देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

जागतिक महिला दिनानिमित्त – अशोक सवाई

(पुरुष प्रधान संस्कृती)

आजचा हा माझा लेख जागतिक नारी शक्तीला समर्पित!

महिलांचा जागतिक इतिहास पाहिला तरी लक्षात येते की, जगातील देशात देखील महिलांना दुय्यम दर्जाचेच स्थान होते. मग ते पुढारलेले देश अमेरिका असो की युरोपातील देश. महिलांचे स्थान तेथे दुय्यमच होते. आपल्या देशात महिलांना आजही पुरुषी अंतर्मनातून दासी, गुलाम समजले जाते. वरील देशातील महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली आणि आपल्याला दुय्यम स्थान दिले जात आहे हे लक्षात आल्यावर तेथील महिलांनी उठाव केला, आंदोलने केली आपल्या हक्क अधिकारासाठी तिथल्या व्यवस्थेशी विविध स्तरावर संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाला ८ मार्च १९७५ ला यश आले आणि UNO=Union Nation Organization म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस पाळला जातो. या दिवसाचे उद्देश आणि महत्त्व पुढीलप्रमाणे आहेत.

१) महिलांना पुरुषां बरोबरीचा दर्जा देणे. २) कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा महिलांसोबत भेदभाव न करणे. ३) समाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्यांना समान न्याय देणे. ४) महिलांसाठी पुरुषांमध्ये जागृती आणणे. ५) महिलांसाठी हिंसा, बलात्कार व दुर्व्यवहारा विरोधात आवाज उठवणे. ६) महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात अधिकार व भागीदारी असणे आवश्यक. ७) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना सन्मान मिळावा. तिचा कुठेही आणि कोणत्याही प्रकारचा अपमान होवू नये याची दक्षता घेणे. ८ मार्च दिनाचे हे वरील उद्देश व महत्त्व आहे. जगातील प्रगत देश जसे अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, जर्मनी, युरोप ऑस्ट्रेलिया,जपान चीन वगैरे देश . त्या त्या देशातील स्त्रियांचा त्या देशाच्या प्रगतीत अर्धा वाटा आहे. म्हणून ते देश प्रगती पथावर आहेत. आपल्या देशातील ‘प्रगती’ कुठे हरवली कुणास ठाऊक? आपल्या देशातील समस्त आदरणीय महिलांनो लक्षात घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना तयार होत असतानाच वरील अधिकारां सहीत कितीतरी जास्त हक्क अधिकार घटनेच्या मूलभूत चौकटीत टाकून ठेवले आहेत. ते सुद्धा तुम्हाला कवडीचा संघर्ष न करता अगदी आयते म्हणा. तुमचे अधिकार घटनेच्या मूलभूत चौकटीत टाकण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की भविष्यात तुमच्या अधिकाराला कोणीही हात लावू नये. तरीही २०१४ पासून तुमच्या अधिकारांचे जरा जास्तच हनन होत चालले आहे हेही लक्षात घ्या व जागरूक व्हा. नाही तर पुढे तुमच्यावर पुन्हा पुरुषाची दासी/गुलाम बनण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. सर्व भारतीय महिलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एससी/एसटी/ओबीसी पुरुषांपेक्षाही कितीतरी अधिकचे अधिकार डॉ. बाबासाहेबांनी तुमच्या पदरात टाकले. फक्त तो पदर तुम्ही फाटू देवू नका. म्हणून तुमच्या सर्व भारतीय नारीचे कर्तव्य ठरते की डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या प्रतिमेसमोर निदान एखादे फूल ठेवून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी. (अर्थात घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही त्या पाण्याला स्वतःचा स्त्रोत असावा लागतो हेही मला माहीत आहे) भारतीय समाजाला इशारा देताना बाबांनी एके ठिकाणी म्हटले होते ‘स्त्री ही समाजाचा बहुमूल्य अलंकार आहे समाजाने त्याला जपलं पाहिजे.’ खरच त्यांच हे विधान किती सार्थक होतं, जसे पाने, फुले, फळे हे त्या वृक्षाचे अभिन्न अंग आहेत तसेच स्त्री ही समाज शरीराचा अर्धा भाग आहे.

स्वातंत्र पुर्व काळात वैदिक धर्म मार्तंडांनी समाजातील शुद्र पुरुष व सर्व स्तरातील स्त्रियांयांसाठी खुळचट धर्म व्यवस्थेच्या नियमाप्रमाणे नीती नियम, रिवाज ठरवून ते अक्षरशः बळजबरीने लोकांवर लादत असत. त्यांनी लोकांवर दैनंदिन आचरणासाठी भयंकर निर्बंध लावले होते. एक प्रकारे मानसिक गुलाम करून टाकले होते. जे त्यांच्या फायद्याचे होते तर शुद्र स्त्री-परुषांसाठी जुलम होता. त्यातही स्त्रियांसाठी जास्तच. जणू काही तिच्यासाठी नजरकैदेची शिक्षाच होती म्हणा. जो तो पुरुष तिच्यावर नजर ठेवून होता. ती आपली मर्यादा सोडते की काय म्हणून. स्त्रिच्यांच्या शरीराला व मनाला सांकेतिक अर्थाने बांधून ठेवले होते. व आजही काही प्रमाणात त्या अदृश्यपणे तनामनाने बांधूनच आहेत. (अर्थात काही अपवाद सोडून) स्त्रियांचे बंधन आज थोड्या प्रमाणात जरी सैल झाले असले तरी पण अजून पूर्णपणे मुक्तता नाही. अगदी घरापासून ते तिच्या कामाच्या ठिकाणापर्यंत. स्त्री सांकेतिक अर्थाने तनामनाने कशी बांधली गेली हे पुढीलप्रमाणे लक्षात येईल.

१) पायातील जोडवी व पैंजण: (त्याचा सांकेतिक अर्थ पाय बांधून ठेवणे) म्हणजेच विचारल्या शिवाय कुठेही जावू नकोस. गेल्यास परिणाम वाईट. आम्ही गावभर व यथेच्छ हिंडू फिरू, दारूच्या/जुगाराच्या/सट्ट्याच्या अड्ड्यावर जावू. (कारण आम्ही पुरुष)

२) हातातील बांगड्या: (हात बांधून ठेवणे) सांगीतल्या शिवाय नसत्या कामात हस्तक्षेप करू नकोस आम्ही वाटेल ते करू (कारण आम्ही पुरुष)

३) कान टोचणे: (तंबी देवून ठेवणे) सांगितले तेवढे ऐक जास्तीचे नाही. नाही तर बघ…आम्ही मात्र तुझे ऐकणार नाही मनाला येईल ती मनमानी करू. (कारण आम्ही पुरुष)

४) मंगळसूत्र: (पुरुषाच्या दावणीला बांधून ठेवणे) तू एका पुरुषाशी बांधली गेली आहेस. किंवा त्या पुरुषाने तुला बंधक बनून ठेवले आहे. त्याची तू दासी आहेस गुलाम आहे. ही गुलामीची ओळख तू सर्वांना दाखव किंवा दिसू दे. (मोठ्या हौसेने दिसू देतातच म्हणा) किंवा ती सर्वांमध्ये मिरव आम्ही मुक्त. (कारण आम्ही पुरुष)

५) वस्त्र: (तुझ्या पसंतीला महत्त्व नाही) तू वस्त्र आमच्या पसंतीचे परिधान करायचे तुझी पसंती नाही. आम्ही कोणतेही कपडे वापरू नाही तर चड्डीवर फिरू. (कारण आम्ही पुरुष)

६) सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाळावरील लाल कुंकू किंवा टिकली: (लाक्षणिक अर्थाने धोक्याचा इशारा) टिकली लावणे म्हणजे तुझ्या स्वतंत्र विचारांना पूर्ण वीराम, एकदम फूलस्टाॅप. आपले कोणतेही विचार किंवा मत मांडायचे नाही. किंवा आपली अक्कल पाजळायची नाही. पुर्वी महिलांच्या कपाळावर कुंकवाची आडवी लाल लकीर होती (सावित्री माईचा फोटो पहा) ती म्हणजे महिलांच्या मर्यादांची लक्ष्मण रेखा होती. त्या काळी ती रेखा ओलांडून जाणे म्हणजे मरण यातनांनी मरण जवळ करणे होते. बरं हे त्या काळातील बायांच्या कपाळावर लाल आडव्या रेषेच्या रूपात कुंकू आले तरी कुठून? किंवा यामागे मनुवादी कर्मठ ब्राह्मणांचा तर्क काय असावा? त्यासाठी आपला तर्क लावून त्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला फारसी पराकाष्ठा करावी लागत नाही. तर्क असा आहे की त्यांच्या काल्पनिक रामायणात सीतेला पर्णकुटीतून बाहेर न पडण्यासाठी लक्ष्मणाने जी आपल्या बाणाने कुटीच्या बाहेर रेषा खेचून ठेवली होती ती म्हणजेच लक्षण रेखा. तिच रेषा धर्म मार्तंडांनी बाईच्या कपाळावर तिच्या कुंकवाच्या रूपात आडवी ओढली. म्हणजेच ती बाईची मर्यादा रेषा होती. बाईने आपल्या घराचा उंबरठा ओलांडून कुठेही जावू नये. आपली मर्यादा ओलांडू नये. मर्यादा ओलांडण्यास गंभीर परिणाम होतील. धर्म मार्तंडाचा असा एक प्रकारचा गर्भित इशारा बाईच्या कपाळावरील लाल आडव्या रेषेत होता. आम्हाला कोणत्याही मर्यादा नाहीत. (कारण आम्ही पुरुष)

            आजही तिच कुजकट व हलकट वृती संभाजी भिडे च्या (मनोहर कुलकर्णी)   अंगात भिनली आहे. म्हणूनच तो एका महिला पत्रकाराला म्हणतो 'आधी टिकली लाव मगच माझ्याशी बोल' हा त्या महिला पत्रकाराला ऑर्डर देणारा कोण? अशांना तिथल्या तिथे जाब विचारून थंड करायला पाहिजे. महिलांच्या पुढच्या पिढ्या गुलामीच्या बंधनातून मुक्त व्हाव्यात म्हणून माता सावित्रीबाईंनीच स्वतःहून पहिले ती आडवी रेखा ओलांडून स्त्री शिक्षणातून स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखवला होता. तो आजही तितकाच प्रासंगिक आहे.  सावित्रीबाईंचा त्याग, त्यांचे शिक्षण कार्य, महिलांचे नाजूक प्रश्न सोडवण्याची त्यांची संवेदनशील वृती हे आजच्या किती महिलांना माहित आहे? नसेल तर माहीत करून घ्या. व त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. 

७) नाक टोचणे: (सांकेतिक निर्वाणीचा इशारा) जर तू आम्हाला सहन झाली नाहीच तर आम्ही वेळ प्रसंगी तुझा श्वास बंद करू शकतो. मात्र तशी तू करू शकणार नाही. (कारण आम्ही पुरुष) अर्थात वरील स्त्री च्या बंधनाला बुद्धीजीवी वर्ग अपवाद असेल. सरसकट म्हणता येणार नाही.

पायातील जोडवी, हातातील बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र, कानातले रींग, नाकातील नथनी, कपाळावर टिकली. हे स्त्रियांचे स्त्री धन मानतात. किंवा स्त्री दागीने म्हणतात, परंतु हे दागीने, दागीने नसून दागीन्याच्या रूपात स्त्री मनाला घातलेल्या अदृश्य बेड्या आहेत. दागदागीन्यांनी स्त्री सुंदर दिसते हे खरे आहे. आणि सुंदर दिसने कोणत्या स्त्री ला आवडणार नाही बरं? नव्हे, तो तिचा निसर्गदत्त हक्क/अधिकारच आहे. त्यासाठी स्त्रिया सुद्धा सुंदर दिसण्याच्या हौसेने या मानसिक गुलामीच्या अदृश्य बेड्या स्वतःहुन स्वतःच घालून घेतात. पण सुंदर दिसण्या बरोबरच आपण आपल्याला या पुरूषी मनमानी बंधनात किती अडकून घ्यावे याचेही भान स्त्रियांनी ठेवावे. जेणेकरून तुमच्या स्वतंत्र विचारांना, स्वतंत्र विचारांच्या जगण्याला एक सामाजिक महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. व त्या विचारातून एक सशक्त वैचारिक भारतीय समाज निर्माण झाला पाहिजे. साऱ्या स्त्रियांनी आपल्या मुलांच्या मनात देव देवता, कर्मकांडाचे विचार पेरू नयेत. त्यापासून त्यांना दूर ठेवून त्यांच्यावर विज्ञानवादी बनण्याचे संस्कार करावेत. हे साऱ्या स्त्रियांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीतही पुरुषप्रधान संस्कृतीला नैतिक गोष्टीसाठी झुकवणारी असी स्त्रियांनी आपापल्या पुरती स्वतंत्र व सक्षम स्त्रीप्रधान संकृती निर्माण केली पाहिजे. स्त्रीप्रधान संकृती म्हणजे उठ सूठ नवऱ्यावर डाफरणे नव्हे. तर पुरुषी अहंकाराला आपल्या तात्विक विचाराने मुरड घालणे होय.

वरील स्त्री बंधनाचे उल्लंघन केल्यावर कौटुंबिक हिंसाचार होतो किंवा मानसिक अत्याचार होत असतो. किंवा अगदी छोट्या छोट्या कारणावरूनही महिलांना मानसिक ताण किंवा त्रास दिला जातो. यासाठी तणाव मुक्त कुटुंब घडविण्या साठीच्या दिशेने राष्ट्रीय महिला आयोगाला काम करावे लागेल. (पण त्यासाठी आयोगाचे नेतृत्व कोणाच्याही दबावात न येणारे कणखर असले पाहिजे. नेतृत्व महिलांच्या हिताची जपणूक करणारे सक्षम, दक्ष व कल्पक पाहिजे) तसे काम सुरू केल्यावर ‘पड आंबा पटकन मी गिळतो गटकन’ असे लगेच परिणाम दिसणार नाहीत पण सक्षम रितीने नियोजनबद्ध सुरवात केली की, परिणामही दिसून येतील. आदरणीय स्त्रियांनो आपल्या बाबांच्या घटनेमुळे तुम्ही या जगात मुक्त आहात, मोकळा श्वास घेत आहात. आज तुमच्या गळ्यात टेथस्कोप आहे, डोक्यावर इंजीनियरची हॅट आहे, काळ्या डगल्यात तुम्ही न्याय/हक्कासाठी राखणदार आहात. तुमच्या डोक्यावर देशाची राजमुद्रा असलेली व गुन्हेगाराला दरदरून घाम फोडणारी दरारायुक्त मानची टोपी आहे. जी देशाच्या राष्ट्रपती/प्रधानमंत्री यांच्याकडेही नसते. तुमच्याजवळ रोलिंग चेअर व हातात पेन आहे. ज्या चेअरवर बसून तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा करभार सांभाळू शकता. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी तुम्ही सर्वेसर्वा आहात. देशासाठी भावी आदर्श नागरिक घडवण्यासाठी तुमच्या हातात पुस्तक व खडू आहे. देशाचे कोणतेही सर्वोच्च पद तुम्ही लिलया भूषवू शकता. उडण खटोले उडवू शकता त्यात उडू शकता. देशाच्या सीमेवर हातात मशीनगन घेऊन चट्टानासारख्या उभ्या आहात. त्यामुळे देशाची जनता सुखाची झोप घेवू शकते. असे तमाम अधिकार तुमच्याकडे आहेत. बाबांनी तुमच्यासाठी दिलेलं हे लाखमोलाचं स्वातंत्र्य गाफील न राहता अबाधित ठेवा. अरे हो! एक विसरलोच होतो बघा! खाली माना घालून तासनतास मोबाईल पहात बसण्यापेक्षा त्यातून किमान तासभर वेळ काढून आपल्या महामानव व महामातांना वाचा. वाचनाने तुम्हाला तुमचा खरा इतिहास माहीत होईल. व त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्ही बोलण्यातून समोरच्याला वैचारिक मात देवू शकाल आणि तुमचे व्यक्तीमत्व सुद्धा अधिक भारदस्त होवू शकेल. असो.

आज जागतिक महिला दिवसाच्या सर्व आदरणीय महिलांना हार्दिक शुभेच्छा!

अशोक सवाई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!