् डी मुंबई.
चीफ मॅनेजर
सेंट्रल रेल्वे बँक मुंबई.
मुख्य संपादक दैनिक जागृत भारत
भ्र.९९६९०८३२७३
धनाजी धोंडीराम घोरपडे आपणांस सस्नेह नमस्कार आपला उपरोक्त कवितासंग्रह अत्यंत वैचारिक, उपरोधक आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध पाचर मारणारा आहे! आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, आशा कातर वेळी आपला कवितासंग्रह यावा.. तो अनेक वाचकांनी वाचावा… आणि त्यावर असंख्य प्रतिक्रिया याव्यात यासारखे यशस्वी गोष्ट दुसरी नाही!! जर तुम्ही समाजाला वास्तववादी, सत्याची बाजू आणि गरिबांचा कैवार घेणारे लेखन करीत असाल तर निश्चितच ते जनसामान्यांकडून उचलून धरलं जातं, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे “जामिनावर सुटलेला काळा घोडा” होय !!
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार डॉ आनंद पाटील यांची कवितासंग्रहाला लाभलेली प्रस्तावना अप्रतिम वाटली. वीरधवल परब यांचा
मलपृष्ठावरील आशयघन मजकूर आतील कवितांच्या विधानांना पुष्टी देणारा आहे. मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या प्रवृत्ती फोपावत असताना.. अपवाद वगळता, बऱ्यापैकी प्रस्थापित मूग गिळून बसले असताना, आपण बंडाचे निशान फडकवावे यासारखे धैर्य नाही. काळाला बदलण्याचे धैर्य आणि वास्तववादी भान समाजाला देण्याचे मौलिक कार्य आपण या कवितासंग्रहातून करता आहात याचे विशेष कौतुक वाटते.
संपूर्ण समष्टीच्या जगण्यावर आलेल्या अरिष्टा विरोधात धैर्य प्राप्त करून देणारी आपली वाड्मयीन कलाकृती निर्भीडपणे राज्यकर्त्यांवरती, न्यायालयीन प्रक्रियेवरती सरळ सरळ प्रहार करताना दिसते. गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा कैवार घेत सर्वसामान्यांनी भीक मागावी तर कुठे? हा सणसणीत सवाल व्यवस्थेला करून सर्वांनाच भानावर आणण्याचे काम आपण या कवितासंग्रहाद्वारे केले आहे.
आ SS थू!
तुझ्या शास्त्राच्या पोतडीवर मुतायला
मी इराणची गाढवं आणायला निघालोय. (पोतडी- पृष्ठ क्र.३७)
‘नांदा सौख्य भरे’
नववधूचा चेहरा कुलदैवताने पाहिल्याशिवाय
संभोग स्वातंत्र्याचा पेटत नाही हिरवा कंदील
अशा अलिखित नियमांची पत्रिका मलाही भिजवायची आहे
बाहेर बसलेल्या बाईच्या ऋतूमासाच्या रुधिरात
(हिरवा कंदील- पृष्ठ क्र.६३)
धर्मांध परंपरेला फाट्यावर त्यातला दांभिकपणा वाचकांच्या समोर ठेवण्याचं धारिष्ट्य कवींची ठोस भूमिका नक्कीच दखलपात्र आहे.खूप दिवसांनी कोणीतरी या दांभिक आणि मुर्दाड व्यवस्थेला बौद्धिक चपराक देत, बाजार बुणग्यांची चांगली धिंड कम वरातच काढली आहे!! बौद्धिक खुजी माणसं स्वतःच चांगभलं करून घेण्यासाठी एकमेकांवर अवास्तव मोठेपणाची मुक्ताफळे उधळताना, आपल्या शब्दरूपी षटकारानी ते अस्ताव्यस्त होताना या कवीतासंग्रहात दिसून येतात.आपण लहान वयात व्यवस्थेला आरोपीच्या मोठ्या पिंजऱ्यात उभे करून, येथील अन्याय अत्याचार आणि अनाचाराची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगून त्याची त्याची चांगलीच चिरफाड केलेली आहे. त्यांच्या अशा वागण्याने भाबडा आशावाद ठेवून अशाळभूत नजरेने वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत बसलेला समाज कसा वैफल्यग्रस्त होत चालला आहे, याची जाणीव प्रस्थापितांना करून देण्यामध्ये आपण प्रकर्षाने अग्रभागी दिसत आहात. खूपच वाजवी अपेक्षा ठेवून सुद्धा भ्रमनिरास निराश करणाऱ्या या व्यवस्थेला काय म्हणावे आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकरी त्यांचं जगणं त्यातील बारकावे नेमके पणाने टिपून इथल्या अप्पलपोटी राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. बेकारी बेरोजगारीने उच्छाद मांडला असताना राज्यकर्त्यांनी कुंभकर्णाप्रमाणे निद्रिस्त व्हावे याच्यासारखे दुसरे भारतीय भूप्रदेशाचे दुर्दैव नाही.
देश विकताहेत लीजवर
माणसं जळताहेत वणव्यासारखी
प्रेतं उठून बसत नाहीत हल्ली
मन की बात ऐकायला कानात जीव ओतून
(मन की बात- पृष्ठ क्रं.८०)
कोरोना काळात राज्यकर्त्यांनी केलेले कहर त्यांची असंवेदनशीलता आणि बिनडोकपणा वरती नेमकेपणाने केवळ बोटच ठेवले नाही तर त्यांच्या निर्बुद्धपणाचे आपण बेधडकपणे वाभाडेच काढले आहेत. आपली ही कविता क्रांतिकारी असून जगण्याला उभारी देणारी आहे. तसेच ही कविता समाजाला व राज्यकर्त्यांना भानावर आणणारी आहे. जामिनावर सुटलेला काळा घोडा ही शीर्षक कविता समकाळातील व्यवस्थेच्या पडझडीवर निव्वळ भाष्य नसून प्रहार करणारी आहे. ती कुठेही भीड बाळगताना दिसत नाही. अगदी रोखठोक मौलिक विधान करते. सत्तेच्या बुडाखालचा अंधार दाखवते. व्यवस्थेला भिडण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी क्रांतीचे पुल्लिंग कवितांच्या माध्यमातून चेतवावे व आपल्या लेखणीने समाजाला दिशादर्शक व्हावे.
कवितासंग्रह- जामिनावर सुटलेला काळा घोडा
कवी- धनाजी धोंडीराम घोरपडे
भ्र.९४२१३०३७०२
प्रकाशन संस्था- ललित पब्लिकेशन मुंबई
पृष्ठ संख्या – १३५
मूल्य- २००₹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत