देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

॥पटिपत्ती चालू आहे , आता परियत्ती कधी ?॥

धम्म म्हणजे संपूर्ण विश्वाला कवेत घेऊन पुन्हा वर दशांगुळे उरणारा असा विषय आहे. धम्माचे हे स्वयंभू महत्त्व लक्षात घेऊन आपण सदर चर्चा करीत आहोत.

मानवी जीवनात धम्माची सुरुवात उपोसथ पालनात दिलेल्या पंचशील अथवा अष्टशील अथवा दसशील पालनाने होते. शीलपालन हा धम्माचा पाया आहे. या शीलपालनाचा “सराव” करावा लागतो. जशी एखाद्या डॉक्टरची , वकीलाची वा चार्टर्ड अकाऊंट्सची ‘प्रॅक्टिस’ असते , तशी शीलपालन करण्याची देखील ‘प्रॅक्टिस’ असते. प्रॅक्टिस करता करता डॉक्टरचा हात बसतो. त्यासाठी त्याला किंवा तिला आयुष्याची काही वर्षे प्रामाणिकपणे द्यावी लागतात. मग सराईत डॉक्टरला ‘चांगला / चांगली डॉक्टर आहे’ असे ‘प्रमाणपत्र’ जनतेकडून मिळते. वकील व सी ए यांचे देखील असेच आहे. पुढील प्रवास या प्रमाणपत्राची किंमत राखण्याचा वा वाढवण्याचा असतो.

शीलपालन करताना आपणांस याच टप्प्यांतून जावे लागते. पंचशील पालनातील पहिले शील घ्या. ‘पाणातिपाता वेरमणि , सिक्खापदं समादियामि’ म्हणजे ‘मी प्राणीहिंसा न करण्याची शिकवण ग्रहण करीत आहे’. आता ज्यांना रोज मटन खाल्ल्याशिवाय जमत नाही ते प्राणीहिंसा न करण्याचे शील कसे पाळणार ? म्हणून शीलपालन करण्यास आरंभ केला तर रोज मटन खाणारा एखादा माणूस ज्या दिवशी उपोसथ आहे त्या दिवशी मटन खाणार नाही. मग त्याला आठवड्यातून एकदा मटन न खाता राहण्याची सवय लागते , हळू हळू लागते. नंतर आठवड्यातून दोन वेळा , तीन वेळा असे करता करता मटन खाण्याची सवय कमी होत जाते. नंतर एक वेळ अशी येते कि , एका आठवड्यात एकच दिवस मटन खाल्ले तरी चालून जाते. मग पंधरा दिवसातून एकदा , महिन्या – दोन महिन्यातून एकदा , चार – सहा महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा असे टप्प्याटप्प्याने प्रमाण कमी होते. मग एक दिवस असा येतो कि , मटन खावेसे वाटत नाही. ‘अनित्यता’ तत्त्वाप्रमाणे हा बदल होण्यास काही वर्षे लागू शकतात. अशा तऱ्हेने सराव म्हणजेच “प्रॅक्टिस” हा स्वमनाला प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम आहे. या प्रॅक्टिस सोबत ध्यान साधना केल्यास आपली प्रॅक्टिस आपल्यालाच “समजते”. ध्यान म्हणजे अशा शीलपालनाबाबत आपण स्वतःच स्वतःचे परीक्षण करणे ! या परीक्षणात आपली प्रॅक्टिस कुठे चुकत असल्यास स्वतःच स्वतःला दुरुस्त करतो व पुढे जातो. अशा तऱ्हेने सराव व परीक्षण यांच्या सहाय्याने एखादा माणूस शीलपालनात “पक्का” होतो. एवढ्या काळानंतर तो बौद्ध होण्याच्या मार्गावर मार्गस्थ होतो. तरीही ज्याप्रमाणे एखाद्या सराईत डॉक्टरच्या हातून एखाद्या पेशंटचा मृत्यू होऊ शकतो , एखादा सराईत वकील न्यायालयात एखादी केस हरू शकतो त्याप्रमाणे सराव असलेला “पक्का” बौद्ध देखील एखाद्या प्रसंगी शीलपालनात चुकू शकतो ! म्हणून सहा वर्षे शीलपालनाचा सराव करणारा एखादा माणूस ‘मी मागील सहा वर्षांपासून बौद्ध होण्याची प्रॅक्टिस करीत आहे’ , असे म्हणतो. तो किंवा ती किंवा कोणीही जन्माने बौद्ध होत नाही.

अशा तऱ्हेने धम्मात कोणीही जन्माने नव्हे तर कर्माने बौद्ध होतो. जन्माने बौद्ध असल्याचा फायदा एवढाच कि , कर्माने बौद्ध होण्याची संधी लवकर लाभू शकते. शीलपालनाच्या या मार्गास बौद्ध तत्त्वज्ञानात “पटिपत्ती” असा शब्दप्रयोग आहे. म्हणून आचरणशील बौद्ध धम्म म्हणजे पटिपत्ती !

हे आचरणशील “बौद्ध” धर्मग्रंथांचा अभ्यास सहसा करीत नाहीत. त्यामुळे दीघनिकायात काय संदर्भ आहेत किंवा संयुत्त निकाय म्हणजे काय , विनयपिटकांत कोणत्या प्रसंगी भगवान बुद्धांनी भिक्खू- भिक्खूणींना मांसाहार वा फलाहार करण्याची परवानगी दिली , इत्यादी तपशील “पटिपत्ती” करणाऱ्या बौद्धांस माहित असतीलच , असे नाही. बौद्ध साहित्याच्या या अभ्यासास “परियत्ती” असा शब्दप्रयोग वापरला जातो. परियत्ती म्हणजे धम्माचा ‘थियॉरिटिकल’ अभ्यास ! धम्मात जशी शीलपालनाचा सराव करणाऱ्यांची परंपरा आहे तशीच थियॅारिटिकल अभ्यास करणाऱ्यांची सुद्धा वेगळी परंपरा आहे. त्यांतील कोणी ‘सुत्तपिटक’ पाठ करतात , कोणी ‘विनयपिटक’ तर कोणी ‘अभिधम्मपिटक’ पाठ करतात. ही तिन्ही पिटके पाठ करणारे देखील आहेत. त्यांना “त्रिपिटकाचार्य” असे संबोधले जाते. श्रीलंका , थायलंड , बर्मा अशा बौद्ध संस्कृतीप्रधान देशांत आजही “त्रिपिटकाचार्य” आढळतात. ज्यावेळेस बौद्ध भिक्खूंची “संगिती” भरते तेव्हा हेच त्रिपिटकाचार्य खरे- खोटे वा योग्य – अयोग्य ठरवतात. कोणते सुत्त कुठल्या निकायातून घेतले आहे , त्याचा अट्ठकथेतील संदर्भ व अर्थ काय आहे याचे तपशीलवार मुखोद्गत ज्ञान त्रिपिटकाचार्यांना असते. “आचार्य” शब्दाचे मूळ बौद्ध साहित्यात म्हणजेच धम्मात आहे. “उपाध्याय” शब्द देखील असाच धम्माशी निगडीत आहे.

भगवान गौतम बुद्धांचा धम्म या परियत्ती करणाऱ्या अभ्यासकांनी “शाब्दिक” स्वरुपात जिवंत ठेवला आहे. म्हणून पटिपत्ती करणारे कुठे चुकतात वा अडखळतात हे परियत्ती करणारे सांगू शकतात. भगवान बुद्धांचे समकालीन असणारे भिक्खू उपाली हे ‘विनयधर’ आहेत. म्हणजे पटिपत्ती सोबतच त्यांनी ‘विनयपिटक’ सुद्धा तोंडपाठ केले होते. राहुल सांकृत्यायन यांनी संपादीत केलेले व नवी दिल्ली येथील सम्यक प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘विनयपिटक’ हे ६६७ पृष्ठांचे आहे. एवढा मोठा ग्रंथ पाठ करणाऱ्या उपाली भन्तेंची स्मरणशक्ती किती दांडगी असेल ! ‘विज्जा’ आणि ‘आचरण’ यांचा संयोग असलेल्या सर्वजातीय विज्जाचरणसंपन्न भिक्खूंना उन्नयन करण्याची अशी अपूर्व संधी बौद्ध धम्माने दिली. सैतानी जातीसंस्था संपुष्टात आणण्याच्या काळात हे वैशिष्ट्य अधोरेखित करणे गरजेचे वाटते.

आधुनिक काळात डॉ आंबेडकर यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारण्यास आता सत्तर वर्षे होत आली आहेत. या काळात बौद्ध समाजाने शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती केली असली तरी धम्म क्षेत्रातील प्रगती तेवढी स्पृहणीय नाही. दलाई लामा , थिक न्हात हान्ह , अजाहन जयसारो या भिक्खूंमुळे तसेच विपश्यना साधना सर्वदूर पसरविणारे गोएन्का गुरुजी यांच्यामुळे जन्माने बौद्ध असलेले हजारो नागरिक आता “पटिपत्ती” मार्गाने जात आहेत. प्रत्येक शहरांत व जिल्हा तालुक्यांत गंभीरतेने साधना करणारे “बौद्ध” आढळतात. या पटिपत्ती मार्गास आता परियत्ती मार्गाची जोड देणे आवश्यक आहे. भारतीय बौद्धांमधून आता ‘विनयधर’ , ‘सु्त्तधर’ व ‘त्रिपिटकाचार्य’ तयार व्हायला हवेत. त्यादृष्टीने हालचाल करण्याची गरज आहे. परियत्ती बलवान झाली कि , पटिपत्ती वाढते व पटिपत्ती बलवान झाली कि , परियत्ती वाढते ! असा तऱ्हेने परियत्ती व पटिपत्ती परस्परांच्या सहाय्याने वाढतात.

परियत्ती रुजण्यासाठी सामूहिक साधनेसोबत सुत्तपठन करणे आवश्यक आहे. हे सुत्तपठन तालासुरात म्हणणे अपेक्षित आहे. बुद्धांच्या सर्व गाथा या गेय्य आहेत. त्यामुळे त्या लवकर पाठ होतात. म्हणून परियत्तीचा उपक्रम जेवढ्या लवकर चालू होईल तेवढ्या लवकर भारतीय बौद्धांतून परियत्ती करणारे बौद्ध पुढे येतील. कोणी सांगावे , यांतूनच कोणी त्रिपिटकाचार्य देखील निर्माण होऊ शकतील !

  आपण सर्वांनी यांवर चर्चा- विनिमय व अंतिमतः अंमल करुन धम्माचा हा गाडा यथाशक्ती पुढे नेऊ या ! 

सर्वांचे मंगल होवो…
———— शुद्धोदन आहेर.
तारीख ३ जानेवारी , २०२४
क्रांतीज्योती सावित्रीमाता जयंती

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!