धर्मांतराची आवश्यकता विशद करताना बाबासाहेब म्हणतात

‘‘जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच ध र्मांतरांचे महत्त्व अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोन्हींचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य. ज्या धर्मांतरापासून स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही..’’ ‘‘धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे.’’
आपले धर्मांतराविषयीचे ठाम मत विविध अंगांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. ते म्हणतात,
‘‘माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटन करावयाचे असेल तर धर्मांतर करा. समता, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.’’
नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या ५ लक्ष अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर १५ ऑक्टोबर १९५६ रोजी परत ३ लक्ष अनुयायांना दीक्षा व त्यावेळी केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हणले की, ‘आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी ‘नाग’ नदी आहे. म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.’’ ‘मनुस्मृती’मध्ये चातुर्वण्य सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये समता नाही. हिंदू धर्माच्या विचित्र वर्णव्यवस्थेने सुधारणा होणे शक्य नाही. उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिक्खू होते. सागरात गेल्यावर जशा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, असे समतेने सांगणारा एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय,’’
डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले की.. ‘‘या देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.’
‘देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. दुःखाने पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे.’’
तब्बल दोन तास चाललेल्या आपल्या प्रभावी, अर्थपूर्ण भाषणाचा समारोप करताना डॉ. बाबासाहेबांनी उपस्थितांना बजावले की, ‘‘तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान-सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू शकू.’’ बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी सुरू झालेल्या ‘धम्म’ प्रवासाची सांगता १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दीक्षेने झाली……… संकलन…..🌹🌹🌹भीमरायाचा पाईक मी🌹🌹 🌹… गृप संघ नागपूर..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत