संविधानावर हल्लबोल करुनदहशतवाद वातावरणाची पेरणी

१ जानेवारी २०१८ रोजी संभाजी भिडे या संघाच्या समर्थकाला हाताशी धरून भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणा-या परिवर्तनवाद्यांच्या गाड्या अडकवून जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. संघप्रणित मनुद्वेष पुन्हा उफाळून आला असून, परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांकरवी विटंबना करण्यात आली आहे. याचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी अनुयायी व महिलांवर बेछुट लाठीचार्ज करण्यात आला. यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावेत हा योगयोग नसून, जुळवून आणलेले षड्यंत्र म्हणता येईल. गृहखात्याचा इतका दुरुपयोग यापूर्वी कधीच झाला नव्हता. परभणी घटनेतील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू व्हावा ? यामागील प्रवृत्तींना ओळखायला हवे.
परभणी, नांदेड, बीडसह मराठवाड्यात नेहमीच अशांतता कशी राहिल याची नेहमीच काळजी घेण्यात आली. वादग्रस्त राहिलेले जिल्हे ही ओळख ठरत गेली. मुख्यमंत्र्यांची गृहखात्यावर जबरदस्त पकड आहे. त्यांच्या आदेशाशिवाय पोलीस कोणावरही कारवाई करू शकत नाही. भारताचे संविधान सार्वभौम आहे हे शेंबड्या पोरालाही माहित आहे. असे असताना परभणीत संविधान शिल्पाची मोडतोड का होते? संविधानविरोधी मानसिकता निर्माण करणा-यांचा शोध घेण्याऐवजी या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या संविधान प्रेमींनाच कायद्याचा बडगा दाखवून अटक करणे हा लोकशाहीचा तर अवमान आहेच, पण देशाच्या एकूणच सार्वभौमविरोधात काही विघटनवादी शक्तीच हा नीच डाव खेळत आहेत असे म्हणावे लागेल. संविधानशिल्पाचा अवमान होत असताना समाजपुरुष जागा होणे हे राष्ट्रप्रेमाचे प्रतीक होय. भारताच्या प्रत्येक सच्चा नागरिकामध्ये हे प्रेम असते. राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्ती ही संविधानाला सशक्त करणारी नैत्तीकमूल्ये होत. संविधान हे कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा समाजाचे नाही. असे असताना एक प्रवर्ग संविधानाचा अपमान करणा-या प्रवृत्तीविरोधात रस्त्यावर उतरतो, उर्वरित वर्ग, जातीघटकांना संविधान मान्य नाही असे गृहीत धरायचे का? वडार समाजातील सोमनाथ सुर्यवंशी हा तरूण आंदोलनात उतरतो. त्याला अटक होते. पोलीस कोठडीत डांबले जाते, दुस-या दिवशी त्याचा कोठडीत मृत्यू झाल्याची बातमी या घटना पाहिल्यावर हा एका चळवळीतील कार्यकर्त्याचा सरळ सरळ झालेला खून आहे, निर्घुणपणे करण्यात आलेली हत्या आहे! ज्या, ज्यावेळी महायुती सरकार सत्तेत आले त्यावेळी सामाजिक तणाव निर्माण केले जातात. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते या प्रवृत्तींविरोधात लढू पाहतात तेव्हा ते भावनिक होत असतात असा ठपका ठेवला जातो, याचा अर्थ संविधानाची कितीही, कुणीही विटंबना केली, संविधानाची पायमल्ली केली तरी चालेल असा या देशातील नागरिकांना, राज्यकर्त्यांना मान्य आहे असे तर ठरविले नाही ना?
या प्रवृत्तीमागे कोणत्या छुप्या शक्ती दडलेल्या आहेत हे सुरक्षा व्यवस्थेला चांगले माहित त्रआहे. या घटनांच्या मागे कोण आहेत हेही माहित आहे, तरीदेखील सुरक्षा व्यवस्था कारवाई करण्यास धजावत नाही याचा अर्थ काय असू शकतो? सुरक्षा व्यवस्था कोणाच्या दबावाखाली काम करते? याचा शोध आता घेण्याची वेळ आलेली आहे. संविधान बदलण्याची भाषा करणा-यांना अपयश आल्यामुळे अशाप्रकारचे तणाव निर्माण करून उपद्रवमूल्ये घडवून आणण्याचे कारस्थान रचले जात आहे हे आपल्या लक्षात येते. एका निरपराध तरुणाची हत्या झाल्यानंतर सरकारमधील उच्चपदस्थ अवाक्षर काढत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात गर्क आहेत. राज्याचा, देशाचा कारभार ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाचे अवमूल्यन होत असताना मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा वाटतो. फडणवीस आणि लिमिटेड कंपनीने हा छुपा हैदोस सुरू केला आहे. संभाजी भिडेची मात्रा चालत नाही, असे लक्षात येताच दुसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न दिसतो. शनिवारी संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधान दुरुस्तीचा ठपका ठेवीत काँग्रेसला जबाबदार धरले. तर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या संविधानविषयक भूमिकेचा प्रश्न उपस्थित करून सत्ताधा-यांना निरुत्तर केले! या स्पर्धात्मक राजकारणात विधायक प्रश्न बाजूला राहतात. राजकारण्यांना त्यांच्या कलाने संविधान राबविणारी यंत्रणा उभी करायची असते. त्यांनी निष्ठा केव्हाच पायदळी तुडवलेली असून, स्वार्थांध राजकारणाने विचका केलेला दिसतो. अशीच स्थिती राहिल्यास अराजकसदृश्यता फार दूर नाही. विधानसभेच्या निकालाने ही छुपी अराजकता अधोरेखित झालीच आहे. पण जनतेत त्याचे पडसाद उमटताच, संविधानावर हल्लाबोल करून दहशत निर्माण करण्याकडे कल दिसतो.
गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर
रविवार, दि.१५ डिसेंबर,२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत