शिंदे पवार यांनी दिल्ली वारी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटेना. ठाणे कल्याण मतदारसंघांसाठी शिवसेना ठाम.

मुंबई : भाजपच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटपा कडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लवकरात लवकर सर्वांची सहमती होऊन निर्णायक पावले उचलली जावीत यासाठी प्रयत्न चालू आहेत.
या मालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोहोचले. शहा यांच्यासह दोन्ही नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत चालली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत आल्यावर आपले खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मीनाबागेतील सरकारी निवासस्थानी गेले व तेथून ते शहा यांच्याकडे पोहोचले. पवार व सुनील तटकरे सायंकाळी दिल्लीत येताच प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गेले. सुरुवातीला बैठक सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार असे सांगितले गेले, तरी प्रत्यक्ष दोन्ही नेते शहा यांच्याकडे पोहोचण्यास रात्री साडेनऊ वाजून गेले होते. त्यानंतर जागावाटपाबाबत सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने ठरवलेल्या सूत्रानुसारच जागावाटप होईल व अजूनही शिंदे व पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्याची भाजप हायकमांडची तयारी दिसत नाही. “विजयाची खात्री” हाच निकष भाजपने लावला आहे व यापुढेही लावू, असेही शहांनी पुन्हा स्पष्ट केल्याचे समजते.
दुसरीकडे, परिवार वादावर बोलणारे आता मुलाच्या खासदारकी साठी आग्रही. मुंबईतील जागा भाजपला सोडण्यास शिवसेना तयार असल्याचंही बोललं जात आहे. परंतु ठाणे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघांसाठी शिवसेना ठाम आहे. ज्या खासदारांचं तिकीट कापलं जाईल, त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं केंद्रीय नेतृत्वाकडून आश्वासन मिळण्याची चिन्हं आहेत. विधानपरिषदेवरील रिक्त किंवा राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकांची ही पद्धत लोकशाही मजबूत करेल की खिळखिळी करेल हे सुज्ञ मतदारांनी ओळखून येत्या निवडणुकामध्ये मतदान करावे अशी बुद्धिजीवी वर्गातून चर्चा होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत