बोधिसत्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

दि मोस्ट रिमार्केबल कोलंबियन….
मी तुमच्या व्यक्तित्वाला खुदा अथवा प्रेषित संबोधित नाही तरीही …
तुमच्या डोळ्यातील तेजाशी नजर भिडवतांना दिव्यत्वाचा भास होतो बाबासाहेब ………
म्हणून माझे हृदय ओघळले आहे तुमच्या पायावर फुलासारखे अलगद ,
मी पाहतो तुमचा प्रदीप्त प्रज्ञांकित चेहरा तेव्हा
शीलाचे सूर्यतेज मला तुमच्या डोळ्यात लकाकतांना दिसते,
तुम्ही रोखलेले बोट मला संगिनीच्या पात्यासारखे चकाकतांना दिसते !
बर्ट्रान्ड रसेल झाला होता तुमच्या भेटीसाठी आतुर…
ब्रिटीश म्युझियममध्ये

‘रिकन्सट्रक्शन ऑफ सोसायटी’ वरील तुमचे क्रिटीक्स वाचून
विन्स्टन चर्चिलच्या पर्सनल डायरीवर असते तुमच्या समक्ष भेटीसाठीची नोंद…..
लॉर्ड माउंटब्याटनलाही होते तुम्हाला बघण्याची अनावर इच्छा…….
हेरॉल्ड लास्की दिपून जातो तुमच्या दैदिप्यमान विद्वत्तेने……..
लेनिनच्या कृतीवरही उठते तुमची सटीक लेखणी…..
केनेथ ग्रिफिथला मोहविते तुमची संघर्षशील जीवनकहाणी……
जोसेफ स्टालिनच्या मृत्यूवरही तरळते तुमच्या डोळ्यात पाणी
तुमच्या अफाट तर्कशक्तीचा सार्थ अभिमान वाटतो……
एडविन क्यानन व सेलिंगमन या गुरुद्वयांना
प्रो. जेनिंग भारावून जातात तुमच्या प्रकांड पांडित्याने…
नेहरू, पटेल, प्रसादांचे उडतात फ्युज तुमच्या बुद्धीच्या प्रखरतेपुढे…..
युद्धकैदी पोरस ला द्यावे जिवदान सिकंदराने तसे गांधीना तुम्ही दिले प्राणदान……
एकेक रक्तथेंब जाळून घडविले तुम्ही या देशाचे जनतांत्रिक संविधान
तुम्ही या विश्वाचे अद्वितीय सम्राट…… बाबासाहेब !….
कोलंबियाने तुम्हाला केला मानाचा मुजरा,…..
‘दि मोस्ट रिमार्केबल कोलंबियन’ म्हणून
आणि देशाकडे वळली पुन्हा साऱ्या जगाची नजर,
बाबासाहेब ! तुमच्या शब्दा- शब्दात दिसतो मला विद्रोही व्हालटेअर,
बाबासाहेब ! तुमच्या तेजस्वी प्रतिमेकडे बघतांना मला आठवतो नेहमीच
रोम मधला आदी विद्रोही स्पारटाकसचा युद्धरत पुतळा
ज्याचा एक हाथ कुरवाळत असतो निरागस बाळाला आणि
दुसऱ्या हातात असते तळपती तलवार त्वेषाने उगारलेली
तेव्हा तुमच्यातला मकाबी मला अधिक प्रिय वाटतो….
मी तुमच्या व्यक्तित्वाला खुदा अथवा प्रेषित संबोधित नाही तरीही
तुमच्या डोळ्यातल्या तेजाशी नजर भिडवतांना
मला दिव्यत्वाचा भास होतो…. बाबासाहेब !….
कवी : केतन पिंपळापुरे
‘डेमोफून’ या संग्रहातून
‘दि मोस्ट रिमार्केबल कोलंबियन’ या कवितेतील अंश.
( ही कविता लिहिणाऱ्या कवीला मानाचा मुजरा )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत