जाती व्यवस्थांताशिवाय लोकशाही समाजवाद येणार नाही–डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थांताशिवाय लोकशाही समाजवाद येणार नाही असे बजावले. याचा अर्थ संविधानाने जात्यंताचे कायदे केले असले तरी संविधान जात्यंताची क्रांती करत नाही तर जात्यंताची क्रांती ज्यांना जातीची आच लागली आहे त्यांनाच ती करावी लागेल. बुद्ध हा समाजक्रांतीचा महत्तम तत्त्वज्ञानी पुरुष होता म्हणूनच त्यांनी धर्म सम्मत असलेली जातवर्ण, दास व गुलामांची प्रथा कृत्रिम असल्याची जाहीर घोषणा केली. बुद्धाने आपल्या धम्माचा धर्म होणार नाही याची खबरदारी घेतली, कारण त्याला आपल्या भिक्खू संघाचे ब्रह्मोभांडवली धार्मिकीकरण होऊ द्यायचे नव्हते. त्याच्या जाणतेपणामुळेच धम्माचा वारसा हा समाजवादी क्रांतीचा राहीला. बुद्धाच्या या समाजक्रांतीची मौलिकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय कुणी जाणू शकले नाही. मग ते समाजवादी किंवा मार्क्सवादी अथवा अन्य कोणी बुद्धिवादी तत्त्वज्ञ असतील. कारण ब्राह्मणीधर्माने धर्माची मक्तेदारी स्वतःकडे धर्मसम्मत करून घेतल्याने व अन्य वर्णाला विद्येचा मजाव केल्यामुळे ते सर्व धर्मसम्मत अज्ञानी राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला प्रवुद्ध केले, त्यामुळे त्यांनी आम्हाला Educate! Agitate!! Organise!!! व्हायला सांगितले, आम्ही त्याचे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे उलटेकरण केले.
कारण आंबेडकरी चळवळीत सुशिक्षितांचा भरणा आहे बुद्धिजिवीचा नाही.
ब्राह्मणी धर्माचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी सर्वच धर्माला ब्राह्मण पुरोहिताचा वर्ग पुरविला आणि सर्वच धर्माचे ब्राह्मणीकरण व जातीकरण केले.
त्यामुळे आज प्रत्येक धर्मात जातवर्ण आधारित व्यवस्था उभी झालेली आपल्याला दिसते, परंतु जात ही मूलतः राष्ट्रविरोधी असते व ती लोकशाही शासन व्यवस्थेला मारक ठरते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी जात व धर्म विरोधाची धर्मातीत चळवळ उभी केली असताना आम्ही मुस्लिम, ख्रिश्चन, शिखांच्या जात स्वीकृतीच्या धर्मातर चळवळीला सहयोग करणे म्हणजे जात व धर्माच्या संदर्भाने आंबेडकरी विचाराशी द्रोह करणेच होय. हिंदूधर्मातील जाती वाईट व अन्य धर्मातील जाती प्रथेबाबत मौन या गैरवर्तनाने जातीविहीन, धर्मविहीन लोकशाही समाजवादी राष्ट्र कसे उभे राहील? बाबासाहेबांच्या प्रेरणेने पाश्चात्य राष्ट्रांनी जातीचा विषाणू नष्ट करणारा कायदा केला. आंबेडकरी चळवळीला जातवर्ग व्यवस्था बदलाच्या क्रांतीसाठी जातवर्गव्यवस्थांताच्या क्रांतीचा संघर्ष करावाच लागेल. कारण उद्देश भारत बुद्धमय करण्याचा व धम्मराज्य स्थापनेचा आहे. इतिहास आम्हाला सांगतो समाजव्यवस्था ही समाजसुधारणेने कधीच बदलत नाही तर ती केवळ क्रांतीनेच बदलते.
बुद्धप्रणीत आंबेडकरःधम्म क्रांती ही अहिंसक आहे हिंसक नाही. कारण स्वातंत्र्याच्या लढ्याने देशात सत्तांतर (Transfer of Power) झाले व्यवस्था बदलाची क्रांती नाही? परंतु दार्शनिक झेप घेण्याची क्षमता नसलेले आमचे पक्ष, नेते, संस्था व संघटना आंबेडकरी चळवळीला मावळतीकडे लोटत असून स्वनेतृत्वाला ते अस्ताकडे घेऊन जात आहेत. बौद्धिक प्रतिभांना दर्शनिक विमोचकतेचा आयाम नसेल तर ती प्रतिभा महत्तम ठरू शकत नाही
. बुद्धाने खऱ्या मतभेदाला पाठिंबा दिला आणि आपल्या व्यक्तिगत निर्णयाला संघाची संमती घेतली हे रिपब्लिकन असलेले कधी जाणतील ? रिपब्लिक विचारधारा असलेला धम्म आणि संविधानाची जाती व धर्माला अधिकृत संमती नसताना एकाबाजूने मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, जैन व बौद्ध यांना केंद्र सरकारने समांतर धार्मिक अल्पसंख्याक
घोषित केले तर दुसऱ्या बाजूला हिंदूप्रमाणे शिख इस्लाम व ईसाई धर्माचो जातीला संविधानिक मान्यता आहे त्यामुळेच धमांतरीत धार्मिक अल्पसंख्याक हे अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहेत.
अनुसूचित जातीची यादी दाखवते की, ती वरील धर्माला गृहित धरून झालेली नाही तर हिंदू धर्मातील रूढी व अस्पृश्यतेच्या चालीरीतीवरून तयार झालेली आहे त्यामुळेच अनुसूचित जातीसाठी वापरले गेलेले निकष खालीलप्रमाणे आहेत. हिंदू धर्मातील असे लोक ज्यांना देवदर्शन अथवा मंदिर प्रवेशाचा अधिकार नाही. ब्राह्मण पंडित पुरोहित वर्ग ज्यांचे क्रियाकर्म पूजाविधी करणे निषिद्ध मानतात आणि ज्यांच्या स्पर्शाने व सावलीने विटाळ होतो इत्यादी निकषाच्या आधारावर अशा उपेक्षित जातीची वेगळी जनगणना प्रथम १९१८ मध्ये सर डेनझील या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली. १९३१ मध्ये तत्कालीन जनगणना आयुक्त जे.एस. हटन यांनी केलेल्या जनगणनेत हिंदूधर्मातील उपेक्षित जातीचा (Depressed Class) शोष घेताना जे निकष वापरले ते सार रूपाने खालीलप्रमाणे आहेत.
१. अशा जाती ज्यांच्याकडे ब्राह्मण पुरोहित पूजा अर्चा-क्रियाकर्म करत नाही.
२. अशा जाती ज्यांचे केस कापणे, कपडे शिवणे, पाणी पुरवणे याला न्हावी, शिंपी, पाणके नकार देतात.
३. अशा जाती ज्यांच्या स्पर्शाने उच्चवर्गीय हिंदूंना विटाळ होतो.
४. अशा जाती ज्यांच्या हातचे पाणी, वस्तू, खाद्य उच्चवर्गीय हिंदूंना चालत नाही.
५. अशा जाती ज्यांना सार्वजनिक तळे, विहीर, रस्ते, शाळा यांचा वापर करण्यास मज्जाव केला गेला.
६. अशा जाती ज्यांना देवदर्शनास हिंदू मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे.
७. अशा जातीच्या व्यक्ती ज्या उच्चशिक्षित असल्या तरी उच्चजातीच्या शिक्षित व्यक्ती त्यांच्याशी समानतेने वागत नाही.
८. अशा जाती ज्या संधी वंचित राहिल्यामुळे अज्ञानी दरिद्री वसामाजिकदृष्ट्या उपेक्षित राहिल्यात.
९. अशा जाती ज्यांना व्यापार उद्योग व व्यवसाय करण्यास धार्मिक बंधणे लादली.
या नोंदीवरूनच ब्रिटिश सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया (शेड्युल्ड कास्ट) ऑर्डर १९३५ हा आदेश ३० एप्रिल १९३६ ला लागू केला. या कायद्याच्या परिशिष्ट १ कलम १६ मध्ये जनगणना आयुक्त जे.एस. हटन यांच्या अहवालाप्रमाणे बहिष्कृत वर्गाची व्याख्या व त्या जातीची यादी दिलेली आहे. २६ जाने. १९५० रोजी भारतीय संविधान अमलात आले तेव्हापासून त्याला संविधान अनुसूचित जाती आदेश १९५० म्हटल्या जाते. हिंदूधर्मातील अस्पृश्य जाती हिंदूधर्माशी संबंधित असल्यामुळे हा आदेश १९५६ पर्यंत हिंदू धर्मातील अनुसूचित जातींसाठी लागू होता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व हिंदू धर्माचा त्याग केला. या द्वेषाने अनुसूचित जाती आदेश १९५० यामध्ये २५ सप्टेंबर १९५६ रोजी ६३ व्या सुधारणेद्वारे आधीच बदल केला व केवळ हिंदू किंवा शिख धर्मातील अनुसूचित जातीलाच सवलती मिळतील असे नमूद केले. कारण अनुसूचित जातीच्या ज्या लोकांनी हिंदूधर्माचा त्याग केला त्या जातींना अनुच्छेद ३४१ च्या पॅरा ३ मधून बाहेर काढल्यामुळे शिखांनी त्याला विरोध केला व १९५६ मध्ये पॅरा ३ चे संशोधन करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले व शिखां मधील काही जातीला अनुसूचित जातीचा दर्जा प्राप्त झाला. शिखांमध्ये रामदासी, रविदासी, मजहबी, शिकलगार, मिरासी, बवारी या अनुसूचित जाती आहेत तर खत्री, जाट या शिखांमधील उच्च जाती समजल्या जातात. ख्रिश्चन, मुस्लिम धर्मीयात जातींची श्रेष्ठ कनिष्ठता प्रवेश प्रात यातील धर्मांतरीत लोक हे सुद्धा अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, यासाठी लढत आहेत
संदर्भ बुद्धमय भारताचे क्रांतिविज्ञान लेखक माननीय रमेश जीवने
9881820239
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत