आर्थिकनिवडणूक रणसंग्राम 2024भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

देशातल्या निवडणुका एवढ्या भ्रष्ट झाल्या?

तब्बल 8000000000 आठशे कोटींपेक्षा जास्त रक्कम म्हणजे आठ अब्ज रुपये निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान पकडले आहेत? हे अर्थातच हिमनगाचं एक टोक आहे. न पकडली गेलेली रक्कम याच्या कितीतरी पटीत असणार हे उघड आहे.

हा आकडा निवडणूक आयोगानं अधिकृतरित्या दिलेला आहे. कोणतंही न्यायालय याची स्वतः होऊन दखल घेऊन देशातल्या निवडणुका एवढ्या भ्रष्ट झाल्या असतील तर उपाययोजना करा हे सांगायला तयार नाही.

एवढा पैसा कुठून आला?

‘सगळेच पक्ष पैसा वाटतात’ असं जनरलायझेशन करून भ्रजपाचं संरक्षण करणाऱ्या मतलबी समर्थकांनी एक काम करायला पाहिजे. पुण्यात किंवा मुंबईत तुमच्याकडे कामाला येणारी बाई, ड्रायव्हर, भाजीवाला कोणी ना कोणी उर्वरित महाराष्ट्रातून आलेला आहे. त्यांच्याशी बोला. ते ही नसेल तर ओला किंवा उबरच्या ड्रायव्हरशी बोला. बहुतेक सगळे हेच सांगतात की मतामागे पाच हजार आणि जाण्यायेण्याचा खर्च त्यांना दिला गेला. नंतर कोणत्या पक्षानं दिला विचारा, उत्तर मिळेल. फसवता कोणाला जनरलायझेशन करून?

बाबा आढाव यांनी यावर उपोषण केलं. श्रीकांत उमरीकर या आमच्या मित्र असलेल्या संघ भाजप समर्थक महोदयांनी लगेच त्यांची खिल्ली उडवणारी ती काय ती त्यांची उसंतवाणी लिहीली.

प्रश्न बाबा आढाव यांचा नाही. वयाच्या 95 व्या वर्षी एक माणूस निवडणुकीत एवढा काळा पैसा का येतो म्हणून तीन दिवस उपोषण करतो आणि श्रीकांतला काळा पैसा हा मोठा प्रश्न न वाटता बाबांचं उपोषण हाच महत्वाचा खिल्ली उडवण्यायोग्य प्रश्न वाटतो, ही मानसिकता कुठून येते हा प्रश्न आहे.

श्रीकांत आणि इतर संघवाले अथवा भाजप समर्थक हे तेच लोक आहेत जे काळा पैश्याविरूद्ध नकली आंदोलन करणाऱ्या बाबा रामदेव नावाच्या व्यापाऱ्याचं जोरदार समर्थन करत होते. ही तीच माणसं आहेत जी आपल्याला घसे खरवडून सांगत होती की मोदी काळा पैसा भारतात आणणार आणि देशातला भ्रष्टाचार थांबवणार. आणि काळ्या पैश्यांविरूद्ध लढणाऱ्या माणसाची आज तेच थट्टा उडवत आहेत.

संघाच्या कोणत्या स्वयंसेवकानं हा विषय कोर्टात नेऊन मागणी केली की निवडणूक नियमात सुधारणा करा? कोण संघवाला निघाला ज्यानं स्वतःच्या सरकारला पत्र लिहून सांगितलं की निवडणुकीतला पैसा थांबवण्यासाठी उपाययोजना करा?

श्रीकांत हे फक्त उदाहरण आहे. अनेक लोक आहेत. संघ दहा तोंडांनी बोलतो. खरं कधीच बोलत नाही. खोटं हेच खरं कसं हे सिद्ध करण्यासाठी बोलतो. भ्रष्टाचारावर संघाची भूमिका अत्यंत मतलबी आणि संधीसाधू आहे. मोदींचा भ्रष्टाचार ही संघाला राजकीय अपरिहार्यता वाटते तर काँग्रेसचा भ्रष्टाचार म्हणजे महापाप. काश्मिरात भाजपानं मेहबुबा सोबत जाणं ही देशभक्ती आहे असं संघ सांगणार आणि काँग्रेसनं तेच केलं तर तो देशद्रोह. सत्तर हजार कोटींचा आरोप करून अजितदादांना मुख्यमंत्री केलं की संघ ती चाणक्यगिरी आहे असं सांगणार, काँग्रेस सोबत असले की दादा त्यांच्यासाठी भ्रष्टाचाराचं प्रतिक असणार. महाराष्ट्रात संघाचे गोरक्षक गोमांसावर गजहब माजवणार आणि गोव्यात यांचं सरकार गोमांसाचा व्यापार करणार.

ही विचारसरणी नकली आहे हे आम्ही म्हणतो ते याचसाठी. संविधानावर बेगडी प्रेम दाखवतांना हे लोक संविधानिक पदांना हायजॅक करून टाकतात. मंदीर-मस्जिदीवर आंदोलनं करणार पण व्यवस्था सुधरावी यासाठी त्यांनी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही नव्हते. रिफाॅर्म्सच्या कोणत्याही लढ्यात नव्हते. मुस्लीम स्त्रीयांच्या बुरखा हटावसाठी लढले म्हणून हे हमीदभाईंचं कौतुक करणार पण गुजरात-राजस्थानच्या बायकांच्या घुंघटमुक्तीसाठी आंदोलन करणार नाहीत. उलट एखाद्या बाईनं घुंघट नाकारला तर संस्कृती बुडवली म्हणून तिला टार्गेट करणार. बिंदी लावणं अथवा न लावणं एखाद्या बाईचं व्यक्तीस्वातंत्र्य आहे हेही मान्य नसलेली ही विचारधारा. एखाद्या आंदोलनाचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कसा करायचा याचं कसब मात्र त्यांच्यात ओतप्रोत भरलेलं आहे.

श्रीकांतला कदाचित बाबा आढाव हा माणूसच माहित नसेल. एक गाव एक पाणवठा ही त्यांची चळवळ माहीत नसेल. संघवाल्या कोणालाच हा माणूस कळणार नाही कारण काच आणि पत्रा वेचणार्या कष्टकरी बायका ही बाबांच्या दृष्टीनं माणसं आहेत तर संघवाल्यांच्या दृष्टीनं मतदार. आदिवासी बाबांच्या दृष्टीनं माणूस असतो तर संघवाल्यांच्या दृष्टीनं वनवासी मतदार. हमाल हा बाबांच्या दृष्टीनं माणूस असतो तर संघवाल्यांच्या दृष्टीनं मतदार. वंचित महिला बाबांच्या दृष्टीनं माणूस असतात तर संघवाल्यांच्या दृष्टीनं ‘लाडकी’ मतदार.

निवडणुकीत झालेला पैश्यांचा मुक्त वापर आणि हा पैसा आला कुठून हा गंभीर विषय आहे. संघ समर्थक बाबा आढाव यांची खिल्ली उडवणारच कारण निवडणुकीतून पैसा वजा झाला तर भाजप शून्य राहील हे त्यांना माहीत आहे. पैसा आणि धार्मिक द्वेष हे त्यांच्यासाठी सत्तेचे पासवर्ड आहेत. भारताला हिंदू राष्ट्र करायचं असेल तर भाजपाचे सगळे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यभिचार हाच आपला पवित्र राष्ट्रीय कुलाचार आहे हे मतदारांवर ठसवणं हीच जबाबदारी अनेकांनी अंगावर घेतली आहे. एकदा विवेकाला दीर्घ सुट्टीवर पाठवलं की कोणताही विकार हाच विचार वाटतो आणि आपण कोणावर बोलत आहोत याचं भान रहात नाही. भविष्यात विवेक कधी जागा झालाच तर आपण काय भीषण करून बसलो हे अफगाणिस्तानच्या लोकांसारखं लक्षात येऊन पश्चात्तापही होईल पण वेळ निघून गेलेली असेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!