भैयालाल भोगांमागे ला न्याय मिळाला का? अखेर मरण आले. किती वाईट गोष्ट आहे ही.

मुक्काम पोस्ट खैरलांजी – एक माणूसकी विरहीत गाव
मुक्काम पोस्ट खैरलांजी – एक माणुसकी विरहीत गांव
भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गाव कमी लोक वस्तीचे. १८१ घरे असलेल्या गावात १६४ कुणबी मराठ्यांची, १४ गोंड समाजाची आणि ३ बौद्धांची घरे होती.
२९ सप्टेंबर २००६, खैरलांजी गावाच्या किंबहुना देशातील इतिहासातील एक काळा दिवस. ४५-५० जणांच्या जमावाने गावातील बौद्ध वस्तीतील भोतमांगे कुटूंबियांची बलात्कार करून निर्घुण हत्या केली. अख्खा देश हळहळला. माणुसकीचे सारे बंधच तोडण्यात आले. मानवतेला बाहेर वेशेवर लटकवण्यात धन्यता मानन्यात आली. पुढे, कोर्टात केस उभी राहिली. ४६ पैकी फक्त ११ जण दोषी धरून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पैकी ३ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली तर ८ पैकी ६ जणांना फाशी आणि उरलेल्या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली.
पार्श्वभूमी :
भैयालाल भोतमांगे व त्यांचे कुटूंब खैरलांजीत वास्तवाला होते. कुटूंबात त्यांची पत्नी सुरेखा, एफ.वाय. सायन्स ला शिकणारी मुलगी व एन्.सी.सी. ला असणारी, प्रचंड हुषार १७ वर्षाची प्रियांका, पदवीधर सुधीर व अंध रोषन. असे छोटेसंच पण समाधानी कुटूंब होते. प्रियांका शिकून मोठी अधिकारी व्हायचं होतं. पण काही जातीवाद्यांच्या डोळ्यांना हे कुटूंब खूप वर्षे बोचत होते. त्यांचे राहणीमान, सुधारलेले जीवनमान बघवत नव्हते. जवळपास १८ वर्षे गावातील सवर्णांनी सतत भयालाल यांच्या कुटूंबाचा या ना त्या कारणाने छळ करित होते. गावच्या पंचायतीत भैयालाल यांचे नाव महसूल खात्यावर चढवण्यास सवर्णांचा सतत विरोध असायचा. त्यांना पक्के घरही बांधण्यास सवर्णांनी मज्जाव केला होता. तरिही, भैयालाल यांनी एक दोनदा पक्के घर बांधण्याचा प्रयत्न केला होता पण ते उध्वस्त करून पुन्हा न बांधण्याची धमकी ही देण्यात आली. शेवटी, नाईलाज म्हणून भैयालाल व त्यांचे कुटूंब त्याच पडक्या घरात राहत होते.
३ सप्टेंबर २००६, धुसळा गावचे पोलिस पाटील सिद्धार्थ गजभिये यांना १५ लोकांनी मारहाण केली. गजभिये कांपथी येथील सरकारी इस्पितळात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी झाल्या प्रकाराबाबत आंधळगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला. झाला प्रकार प्रियांका, सुधीर, सुरेखा व भैयालाल यांनी पाहिला होता. त्यांच्याच साक्षीवरून १६ सप्टेंबर २००६ ला पोलिसांनी १२ जणांना अटक केली. २९ सप्टेंबर २००६ ला आरोपींची जामिनावर सुटका झाल्यावर सिद्धार्थ गजभियेचा राग मनात ठेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ४० जणांचा जमाव सिद्धार्थ गजभियेंच्या दिशेने निघाला. पण सिद्धार्थ गजभिये व त्यांचे बंधू जमावाला न सापडल्याने जमावाचा मोर्चा सायकलची चैन, कुऱ्हाड, दांडे-काठ्या घेऊन भोतमांगे कुटूंबाच्या दिशेने वळला. कारण, भोतमांगे कुटूंब साक्षीदार होते. त्यावेळी घरी फक्त पत्नी सुरेखा, प्रियांका, सुधीर आणि अंध मुलगा रोषन होते. सुरेखा घरी जेवण करीत होती तर मुले अभ्यास करित होती. आता सुरु झाली खरी माणुसकीला काळीमा फासणारी घटना.
सर्वप्रथम, जमावाने सुरेखाला पकडले. सुरेखाला चेनने, दांडे, काठ्या व दगडांनी मारले. तिला विवस्त्र करण्यात आले. तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला. सुरेखाला मारताना काही साक्षीदार होते, काही महिलाही होत्या पण कुणीही सोडवण्यासाठी पुढे धावले नाहीत. सुरेखाला ठार मारल्यानंतर तिचा मृत्युदेह बाहेर अंगणात आणून ठेवला. त्यानंतर सुधीर ला पकडण्यात आले. त्याला त्याच्याच बहिणीवर म्हणजे प्रियांकाबरोबर सेक्स करण्यास सांगितले. सुधीर ने नकार दिला म्हणून त्याच्या लिंगावर प्रचंड घाव करण्यात आले. शेवटी, त्यालाही हाल हाल करून मारले. यानंतर पाळी होती रोषनची. रोषन अंध होता, वाटले त्याला तरी सोडतील पण डोळ्यांत क्रोधाची आग घेऊन आलेल्या जमावाला थोपवणे शक्य नव्हते. जमावाने त्यालाही प्रचंड यातनासह ठार मारले. प्रियांका घाबरून घराच्या मागच्या गवतात लपून राहिली. पण तिला जमावाने शोधले. तिच्यावर पाशवी अत्याचार केला. प्रियांका विव्हळत होती व शेवटी तिने जीव सोडला. तिचा विवस्त्र देह अंगणात आणला गेला. त्या मृतदेहावर ही कुठली क्षमा न दाखवता तिच्या गुप्तांगात काठ्या, दांडे व सळ्या घुसवण्यात आल्या. यादरम्यान भैयालाल बाहेरच होते. अंगणात पडलेले मृत्युदेह जमावाने अंगणातील बैलगाडीत ठेवून बाजूच्या तलावात टाकले. त्यानंतर, घडलेला प्रकार एक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
पोलिस तपास व न्याय व्यवस्था :
घडलेला प्रकार पोलिसांना कळाला तेव्हा पोलिस इंस्पेक्टर भरणे व मेश्राम घटनास्थळी जायच्या तयारीत असताना गावाबाहेर सरपंच भेटले. त्यांनी सरपंचांना विचारणा केली असता, सरपंच बोलले, सर्व काही ठिक आहे. पोलिसांनी घटनास्थळी जायची तसदीही घेतली नाही. व रेकॉर्डमध्ये सर्व ठिक असल्याचे नमूद केले. चारही मृत्युदेह फुगून तलावात वर आले तेव्हा घडलेल्या प्रकाराला वाचा फुटली. घटनेचे पडसाद राज्यासह देशभर उमटले. दलित संघटनांनी निदर्शने केली. काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. उल्हासनगर मध्ये डेक्कन क्वीन रेल्वे अडवण्यात आली. त्यातील प्रवाशांना बाहेर उतरवण्यात आले. त्यानंतर तिला पेटवण्यात आले. तोपर्यंत इथल्या मिडीयाला याची दखल घ्यावीसी वाटली नाही. सर्वप्रथम बी.बी.सी. वर्ल्ड या वाहिनीने ही बातमी जगासमोर आणली.
हत्याकांडानंतर त्वरितच पोलिसांना कळवले गेले होते तरिही पोलिसांना त्यांची कामगिरी बजावता आली नाही. हत्या झालेल्या चौघांपैकी दोन स्त्रिया होत्या. त्यांच्यावर बलात्कार झाला की नाही यासंबंधी वैद्यकिय तपासणी पोलिसांना करावीशी वाटली नाही किंवा तसा आग्रह ही पोलिसांनी वा डॉक्टरांनी का धरला नाही, हे गूढच आहे.
प्रथम स्थानिक पोलिस, नंतर सी.आय्.डी. त्यानंतर सी.बी.आय्. असा तपासाचा प्रवास झाला. ८ ऑक्टोबर २००६ ला राज्य सरकारने हे प्रकरण सी.आय्.डी. कडे सोपवला. सीआयडी ने घाऊकपणे गावात अटकसत्र सुरु केले. तब्बल ४६ जणांना ताब्यात घेतले. इथेच एक चूक झाली. भैयालाल यांच्यामते जे साक्षीदार होते, त्यांनाही सीआयडी ने आरोपी म्हणून अटक केली. पुढे साक्षीदारच उरले नाहीत. या म्हणण्यात बराच अर्थ दडलेला होता. पुढे, २८ नोव्हेंबर २००६ ला सीबीआय कडे तपास सोपवण्यात आला. त्यातील ११ जणांना ताब्यात घेऊन बाकीच्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जे सोडण्यात आले ते नंतर साक्षीदार म्हणून पुढे आले नाहीत. म्हणजे पहिले अटकसत्र अनाठायी व संशयास्पद होते. त्या ११ जणांना ताब्यात घेऊन भंडारा सेशन कोर्टाने ८ जणांना दोषी ठरवले. त्यातील ६ जणांना फाशी व उरलेल्या दोघांना जन्मठेप सुनावली. प्रकरणात आरोपींना दोषी ठरवताना न्यायालयाने अॅट्रोसिटी कायद्यातून मुक्तता केली. तसेच, विनयभंगाचा गुन्हाही सिद्ध होऊ शकला नाही. शिवाय, हा पुर्वनियोजित कट होता हे ही न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही. पिडीतांकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत होते.
अनुत्तरित प्रश्न :
हत्याकांड होताना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, त्याची नोंद या तपासादरम्यान घेण्यात आली नाही. मृत्युदेहांची विल्हेवाट सामुहिकपणे लावण्यात आली. आरोपींना जर ठारच मारायचे होते तर त्यांना नग्न का करण्यात आले? ते ही मारल्यानंतर की मारण्याआधी नग्न करण्यात आले? या ही पुढे कौर्य म्हणजे प्रियांकाच्या गुप्तांगात काठ्या, दांडे खुपसण्यात आले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज पोलिस व डॉक्टरांना का वाटली नाही? पोस्टमार्टेम करायची गरज का वाटली नाही? साधी छेडछाड केल्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो, इथे तर नग्न देह तेही विकृत स्थितीत होते पण तपासात हे सिद्ध न होऊ शकल्याने ३५४ कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाला नाही. यामुळे तपासात बराचसा भाग वगळण्यात आला असावा, याची दाट शक्यता आहे. फाशीची शिक्षा तेव्हाच होते, जेव्हा ती भीषणातील भीषण व दुर्मिळातील दुर्मिळ घटना असते. म्हणजे वरील प्रकारातील कौर्य लक्षात घेता, ही शिक्षाही कमीच आहे.
झालेला प्रकार दलितांच्या किंबहुना समस्त मानवजातीसाठी लज्जास्पद आहे. पण तत्कालीन गृहमंत्री आर्. आर्. पाटील यांनी गावाला २०१० मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार देऊन पिडीतांच्या तसेच समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रयत्न केला. तसेच दोषींची निर्दोष मुक्तता केल्यावर त्यांची गावात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. या सर्व प्रकाराला काय संबोधावे? माझ्या भाषेत फक्त माणूसकीचा खून हाच शब्दप्रयोग योग्य आहे.
खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्षे पुर्ण झाली. तरिही शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. पिडीत भैयालाल सह समाज अजूनही वंचित आहे. देशात दर तासाला ४ दलित अत्यांचारांच्या घटना घडतात. त्यात एकाचा जीव जातोच. काही समोर येतात तर काही दाबली जातात. खैरलांजीतील पिडीतांना अचूक तपास करून न्याय दिला असता तर पुढे राज्यात वा देशात कुठलीच अत्याचाराची घटना घडली नसती. सरकारची व पोलिसांची भूमिका कायदेशीर लढाईत महत्वाची असते. काहींच्या मते, आपण कसेही वागलो तरी कागदोपत्री किंवा पातळीवर निकाल बदलू शकतो, हा उन्माद आधी ठेचला पाहिजे. आरोपी तो आरोपीच. मग तो खैरलांजीचा असो वा कोपर्डीचा. कायद्याने सिद्ध होऊ न शकलेले खटले ही जगाने पाहिलेत. पण माणूसकी नावाच्या गोष्टीला जिवंत ठेवायचे असेल तर सद्सद्विवेक बुद्धी वापरून कुठल्याही आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना कुणीही पाठीशी घालू नये.
शेवटी, हा समाज कालही उपेक्षित होता आणि आजही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे देशांत होणारे अत्याचार वेळीच मार्गी लावले तर पुन्हा खैरलांजी घडणार नाही. देशातील सामाजिक बांधिलकी जोपासता येईल. याची जबाबदारी राजकीय नेत्यांबरोबर पुढारलेल्या समाज व विकसनशील समाज यांची आहे.
खैरलांजी हत्याकांडातील मृतांना विनम्र अभिवादन. आम्ही कमजोर आहोत, तुम्हाला न्याय देण्यास, हीच खंत आहे.
- अजेश पवार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत