देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ब्राम्हणायझेशन म्हणजे काय?

आज संपूर्ण भारतात आरएसएस/ भाजपने ब्राम्हणेत्तरांच, मागासवर्गीयांचे कावडयात्रा,नवरात्र उत्सव,गोविंदा दहीहंडीउत्सव, गणेशउत्सवाव्दारे,तसेच टिव्ही चॅनल वरील अनेक देवीदेवतांच्या अंद्धश्रद्धा युक्त मालिकाव्दारे मोठ्या प्रमाणात ब्राम्हणायझेशन सुरु केले आहे.तेंव्हा ब्राम्हणायझेशन म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत हे आपणास समजत नाही तो पर्यंत आपण डीब्राम्हणायझेशन करु शकत नाही.ब्राम्हणायझेशन म्हणजे अंधश्रद्धाव्दारे समाजात मनुस्मृति प्रमाणे जातिभेद,वर्णभेद करून ब्राम्हण श्रेष्ठत्वाचां विचार पक्का करून रुजवणे.ज्या ज्या वेळी आपल्या पुरोगामी महापुरुषांनी प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थे विरूद्ध संघर्ष केला तो संघर्ष आपणांस कळूच नये म्हणुन त्यांच्या क्रांतीकारी
विचारांना ब्राम्हण श्रेष्ठत्व अनुकूल बनवणे किंवा क्रांतीकारी विचारांमध्ये मिलावट करून ते विचार अंधश्रद्धा व्दारे विकृत स्वरूपात तुमच्या आमच्या समोर सादर करणे म्हणजे ब्राम्हणायझेशन होय.
आता काही उदाहरणे बघू.

१)भ.गौतम बुद्ध (इस पू 563..इस पू 483)इस पू 528नंतर दुराचारी, व्यभिचारी,हिंसाचारी आर्य संस्कृतीला आपल्या सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाने एका सभ्य संस्कृतीत परावर्तित करून भ गौत्तम बुद्धाने समाजात क्रांतीच केली.बुद्ध तत्वज्ञानाने निर्माण झालेली नाग व आर्य मिश्र भारतीय संस्कृती ही तत्कालीन जगतातील सर्वश्रेष्ठ संस्कृती होती.त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजातून पुसून टाकणे ब्राम्हणशाहीला अनेक प्रयत्न करूनही शक्य होत नव्हते.म्हणून भ गौत्तम बुद्ध हे हिंदू धर्मातील विष्णूचाच नववा अवतार सांगणे, बौद्धधम्म हा हिंदू धर्माचाच एक पंथ आहे असे सांगणे हे ब्राम्हणायझेशन आहे.पंढरपूरच्या भ गौतम बुद्ध अर्थात पांडुरंगाचे वैष्णव पंथीय विठ्ठल मंदिरात रूपांतर करणं ब्राम्हणायझेशन आहे.याचप्रमाणे ओरिसातील जगन्नाथपुरी मंदीर, आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध आय्याप्पामंदीर,तसेच केदारनाथ, बद्रीनाथ,सोरठी सोमनाथ ही मूळची भ.गौतम बुद्धाची विहारं.अशा हजारो,लाखो बुद्ध विहारातील, स्तुपातील,बुद्ध लेण्यांतील भ. बुध्दाच्या मूर्तीला शेंदूर फासून त्यांना वेगवेगळ्या हिंदू देवांची नावं देऊन त्याचंही ब्राम्हणायझेशन केलं आहे.

२)लिंगायत धर्म संस्थापक
“बसवेश्वर/ बसवण्णा “(इस 1134..1196)
हे नागवंशी आहेत.पण बसवण्णा ब्राह्मण होते सांगणे,त्यांच्या शिल्पाशेजारी ब्राह्मण गुरू उभा करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.त्यांच्या वचनात ते स्वतः म्हणतात मी मातंग मादार चेन्नयाचा पुत्र आहे.त्यांनी ब्राम्हणी जातिव्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला.ब्राम्हणी वर्चस्वाला विरोध केला.मूर्तिपूजेला,पुनर्जन्माला सुद्धा विरोध केला.कोणीही मनुष्य जन्माने नव्हे तर कुशल कर्माने श्रेष्ठ होऊ शकतो असे त्यांचे विचार होते. कारण त्यांच्यावर बौद्ध धम्माचा अधिक प्रभाव होता.त्यांनी स्थापीलेल्या लिंगायत धर्मास आजही मान्यता न देता तो हिंदू धर्माचाच एक पंथ असल्याचे सांगणे हे ब्राम्हणायझेशन आहे.

३) संत कबीर (इस 1398..1494) संत कबीरांवर बौद्ध धम्माचा बराच प्रभाव होता,जो त्यांच्या दोह्यातून दिसून येतो.त्यांची शिकवण मानवतावादी असून ब्राम्हणवादा विरुद्ध होती,जाती भेदांविरुद्ध होती. सनातनी,जुलमी,अज्ञानी,अत्याचारी संस्कृती विरुद्ध होती.त्यांची शिकवण सदाचार,सत्य,अहिंसा,परोपकार, सदभाव इ मानवतावादी नैतिक मुल्ल्याच्या आधारीत होती.पण त्यांचे गुरू ब्राम्हण वैष्णव पंथीय रामानंद होते असे दाखवणे हे ब्राम्हणायझेशन आहे.कबीरपंथ हिंदु धर्माचाच एक पंथ आहे असे सांगणे हे ब्राम्हणायझेशन आहे.

४) संत शिरोमणी
“गुरू रविदास “(इस 1440..1520)
हे उत्तर भारतातील क्रांतीकारी संत. त्यांची शिकवण जातिभेद,अंधश्रध्दा विरूध्द होती.दुर्वर्तन करु नका, मांसाहार करु नका,सतकर्म करा असे ते म्हणत.पण त्यांचे गुरू रामानंद नावाचे ब्राह्मण होते असा प्रचार करणे म्हणजे ब्राह्मणायझेशन होय.या देशामध्ये फार पूर्वीपासून ब्राह्मणी संस्कृती विरूद्ध बौद्धधम्म संस्कृती असा दोन विरुद्ध विचारधारेचा संघर्ष आहे.संत रविदासासह सर्व पुरोगामी संतांवर बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता.तेच ते समाजात सांगत होते. परंतु त्यांच्या नावावर चमत्कारी कथा सांगणे हे ब्राम्हणायझेशन आहे.

५)संत नामदेव(इस1270..1350)
हे खरे वारकरी आंदोलनाचे संस्थापक.त्यांनी प्रबोधनाकरीता किर्तनाचा आधार घेवून पंजाबमध्ये दौरे काढले.
“नाचु किर्तनाचे रंगी,ज्ञानदिप लावू जगी”असा संदेश संत नामदेवांनी दिला.संत नामदेव,संतकबीर,संत रविदास यांच्या प्रबोधनामुळे पंजाबमध्ये गुरूनानक यांनी शीख धर्माची स्थापना केली.शीखांचा धर्मग्रंथ “गुरू ग्रंथसाहेब “मध्ये वरील तिन्ही संताचे अभंग आहेत.
अशा नामदेवांचे नावही न घेता फक्त माऊली माऊली करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.पंढरपूरचा विठ्ठल हा भ गौतम बुद्धच आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. वारकरी आंदोलन हे प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेवर वार करण्याचे आंदोलन होते.त्याला वैष्णवी अर्थात विष्णूभक्तीचे आंदोलन म्हणणे हे ब्राम्हणायझेशन आहे.

६)संत तुकारामांनी (इस 1608..1650)सर्व समाजाला मानवतेची,समतेची शिकवण दिली. त्यांना ब्राम्हणवाद्यांनी आयुष्यभर त्रास देऊन त्यांचे सर्व ग्रंथ नदीच्या पाण्यात बुडवून टाकले.संत तुकारामांचा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून खुन करणाऱ्या रामेश्वरभट व मंबाजी भट यांना त्यांचेच गुरू दाखवणे हे ब्राम्हणायझेशन आहे. वैकुंठ नाकारणाऱ्या संत तुकारामांना सदेह पुष्पक विमानातून वैकुंठाला गेले असा प्रचार करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.

७)छ शिवाजी महाराज (इस 1630..1680)अठरा पगड जातींना स्वराज्य निर्मितीसाठी एकत्र करून त्यांना मानसन्मान देणाऱ्या “कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज”यांची गोब्राह्मण प्रतिपालक अशी प्रतिमा करणे हे ब्राह्मणायझेशन आहे. शिवचरित्र लिहीताना जाणुनबुजून दादू कोंडदेव यांना महाराज व जिजामाते सोबत दाखवणं हे ब्राह्मणायझेशन आहे.छत्रपतींना जातीयवादी ब्राम्हण लंगोटीधारी रामदासाच्या पाया पडताना दाखऊन त्यांचा गुरू दाखवणे हे ब्राम्हणायझेशन आहे.

८) म ज्योतिबा फुले (इस 1827..1889) शिवाजी महाराज यांची सर्व प्रथम समाधी शोधून सर्व प्रथम पुस्तक,पोवाडा लिहीणारे व शिवजयंती सुरू करणारे
” राष्ट्रपिता जोतीराव फुले”
यांना शिवशाहीर न म्हणता ब.मो.पुरंदरेला म्हणणे हे ब्राह्मणायझेशन आहे.तेली,तांबोळी कुणबटांनी काय संसदेत नांगर हाकायचा आहे काय?असे म्हणणाऱ्या ब्राम्हणवादी बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य म्हणणे,म फुले ऐवजी टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला असे सांगणे म्हणजे ब्राम्हणायझेशन आहे.

९) सावित्रीमाई फुले (इस.1831..1897 )
आधुनिक भारतामध्ये सर्वात प्रथम महिलांच्या शिक्षणाकरीता संघर्ष करणाऱ्या प्रथम शिक्षिका “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले”होत. यांच्या कार्यकर्तृत्वाला मानसन्मान देण्याऐवजी अन्य अस्तित्वात नसणाऱ्या सरस्वती देवीचे आणि वटसावित्रीचे पुजन करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.

१०) नेताजी सुभाषचंद्र बोस: (इ.स.1897–1945)लाखो तरुणांच्या मनात देशभक्तीची स्फूर्ती देऊन आझाद हिंद सेना स्थापून इंग्रजी सत्तेला आव्हान देणारे खरे स्वातंत्र्यवीर तर सुभाषचंद्र बोस आहेत.परंतु
यांना डावलून ईंग्रजांना ६वेळा माफीनामे पाठवून तुरूंगातून सुटून ईंग्रजांच्या पेंशनवर जगणाऱ्या,व नंतर स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहाणाऱ्या,भारतात द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम मांडून फाळणीस कारणीभूत ठरणाऱ्या ‘माफीवीर’ विनायक सावरकरला स्वातंत्रवीर म्हणणे हे ब्राह्मणायझेशन आहे.

त्यामुळे ब्राम्हणवाद्यांनी अंधश्रद्धाव्दारे कुटील डावपेच रचून निर्माण केलेलं ब्राह्मणायझेशन सर्व ब्राम्हनेत्तरांनी ओळखावे.म्हणजे ‘डीब्राह्मणायझेशन’ करणे सोपे जाईल.आणि ‘डीब्राह्मणायझेशन’ झाल्याशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही.
🙏जयभीम जयबुद्ध 🙏
एस बी सिंगारे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!