दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

साऊचं बोट सोडू नका…!

संजय आवटे

जात आणि धर्माचा विखार वाढत असताना, जातींची उतरंड संपवून माणूसपणाचा मुक्काम केवळ आणि केवळ बाईच गाठू शकते. पुरूषांकडून फार अपेक्षा नाहीत मला, पण महिलांकडून आहेत. कारण, तुम्हीच सोसलंय आजवर आणि उत्तरही तुम्हीच देणार आहात.

होय! ‘ती’च आता उभी राहू शकते. सगळी कोंडी फोडू शकते. कारण, तिला कोणतीच जात नाही. जात मान्य करायची आणि जातीचा माज करायचा वा लाज बाळगायची, म्हणजे मुळात विषमतेची व्यवस्था मान्य करायची.
याच व्यवस्थेनं तर आजवर बाईचं शोषण केलं.

या व्यवस्थेला आव्हान देणं सर्वशक्तिमान इंग्रजांनाही जमलं नाही हे खरंच, पण व्यवस्था ‘ब्राह्मणी’ असूनही, ब्राह्मण स्त्रिया जिवंतपणी जाळल्या गेल्या. केशवपन होत राहिलं. पेशवाईतल्या रमाबाईचं कोण कौतुक आपल्याला! पण, माधवराव पेशव्यांच्या पश्चात कोवळी रमाबाई जिवंतपणी सती गेली.

तर, पंडिता रमाबाई या मूळच्या रमा डोंगरे. ब्राह्मण. संस्कृत स्कॉलर. त्यांच्या ‘हाय कास्ट हिंदू विमेन’ या पुस्तकातले तपशील आजही हादरवून टाकतात. रमाबाईंना अखेरीस जातीसह हिंदू धर्म सोडावा लागला. आपल्या केडगावात त्यांनी मुक्ती मिशन उभारलं. लोकांनी वाळीत टाकलेल्या रमाबाईंना सावित्री वगळता अन्य सखी तेव्हा नव्हती!

तरीही, एखादी महिला आज स्वतःला ब्राह्मण वा मराठा वा अन्य काही म्हणून श्रेष्ठ मानत असेल, तर या व्यवस्थेनं केलेली तिची ही घोर फसवणूक आहे. पुरूषांचं सोडा, त्यांचे हितसंबंध वेगळे आहेत. पण, महिलांनी तरी ही जात नावाची इमारत उद्ध्वस्त करायला हवी.

तुम्हाला ब्राह्मण, मराठा वा माळी अथवा मुस्लिम- ख्रिश्चन म्हणून वाढवणारी व्यवस्था तुमचं शोषण करत असताना, सावित्रीबाई नावाची माय तुम्हाला पदराआड जपत होती. वाढवत होती. सावित्रीनं ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ ज्योतीरावांसोबत उभं केलं, तेव्हा तिथं बाळंत होऊन गेलेल्या सर्व महिला ब्राह्मण होत्या. आई झालेल्या कुमारिका वा विधवांना जगणं अवघड झालेलं असताना सावित्रीनं त्यांना माया दिली. त्यातल्याच एका ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं.

केशवपन होत असे ब्राह्मण महिलांचं. त्याला विरोध म्हणून न्हाव्यांचा संप घडवला. मुलींची जी शाळा सुरू केली, त्या शाळेत कित्येक ब्राह्मण मुली शिकल्या.

सावित्रीच्या नावात फुले. पण, तिने फक्त काटे सोसले. दगडगोटे खाल्ले. तरीही ती हरली नाही. ज्योतीराव गेल्यावर त्यांच्या पार्थिवाला स्वतः अग्नी देत सावित्रीनं या व्यवस्थेचंही दहन केलं. पुढे बाबासाहेबांनी ज्या २५ डिसेंबर १९२७ ला ‘मनुस्मृती’ जाळली, त्याच २५ डिसेंबरला, १८७३ मध्ये सावित्रीनं सत्यशोधकी पद्धतीनं पहिलं लग्न लावलं. मनुवादी व्यवस्थेला नाकारलं. त्या लग्नाचा खर्च या माऊलीनंच केला. सर्वसामान्य माणसांसाठी अहोरात्र झुंजणा-या सावित्रीआईचं निधन प्लेग रुग्णांना वाचवताना झालं.

ज्या पुण्यात तिला शेणगोळे झेलावे लागले, त्याच पुणे विद्यापीठाला सावित्रीचं नाव द्यावं लागलं, हा काव्यात्म न्याय.

पुरूषांनी महापुरूष जातीत बंदिस्त करून टाकले आणि त्यांचं राजकारण सुरू ठेवलं.
बायांनो, तुम्ही तरी शहाण्या व्हा.
तुम्ही या पुरूषी डावाला बळी पडू नक.

तुमची-माझी जात वा धर्म काहीही असो, पण सावित्री आणि फातिमा याच आपल्या माय-माऊली आहेत. त्यांचं बोट सोडू नका.
तेवढीच आशा आहे!

  • संजय आवटे
    ज्येष्ठ पत्रकार

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!