भाजपने देश घेरलाय !

रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत साहित्यिक समीक्षक अभ्यासक आहेत
भाजप भारतभर होतेय. संघ कसून भिडलाय. सारासार विचार करणाऱ्यांनी जमिनी वास्तव (ground reality) ध्यानात घ्यावे. ती सवय बरी.
राजकीयदृष्ट्या भाजपने भारताला घेरलेय म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
भाजपचा विचार करतांना दिल्ली संसद एव्हढाच विचार करता येत नाही. तिथली त्यांची सदस्यसंख्या म्हणजे सारे असे नव्हे. भानगडींचा काथ्याकूट सांगणे हेच नसते. प्रासंगिक मेळावे एव्हढेच उत्तर नसते. मोसमाआधीची नांगरणी-वखरणी महत्वाची. ती नेमकी संघ-भाजपच्या ताब्यात दिसते. त्यांना पूर्ण भारत घ्यायचाय. कदाचित ताबेदारीत घ्यायचाय. जाळेफेक जोरात सुरू आहे. लाभार्थी वाढताहेत. वाढवताहेत. ते करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सत्तेचा स वा दु दोन्हीही उपयोग सुरुय. सारे ठरवून चाललेय.
भारत ताब्यात घ्यायचाय. घ्यायचा म्हणजे घ्यायचाच.
तो भाजपला विधानसभा मार्गे घ्यायचाय. ती उकल दिल्ली विधानसभा निवडणुकीत नुकतीच झाली. तिथे सारा जोर लावला. दिल्ली सर केली. वर्षअखेर बिहार विधानसभेची निवडणूक आहे. आता जोर तिथे. तशी तयारी सुरू झालीय. या २६ फेब्रुवारीला बिहारात तिसरा मंत्रीमंडळ विस्तार झाला. भाजपने तीन मंत्री वाढविले. जातीय संतुलन साधण्याचे केले. स्वतः भाजपकडे ८० आमदार आहेत. जदयूकडे केवळ ४५ आहेत. पण केंद्रामुळे नितीशबाबूंना झेलणे क्रमप्राप्त झाले. तिथे ४ आमदारांचा हम पक्षही सत्तेत आहे.
येत्या आक्टोबर नोव्हेंबर मध्ये बिहारात निवडणूक होणे जवळजवळ पक्के आहे.
बिहारनंतर २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुदुचेरी या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होतील. या राज्यातील लोकसभा क्षेत्राच्या आकड्यावरून लोकसंख्येचा व भारतीय सत्तेचा आवाका लक्षात यावा. पश्चिम बंगाल (४२), तामिळनाडू (३९), केरळ (२०), आसाम (१४) व पुदुचेरी (१) अशी संख्या आहे. बिहारमध्ये (४०) लोकसभाक्षेत्रे आहेत. यातल्या बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व केरळ या राज्यांवर भाजपने लक्ष केंद्रित केलेय. ती अधिक लोकसंख्येची, लोकमत ठरविणारी व अधिक लोकसभा सदस्य देणारी राज्ये आहेत. तामिळनाडूचा इतक्यात नाद कमी केला. हाती काही लागत नाही. तिथे द्रविडी विचार पक्का रूजलाय. मुख्यमंत्री स्टालिन हेही वैचारिक पक्के आहेत. परिणामी बिहार, पश्चिम बंगाल व केरळ यावर भाजपने लक्ष केंद्रित केलंय.
पश्चिम बंगाल आणि केरळ ही साम्यवादी विचारातील राज्ये आहेत. तिथे हिंदू धर्मविचार कसा पसरेल याकडे संघ भाजप लागलेय. पश्चिम बंगालात तसे यश मिळतांनाचे दिसते. आधी भाजपने साम्यवाद्यांना निष्प्रभ करण्यास ममता बॅनर्जींंना बळ दिले. आता त्यांचेठायी ममता लक्ष्य आहेत. ममता बॅनर्जी हे व्यक्तित्व आहे. ममता बॅनर्जी हा विचार नव्हे.
संघही पसरतोय. नुकतीच संघाने कलकत्त्यात दणक्यात संघरॅली घेतली. सरसंघचालकांनी संबोधन केले. रॅली आयोजनाला राज्यसरकारचा आक्षेप होता. संघाने उच्च न्यायालयातून परवानगी आणली. बंगाली समुदायाचे देवीप्रेम जगख्यात आहे. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक दलित संख्या असलेल्या या राज्यात आंबेडकर विचार नसल्यासारखा आहे. ममता बॅनर्जीला पर्याय भाजप या मानसिकतेकडे पश्चिम बंगाल ढकलल्या जात आहे. साम्यवादी व कांग्रेस यांचा आधीसारखा जोर दिसत नाही.
केरळचा विचार केल्यास केरळमध्ये साम्यवादी किंवा कांग्रेस असा सामना असायचा. हे किंवा ते असे चित्र असायचे. बहुधा साम्यवादी सत्तेत असत. पण अलीकडे वेगाने भाजप वर येतेय. धर्म, मंदिर हा घंटानाद जोरात निनादतोय. संघ भाजपच्या विशेष बैठका उठसूठ केरळला होतांना दिसतात. सध्या सत्ता साम्यवादी हातात आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे कृतीशील आहेत. त्यांना राज्य व पक्ष दोन्हीही सांभाळायचे आव्हान पूढे ठाकले आहे.
केरळचे कांग्रेस नेते के सी वेणुगोपाल व रमेश चेन्नीथला देशभर पक्षकामात असतात. शशी थरूरला स्थिरता नाही. राहुल गांधींनी वायनाड सोडले. प्रियंका गांधी नव्या आहेत. शिवाय वायनाड हे केरळच्या एका कोपऱ्यावर आहे.
केरळमध्ये पुन्हा साम्यवाद्यांकडे कौल जातो की वेगळेच घडते हे नाट्यमय राहील. भाजप तिथल्या हिंदूपाठोपाठ ख्रिस्ती व मुस्लिम यांचेही तुष्टीकरण करतेय हे विशेष. केरळ संदर्भात कांग्रेसच्या दिल्ली येथे बैठका सुरु आहेत.
तरीही , केरळचा मतदाता हा उर्वरित भारतासारखा देवभोळा नाही हेही खरंय.
पश्चिम बंगाल घडामोडींनी ममता बॅनर्जी चौकस दिसतात. त्यांनी तात्काळ जवाबी हमला सुरु केला. भाजपला नंबर एक शत्रू घोषित केले. नुकतीच तृणमुलची जागरण रॅली नेताजी इनडोअर स्टेडियम येथे झाली. तिथे हे घोषित केले. २१४ पेक्षा एकही कमी नको हे घोषित केले. जोश आणि जोर भरला. २०२१ च्या विधानसभेत तृणमुलला एकूण २९४ पैकी २१४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे संघभाजप गोटात चिंता वाढली. २०११ पासून पश्चिम बंगाल तृणमुलच्या ताब्यात आहे.
२०२६ नंतर २०२७ मध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब व मणिपूर या सहा राज्यांत विधानसभा निवडणुका होतील. त्यानंतर २०२८ मध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश व इतर ४ राज्ये असे दहा राज्यात विधानसभा निवडणुका होतील.
२०२९ हे पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे.
आजघडीला भाजपचे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगढ, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा व मिझोरम या १३ राज्यात मुख्यमंत्री आहेत. मणिपुरच्या मुख्यमंत्र्याने नुकताच राजीनामा दिला.
बिहार (जदयू) , आंध्र प्रदेश (तेलगुदेशम) व तीन राज्ये इथे सत्तेत भाजप मित्रपक्ष आहे. नुकत्याच ताज्या बैठकीत भाजपने बिहारात पुढचे मुख्यमंत्री जदयू चे नितीशकुमार हेच राहतील हे घोषित केले.
याअर्थाने देशात १९ राज्यात भाजप व मित्र पक्षाची सत्ता आहे.
एकूण आकडेवारीनुसार भारतात आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू , तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश व सिक्कीम ही २८ राज्ये आहेत.
याशिवाय अंदमान निकोबार बेटे, चंदिगड, दादरा दमण दीव, दिल्ली, जम्मू काश्मीर, लद्दाख, लक्षद्वीप व पुदुचेरी हे ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.
अर्थात , निवडणुकीच्या राजकारणात योजन प्रयोजन सातत्यात असेल तर ते यशापासून दूर नसते. यशाला चांगलेवाईट ह्याचेशी काहीही देणेघेणे नसते, हेही विशेष !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत