निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

इव्हीएम विषयी साऱ्या देशातील जनतेत आक्रोश– अशोक सवाई

(राजकीय)

गेल्या ४ जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल आला. आणि भाजप २४० वर अडकली तेही ठरवून अडकली असावी. नाही तर महाराष्ट्राच्या निकाला सारखाच इव्हीएम द्वारे त्यांना लोकसभेचा ही निकाल लावता आला असता. इकडे सर्व विरोधी पक्ष आम्ही भाजपाला बहुमतापासून रोखलं यातच मश्गुल होते. पण अंतर्गत राजकीय रंग ढंग फार वेगळे असतात बाबूजी… जे सामान्य जनतेच्या आकलना पलीकडे असतात. तिकडे नानी सोबत आधीच सेटिंग्ज झाली असावी. ना म्हणजे नायडू नी म्हणजे नीतीश कुमार. भाजपला २४० (या २४० पैकी ७९ जागेवर इव्हीएम घोटाळा करून ७९ हरलेल्या जागा भाजपने जिंकल्या हे त्याविषयीचे तमाम व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळले) वर रोखल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये व जनतेमध्ये भाजपने एक प्रकारे इव्हीएम बाबत विश्वासार्हता निर्माण करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला असावा. पण तरीही लोकसभेच्या निवडणुकीतील घोटाळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने इव्हीएम विरोधात जनतेच्या मनात खदखद होतीच. चार राज्यातील विधानसभा निवडणुका आणि त्याचा निकाल आपल्या अपेक्षे प्रमाणेच लागेल हे भाजपला पहिलेच ठावूक होते. हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी तिथल्या निवडणुकीच्या एक दिवस आधीच तसे कॅमेऱ्या समोर बोलूनही दाखवले होते. इव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधकांना हरवले तर जनते सोबत विरोधी पक्षांनी उग्र रूप धारण करून इव्हीएम विरोधात आंदोलन करू नये म्हणून ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील एकत्रित न घेता वेगवेगळ्या घेण्यात आल्या. इव्हीएम विरोधात एकाच राज्यात कितीही उग्र आंदोलन झाले तर ते बलप्रयोग करून मोडून काढता येते (महाराष्ट्रातील मारकळवाडी हे त्याचे ताजे उदाहरण) परंतु एकाच वेळी चारही राज्यात उठाव झाला अन् त्याचे लोन साऱ्या देशभर पसरले तर ते थोपवणे मुश्किल होईल. किंवा यादवी माजेल ही भीती भाजप व आर एस एस वाल्यांना होती. म्हणून बहुधा अशा खेळ्या खेळल्या गेल्या असाव्यात. तसेच गुप्तचर विभागा मार्फत सुद्धा तशा शंकांचे अहवाल सरकारला प्राप्त झाले असावेत.

आता गेल्या २३ नोव्हेंबर ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आला. आणि इव्हीएम च्या सहाय्याने साऱ्या विरोधी पक्षांना एखाद्या पुराच्या लाटेसारखे वाहून नेले. इतके की विरोधी पक्षनेता पद देखील शिल्लक ठेवले नाही. त्यामुळे इव्हीएम बद्दल पुन्हा संशय बळकट झाला नव्हे आता तर सर्वांची खात्रीच झाली की ही सर्व इव्हीएमचीच करामत असल्याची. तसे त्या इव्हीएम घोटाळ्याचे दररोज एक एक व्हिडिओ बाहेर येवू लागले. जसजसे व्हिडिओ बाहेर येवू लागले तसतसे त्यावर पत्रकार, राजकीय निरीक्षक, समीक्षक, विचारवंत, साहित्यिक, कलावंत व सामान्य जनता देखील इव्हीएम विरोधात चर्चा करू लागली, बोलू लागली. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्या आल्या सोशल मीडियावर निवडणुकीचे विश्लेषण, परीक्षण, निरीक्षण, समीक्षण, डिबेट्स् होवू लागले. तसेच इव्हीएम विरोधात चर्चा ही होवू लागली. पण त्याची दखल निवडणूक आयोग बिलकुल घेणार नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे या साऱ्या गोष्टी वांझोट्या ठरणार आहेत. असे जरी असले तरी सोशल माध्यमातून अशा गोष्टी व्हायला पाहिजेत. चर्चा व्हायला पाहिजे. यातून खरे खोटे व राजकीय समज सामान्य माणसापर्यंत पोहोचवली जाते.

काॅंग्रेस व भाजप या दोघांमध्ये दोन दोन टर्म्स ची सत्ता भोगण्यासाठी आपसात मॅच्युअल अंडरस्टॅंडिंग होते. असे बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम आपल्या भाषणातून सांगत आले/सांगत आहेत. आणि आता भाजपचे दोन टर्म्स पूर्ण झाले तरी कपटनितीची भाजप लांडीलबाडी करून काॅंग्रेस व इंडिया आघाडीकडे सत्ता द्यायला तयार नाही. त्याला कारणही आहे. आपली सत्ता गेल्यावर कदाचित आपल्या काळ्याबेऱ्या फाईल्स उघडल्या जातील ही भीती भाजपला वाटत असावी. मुख्यतः गुजरात लाॅबीला

इकडे भाजपने दोन दोन टर्म्स चा अलिखित करार मोडल्या मुळे काँग्रेसने इव्हीएम विरोधात साऱ्या देशभर यात्रा काढण्याचे ऐलान केले. पण त्याच बरोबर काॅंग्रेसने जनतेला हेही सांगायला पाहिजे की, पूर्वी आमच्याच काॅंग्रेसने या देशात इव्हीएम आणून चुक केली ती चुक सुधारण्यासाठी आम्ही इव्हीएम विरोधात यात्रा काढतो आहोत. आणि इव्हीएम विरोधात लढतो आहोत. दुसरीकडे म्हणजे संसद भवनात जसे राजीव गांधींनी बॅलेट पेपर ऐवजी इव्हीएम द्वारे जनतेची मतं घ्यावीत असे बील पास करून घेतले होते. तसेच आता विरोधी पक्षनेता या नात्याने राहूल गांधींनी आधीचे बील रद्द व्हावे व ही इव्हीएम नको बॅलेट पेपरवर मतदारांची मते घ्यावीत असे नवीन बील आपल्या पक्षाच्या व घटक पक्षाच्या राजकीय मुत्सद्देगिरीने पारित करून घ्यावे. तरच विरोधी पक्ष सत्तेवर येवू शकतो. एकट्या काॅंग्रेस मुळे निबर, कोडगी भाजप बधेल असे वाटत नाही. जे जे इव्हीएम विरोधात आहेत त्या सर्वांना यात्रेत काॅंग्रेसने सोबत घ्यायला पाहिजे. काॅंग्रेस ६०-६५ वर्षे सत्तेत असताना एससी/एसटी/ओबीसी/मायनाॅरिटिज या घटकांकडे दुर्लक्ष केले. त्यांना राजकीय प्रतिनिधित्व फारसे लाभू दिले नाही. आता राहूल गांधी या घटकांकडे जावून त्यांच्या भेटीगाठी घेतात त्यांच्या प्रति सहानुभूती दाखवतात. वरील सामाजिक घटकांसाठी आज जेवढी बीजेपी दोषी आहे तेवढीच काॅंग्रेस काल दोषी होती. वरील समाज घटकच नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाजालाही आरक्षणासाठी झुलवत ठेवले. त्यांची आरक्षणाची मागणी आत्ताची नाही तर काॅंग्रेसच्या सत्ता काळापासूनची जुनी मागणी आहे. इ डब्ल्यू एस चे आरक्षण त्या घटकाला न मागता मिळाले. आणि मराठा समाजाची जुनी आरक्षणाची मागणी झुलवत ठेवली. यावर महाराष्ट्रातील संसदीय लोकप्रतिनिधी ब्र काढायला तयार नाहीत. या समाजातील १५% आर्थिक स्थितीने संपन्न असलेले लोक सोडले तर बाकी ८५% समाज गरीबच राहिला आहे. म्हणूनच मनोज जरांगे पाटला सारखा सामान्य माणूस मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसतो. वरील समाज घटकांची व मराठा समाजाची (१५% वाले सोडून) आर्थिक स्थिती सारखीच आहे. याबाबत जर सर्वे केला तर परिस्थिती लक्षात येईल. यासाठीच वरील घटकातील राजकीय जाणकार म्हणतात भाजप व कांग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता भाजप सत्ता सोडेल असे मुळीच वाटत नाही. उलट ते २४० वरून २७२ पार करण्याच्या तयारीला लागतील. आणि पुढे ते नानीच्या कुबड्यांची गरज ठेवणार नाहीत. अमित शहांचं स्टेटमेंट बाघा काय म्हणतात ते. २०२९ मध्ये विरोधी पक्ष मुक्त सरकार आणण्याच्या तयारीला आतापासूनच लागले आहेत ते. साऱ्या सरकारी संस्था/यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यावर त्यांच्या कंठातून असे बेजबाबदार बोल फुटणारच

इव्हीएम विरोधात गदारोळ सुरू असतानाच आर एस एस च्या मोहन भागवतांचे एक स्टेटमेंट आले. ते म्हणतात ‘कमीत कमी तीन मुलं जन्माला घाला नाही तर समाज नष्ट होईल’. कशाला? गरीब अधिक गरीब व्हायला? की आपल्या शाखेत भरती व्हायला? की हिंदू धर्माच्या नावाने वैदिक धर्माचे रक्षण करायला? की गरीबीत, बेरोजगारीत अजून जास्तीची भर पडून देशाचा सत्यानाश करायला? अहो भागवत महाराज या देशावर कैक परकीय आक्रमणे झालीत तेव्हा समाजाची लोकसंख्या कमी असूनही समाज नष्ट नाही झाला आणि आता स्वतंत्र भारतात समाज नष्ट होईल? भागवतजी आपलं दुखणं हे नाही की हिंदू समाजाची लोकसंख्या घटतेय, आपल्या मनातील दुखणं हे आहे की हिंदू धर्मातील विचारवंत, सूज्ञ लोक हिंदू धर्माला कंटाळून आपल्या मूळ बौद्ध धम्माकडे वळत आहेत हे दुखणं आहे भागवतांचंं. आपण विद्वान आहात जरा तोलून मापून बोललं पाहिजे. काहीही भलतं सलतं बोलून समाजाची दिशाभूल करू नये. आणि समजा समाजाने तीन तीन मुलं जन्माला घातली तर त्यांच्या पालन पोषण व शिक्षणाचा खर्च मोहन भागवत उचलणार आहेत का? काहीतरी तोंडाची वाफ घालवायची अन् लोकांच्या टीका टिप्पणीचे धनी व्हायचे. शिवाय भागवतांचं वरील विधान सरकारी धोरणाच्या विरोधात आहे. सरकारचे धोरण आहे की, ज्या व्यक्तीला दोन मुलांच्या व्यतिरिक्त तिसरे अपत्य असल्यास त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही. सरकारी नौकरीचा लाभ घेता येणार नाही. किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेचा ती व्यक्ती लाभ घेवू शकणार नाही. असे असताना भागवत कसे काय म्हणू शकतात की, कमीत कमी तीन मुलं जन्माला घाला? म्हणजे भागवतांना समाजाला सरकारी लाभाच्या धोरणांपासून वंचित ठेवायचे आहे काय? किंवा त्यांच्या या विधानामागे दुसरा तर काही डाव नाही ना? तो म्हणजे सध्या इव्हीएम च्या विरोधात जो गदारोळ उठलेला आहे तो कमी व्हावा किंवा विषय भलतीकडेच वळवून त्यावरच चर्चा होत रहावी. व इव्हीएम चा मुद्दा क्षीण होवून लयास जावा. असा तर भागवतांच्या विधानाचा अर्थ नाही ना? काही ना काही नक्कीच आहे. त्याशिवाय मोहन भागवत बोलत नाहीत. असो.

जेव्हापासून म्हणजे ८ आक्टोबर २०१३ ला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्यात कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, इव्हीएम द्वारे निवडणूक फ्री, फेअर ॲन्ड ट्रान्सफरन्स होवू शकत नाही. तेव्हापासून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम सुप्रीम कोर्टाच्या निकालाची ती काॅपी घेवून साऱ्या देशभर फिरत होते. आजही फिरतात. व इव्हीएम विरोधात जनजागृती करत होते/करत आहेत त्यांचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ओबीसी जातीनिहाय जनगणनेचा. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी आजही सोडले नाहीत. तसे अजून बरेच मुद्दे आहेत जे आपल्या अभियानातून ते चालवत आहेत. पण वरील महत्त्वाचे व जनतेच्या मूलभूत हक्क अधिकाराशी जोडले गेलेले दोन मुद्दे आजही ते जोर देऊन जनतेसमोर मांडत आहेत. हे काम ते गेले १० वर्षापासून सातत्याने करत आहेत. त्यांच्या या महत्त्वाच्या अभियानात त्यांना कोणीही साथ दिली नाही. ना कोणत्या पक्षाने दिली ना ही कोणत्याही संघटनेने दिली. याबाबत त्यांची भूमिका म्हणजे ‘जो साथ दे उसका भी भला, और जो साथ न दे उसका भी भला’ अशीच राहिली आहे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक नॅशनल मिडियाने गेले १० वर्षात त्यांच्या या जनजागृती अभियानाची साधी दोन ओळीची सुद्धा दखल घेतली नाही. सोशल मीडियाचाच काय तो त्यांना आधार होता आणि आहे. त्यांच्या जनजागृतीच्या अभियानात त्यांची भूमिका ‘एकला चलो रे’ची होती आणि आजही आहे. गेले दहा वर्षांत त्यांच्या सदर अभियानाचा परिणाम असा झाला की, त्यांनी चालवलेले दोन्ही मुद्दे आज भारतात ३२ राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक तालुक्यातील अगदी प्रत्येक गाव खेड्यापाड्यात जावून पोहचले. असे ते आपल्या भाषणातून सांगत असतात. त्यातून खेड्यापाड्यां पासून ते शहरां पर्यंत वरील दोन्ही मुद्द्यांनी लोकांच्या मनात आक्रोश निर्माण केला. इव्हीएम बंद करावी व जातीनिहाय जनगणना करावी यासाठी मूलनिवासी बहुजन जनता वामन मेश्रामां सोबत वेळोवेळी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली, तालुका/जिल्हा पातळी पासून ते थेट देश पातळी पर्यंत धरणे दिली, निवेदने दिली, रास्ता रोको, रेल रोको पासून थेट भारत बंद पर्यंत आंदोलने केलीत. अजूनही सुरू आहेत. आणि जोपर्यंत वरील मुद्दे तडीस जात नाही तोपर्यंत सुरूच राहणार. जनतेमध्ये इव्हीएम विरोधातील आक्रोश व जातीनिहाय जनगणनेला समर्थन पाहून काॅंग्रेस सहित इतर पक्षांनी सुद्धा नाइलाजाने वरील दोन्ही मुद्दे उचलून धरले. काॅंग्रेस ने तर बा कायदा इव्हीएम विरोधात यात्रेचे ऐलान केले आहे. त्यात ते किती सातत्य टिकवून ठेवतात हे येणारा काळ ठरवेल.

संविधान वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना वामन मेश्राम म्हणतात ‘अरे भै, पहृले आप अपना वोट बचाव, अगर आपने अपना वोट बचा लिया तो वोट के माध्यमसे ही संविधान बदलने वालों को बदल सकते है ना? आपने अपना वोट बचा लिया तो संविधान अपने आप बच जाएगा। अगर आपका वोट ही नही बचा तो संविधान कहाॅं से बचेगा? आपने अपना वोट बचा लिया तो फिर संविधान बचाने के लिए अलग से लड़ाई लड़ने की जरूरत नही। अगर आंदोलन करना ही है तो फिर से बॅलेट पेपर पर चुनाव हो इसके लिए आंदोलन करो।

वरील वामन मेश्रामांचे मुद्दे बिनतोड वाटतात. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य जनजागृतीसाठी खर्च केलं जणू काही त्यांचा जन्मच जनजागृतीसाठी झाला इतकं त्यांनी साऱ्या देशभर जागृतीचं काम केलं. अजूनही सुरूच आहे. फक्त ब्राह्मण सोडून ते सर्व जातीधर्मासाठी लढत आहेत. जनजागृतीसाठी त्यांनी इतका मोठा संघर्ष केल्यामुळे एक दिवस त्यांच्या या कार्याला घवघवीत यस आल्याशिवाय राहणार नाही. असे निश्चितच वाटते.

अशोक सवाई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!