शरद पवारांना इव्हीएम विषयी शंका तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की इव्हीएम बाबत पुरावे नाहीत?
श्रीरंजन आवटे
विधानसभेचा निकाल लागून एक महिना उलटला तरीही महाविकास आघाडी अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. विधानसभेचा निकाल धक्कादायक होता, अविश्वसनीय होता, हे खरेच; पण त्याला कसा प्रतिसाद द्यायचा, हे महाविकास आघाडीला अजूनही कळालेलं नाही. भाजपच्या पाशवी ताकदीपुढे महाविकासचे भंजाळलेपण अधिक स्पष्टपणे दिसू लागले आहे.
आजच सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की इव्हीएम बाबत पुरावे नाहीत, त्यामुळे त्या अनुषंगाने आरोप करणे योग्य नाही तर स्वतः शरद पवारांनी इव्हीएमविषयी शंका उपस्थित करत बाबा आढावांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यापासून ते मारकडवाडी गावक-यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यापर्यंत भूमिका घेतली आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी एकूण निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. तिसरीकडे जयंत पाटील महायुतीला शुभेच्छा देऊन पुन्हा गोडगुलाबी भाषणे ठोकू लागले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाची अशी कावरीबावरी अवस्था झाली आहे.
जी अवस्था शरद पवार गटाची आहे तशीच काहीशी उद्धव ठाकरे शिवसेनेची. उद्धवसेनेला केडर आहे. त्यांचा कार्यकर्ता भावनिक आहे. संघटन आहे. त्यासाठीची तडफदार फौज आहे मात्र तरीही निवडणूक प्रक्रियेतील अपारदर्शकतेच्या विरोधात त्यांना मोठे आंदोलन उभे करता आलेले नाही. अधिवेशनात देवेंद्रांना ज्या प्रकारे उद्धव भेटले त्यातून पेटती मशाल विझू लागल्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र कॉन्ग्रेस हे इतके थोर प्रकरण आहे की त्याबाबत काय बोलावं ! आमदारकीची शपथ घ्यायची की नाही, इथपासून मोठा संभ्रम या पक्षापुढे आहे. आता पुरेसा वेळ असल्यामुळे २०२९ ला मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा ही मंडळी करु शकतात !
एकूणात महाविकास आघाडी हतबल दिसते आहे. करुण दिसते आहे. तिची अवस्था अतिशय दयनीय आहे. या आघाडीत कोणताही लढाऊ बाणा नाही.
जनतेने लढावे, बाबा आढावांनी ९४ व्या वर्षी उपोषण करावे अशा यांच्या अपेक्षा; पण यांचा पक्ष रस्त्यावर उतरुन, सर्वस्व झुगारून काम करायला तयार नाही.
मोदी सरकारने निवडणुकीच्या संदर्भातली माहिती सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ देता येणार नाही, याबाबत निवडणूक नियम १९६१ मध्ये बदल केले तरीही महाविकासला या विरोधात तीव्र आंदोलन उभा करता आलेलं नाही.
विरोधी पक्षांची अशी विदारक अवस्था होणे हे लोकशाहीसाठी सुचिन्ह नाही. विचित्र कोंडीला वाचा फुटते तेव्हा अभूतपूर्व काही घडण्याची शक्यता असतेच. ते नेते किंवा राजकीय पक्ष घडवतील, असे नव्हे. इथली तुमच्या आमच्यासारखी सामान्य जनताच त्यातून मार्ग दाखवेल.
हम देखेंगे !
श्रीरंजन आवटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत