दिन विशेषमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

” डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी वस्तुनिष्ठ माहिती भारतीयांना समजणार कधी?”



आज सहा डिसेंबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरीनिर्वाण दिवस. त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम.
नुकतीच “देशाचे शिल्पकार : आंबेडकर द्वेष ( Nation Builder : hate ambedkar) ही अनुसया आर्ट्सची संतोष कांबळे दिग्दर्शित शॉर्ट फिल्म बघण्याचा योग आला. त्यात कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचारी चर्चा करताना, सहा डिसेंबरला होणार्‍या prachand गर्दीमुळे शिवाजी पार्क आणि परिसरात अतिशय घाण होऊन, आठवडाभर तिकडे जाण्याची ईच्छा होत नाही. एव्हढी गर्दी का होते? त्यांना रेल्वे फुकट असते. अशी कुचेष्टेने चर्चा करीत असताना, त्यातील महिला कर्मचारी विचारते की, कोण हे डॉ. आंबेडकर ? त्यांनी देशासाठी काय केलय? त्यावर आंबेडकरी अनुयायी त्यांना सांगतो की, आपल्या उद्धारकर्त्याला 6 डिसेंबरला अनुयायी श्रद्धेने अभिवादन करायला चैत्यभूमीवर येतात . ते काही फुकटात येत नाहीत. याउलट त्या दिवशी रेल्वेचे उत्पन्न वाढते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार असून, दामोदर व हिराकुड प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहेत. त्यांच्या “प्रॉब्लेम ऑफ रुपीज” ह्या ग्रंथानुसार भारतीय रिजर्व बँकेची उभारणी केली आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील धर्मनिरपेक्ष, समता, स्वातंत्र्य व बंधुभाव, आधारित, उत्कृष्ट “संविधान” देशाला दिले. त्याला पाऊणशे वर्षे झालीत. सन 1975 ते 1977 हा आणीबाणीचा काळ वगळल्यास, ही संविधानाधारीत लोकशाही राज्य पद्धती निरंतर सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील स्त्रियांना चूल आणि मूल ह्यातून बाहेर काढून शिक्षण व मतदानाचा अधिकार दिला. त्यासाठी “हिंदू कोड बिल” संसदेत सादर केले. ते मजूर मंत्री असताना, स्त्री कर्मचार्‍यांना बाळंतपणाची रजा, कामगारांना आठ तासाची डय़ुटी, कामाच्या अधिकच्या तासांचा मोबदला, त्यांच्या हक्कांच्या सुरक्षेसाठी युनियनला मान्यता, भविष्य निर्वाह निधी, आदी कायदे केले. हे ऐकल्यानंतर सॉरी म्हणत चर्चा संपते.
इथे एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे आणि ती म्हणजे बाबांच्या महापरीनिर्वाण दिनी, त्यांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी इतक्या प्रचंड संख्येने चैत्यभूमीवर येतात की, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कितीही सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी त्या कमीच पडतात. हा आजवरचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे महागड्या मुंबई मध्ये त्यांची खाण्या पिण्याची आबाळ होऊ नये म्हणुन मुंबईतील कितीतरी आंबेडकरवादी सामाजिक संस्था, कंपन्या, बॅंका मधील कर्मचारी युनियन ह्यांच्या पुढाकाराने चहा, नाष्टा,आणि जेवणाची सोय दोन तीन दिवस अगोदर पासून करण्यात येते. त्यांचे तात्पुरते निवास, आंघोळ, पिण्यासाठी पाणी आणि मलमूत्र ह्यामुळे घाण होणे सहाजिकच आहे. परंतु 7 डिसेंबर रोजी सकाळी शिवाजी पार्क आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी मुंबईतील अनेक आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने तो संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठी कष्ट उपासताना दिसून येतात. असे कितीतरी कार्यकर्ते माझ्या परिचयाचे आहेत. जे लोक घाण केल्याची कुत्सितपणे टीका करतात त्यांना हे दिसत नाही की काय ?. अशा कलुषित लोकांनी येत्या सात तारखेला सकाळी शिवाजी पार्क परिसरात हजर राहून खात्री करून घ्यावी.
वास्तविक पाहता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने जगातील सर्वोत्कृष्ट समता ,स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्ष लोकशाही आधारित संविधान या देशाला दिले. ते सरकारमध्ये मंत्री असतांना कितीतरी योजना कष्टपूर्वक कार्यान्वित केल्या आहेत. तत्कारण देशातील सर्व थरातून त्यांना अभिवादन अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही, याउलट त्यांची व त्यांच्या अनुयायांची टिंगल करण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अशा लोकांची कीव करावीशी वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशातील वंचित दलित, पीडित, आदिवासी, भूमिहीनांमध्ये त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देऊन त्यांच्यात संघर्षाचा स्फुलिंग पेटवून बंड करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी धर्माधारीत असलेल्या जाती व्यवस्थे वर कडाडून हल्ला केला. त्यामुळे असणार्‍या आकसापोटी त्यांच्याविषयी हेतुपुरस्सर पसरविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीमुळे त्यांच्यावर टीका करणारे खूप लोक आहेत. त्यांनी फक्त दलितांसाठीच काम केल्याचा गैरसमज पसरविण्यात सनातनी लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. मग प्रश्न असा पडतो की, बाबासाहेब खरेच असे संकुचित होते काय? मग त्यांनी राष्ट्रासाठी केलेले योगदान खोटे आहे काय? त्यांनी हिंदु कोड बिल का व कुणासाठी लोकसभेत मांडले ? तसेच ते स्थगित केल्याचे समजताच क्षणाचा ही विलंब न लावता त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा का दिला? त्यात फक्त दलित स्त्रियांच्या हक्कांबाबत विचार केला होता का? याबाबत संक्षिप्त चर्चा करू या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते की,कोणत्याही समाजाचे मूल्यमापन, त्या समाजातील महिलांच्या स्थितीवर अवलंबुन असते. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा विकास अत्यंत आवश्यक आहे. जर विकासाचे शिखर गाठायचे असेल, तर महिलांना सुशिक्षित व सशक्त केले पाहिजे.
भारतातील सर्व थरातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी व त्यांची सार्वत्रिक उन्नती होऊन, त्यांना समानतेची वागणूक मिळावी. यासाठी त्यांनी तीन वर्षे अभ्यास करून ह्या विधेयकाचा मसुदा तयार केला. तो 1948 साली “संविधान सभेत” सादर केला. त्यांचे असे मत होते की, जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात असल्यामुळे त्यांच्या मूलभूतहक्कां पासून त्यांना कायम दूर ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांची सर्वांगीण प्रगती खुंटली. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाले तर, त्यांना अधिकार प्राप्त होऊन त्यांच्या प्रगतीचा रथ चौफेर उधळला जाईल. त्याचा देशाच्या विकासासाठी फायदा होईल. स्त्रियांना शिक्षण, पुरुष प्रधान संस्कृतीत असणारे समान अधिकार, घटस्फोट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, विधवा व मुलींना संपत्तीत समान वाटा, विधवांचा पुनर्विवाह, हे सर्व अधिकार त्यांनी सादर केलेल्या “हिंदू कोड बिलाची ” देण आहे. त्यांनी 24/02/1949 रोजी हे बिल संसदेत मांडले. त्यावर संसदेत अनेकदा चर्चा झाली. हे बिल हिंदू धर्मातील अनेक कुप्रथाना दूर करणारे होते. जे लोक परंपरेच्या नावाखाली कट्टरतावादि सनातनी प्रथा जिवंत ठेऊ इच्छित होते ,त्यांनी ह्या बिलास जोरदार विरोध केला. ह्यात प्रामुख्याने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदु महासभेचे पंडित मदन मोहन मालविय व पट्टाभी सीतारामय्या इतर दिग्गज नेते होते. त्यांच्या समोर पंडित नेहरू हतबल झाले. दुर्दैव म्हणजे काही सनातनी स्त्रिया देखील ह्या बिलाच्या विरोधात गेल्या.
पंडित नेहरूंनी दिल्लीहून बाबासाहेबांना तार पाठवली. त्यात ते म्हणतात की, हिंदू कोड बिलाला देशात सर्वत्र विरोध असून, ते संसदेत मंजूर होणार नाही.त्यातील मागण्यांना प्रचंड विरोध आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होईल. यास्तव सदर विधेयक स्थगित करीत आहोत. तुमची स्त्रियांविषयी तळमळ आम्ही समजतो, तुम्ही देखील आम्हाला समजून घ्या.
तेव्हा बाबासाहेबांनी रागावून त्यांना प्रत्युत्तर दिले की, स्त्रियांना मूलभूत अधिकार मिळावेत म्हणुन मी हे बिल संसदेत मांडले. ते मंजूर न होता, तहकूब करण्यात आले. ह्याचे मला अतिशय दुःख झाले. खरे तर या देशातील समाज सुधारणांच्या हेतूने मी मंत्रीमंडळात सहभागी झालो. त्यात स्त्रियांना मूलभूत अधिकार मिळावेत हा मुद्दा महत्वाचा आहे. जर माझा हेतू सफल होत नसेल, तर माझ्या मंत्री पदाचा काय उपयोग ? त्यांनी ” हिंदू कोड बिलाचा खून झाला. असे म्हणत 25/ 11/1951 रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. “हिंदू कोड बिल ” स्थगित केले म्हणुन,आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे पहिले मंत्री होते अशी इतिहासात नोंद झाली आहे. 1952 च्या सार्वत्रिक निवडणुका नंतर हे बिल टप्प्या टप्प्याने मंजूर करण्यात आले. त्याचे चार तुकडे करण्यात आले. 1) हिंदू विवाह कायदा, 2) हिंदू वारसाहक्क कायदा, 3) हिंदू अंडरएज पालकत्व कायदा, 4) हिंदू दत्तक व पोटगी कायदा. ह्याचा अर्थ एकच होतो की, आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृतीतील सनातनी लोकांना “धर्मशास्त्र” आधारित समाज व्यवस्थेला धक्का बसू द्यायचा नव्हता. भारतातील स्त्रीला चूल आणि मूल ह्यातून मुक्त करून विकासाच्या दिशेने भरारी घेण्यास, त्यांचे सनातनी विचार आडकाठी करीत होते. त्यावर कळस म्हणजे एक शूद्र दलित ह्या सुधारणा करू पाहतो. ही गोष्ट त्यांच्या पचनी पडली नाही. हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
हल्लीच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनशैलीत मनोरंजनाचे विविध प्रकार दूरदर्शन तसेच मोबाइल वर उपलब्ध असल्यामुळे वाचन संस्कृती जवळजवळ लोप पावली आहे.जगाने बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेतल्याचे दिसून येते म्हणुन तर जगातील जवळजवळ 100 हून अधिक देशांमध्ये त्यांची जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. परंतु दुर्दैव असे की, जातीयतेच्या द्वेषातून बाबासाहेबांचे चुकीचे चित्र भारतीय जनमानसाच्या मनावर बिंबवण्यास सनातनी यशस्वी झाल्याचे दिसून येते. म्हणुन बाबासाहेबांची वस्तुनिष्ठ माहिती सगळ्यांना समजणे अतिशय गरजेचे असल्यामुळे इतिहासाची पाने पुन्हा पुन्हा चाळून, छोट्या छोट्या लेख, कविता, दृश्यमाध्यम ह्यांचा वापर करून, सर्वांना त्यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती करून देणे, ही काळाची गरज आहे. जेणेकरून बाबासाहेबांच्या बाबती असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल .जर आपण असे करू शकलो तर, ती बाबांना खरी आदरांजली ठरेल.

जयभीम.
आपला,
अरुण निकम.
9323249487.
मुंबई…
दिनांक…06/12/2024.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!