वेळ सार्वत्रिक निवडणुकांच्या” अंत्यसंस्काराची “
काल विधानसभेच्या निवडणूकीच मतदान झालं .. नेहमीप्रमाणे गावी जाऊन मतदान करायचे म्हणून पुण्याहून निघालो …खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडं 5किमी वाहनांच्या रांगा …सगळी गावखेड्यातील रोजगारानिमित्तानं पुण्या – मुंबईत असणारी माणसं ट्रॅव्हल गाड्यातून गावाकडे निघालेली .. बायाबापडी लेकराबाळांसहित ..कशाला मतदानाला ..? तर ज्यांनी थोडीबहुत आर्थिक प्रगती केलीय त्यांच्या 4चाकी गाड्या .. त्यातील गाण्यांचे कर्कश आवाज आणि सगळीकडे मज्जाच मज्जा चालू होती ..
अक्षरश मी माझ्या आयुष्यात पाहिल्या नाहीत ..तेवढ्या 2 चाकी गाड्यांचं तुफान हायवे वर काल होतं ..
लोकशाहीचा उत्सव पाहत ,अनुभवत होतो ..
सहज एका दुचाकीस्वाराला माझ्या गाडीची काच खाली करून विचारलं ..
त्यानं सांगितलं ..
आज नवराबायकोचे 5 हजार मतदानाचे मिळाले .. तर ट्रॅव्हल ने येणारांचा दर माणसी 2हजार ते 5हजार भाव होता .. नाश्ता , दुपार , रात्रीच जेवण मुंबई वरून न्यायची – परत आणायची जबाबदारी उमेदवाराची .असा हा व्यवहार होता ..
जाताना विचारांच काहूर माजलं होत .. मनोमन विकासालाच शिव्या देत होतो .10किमी अंतरासाठी 2.30 तास गेला होता .. गेली 20वर्ष पुणे -सातारा महामार्गाच काम चालू आहे .. आमच्या हयातीत हा महामार्ग एकदातरी खड्ड्याविना पाहायच स्वप्न आहे .. टोळधाड चालूच आहे .. विकास म्हणजे infrastructure ,रोड, मेट्रो बुलेट ट्रेन अश्या मोठ्या गोष्टी नजरेत कशा भरतात ..याच एक बर असतंय त्याखाली कितीही भ्रष्टाचार ,अंधार खपून जातो .. याला न्याय देणारी न्यायालय ..या देशातील न्यायव्यवस्था तिचा कारभार मी कशाला सांगू .तुम्हालाही अनुभव असलेच …कित्तेक न्यायाधीश यांनी त्यांच्या बायकांना परदेशी नागरिकत्व घेतलं ..वेळ पडल्यास बाहेर जायला मोकळे.. इतकी माया मिळवली आहे ..
“श्रमाविना वित्त” सध्या काही वर्गाची मक्तेदारी .. हा खरा प्रश्न आहे ..नाहीतर आपण राबतोच 12 तास -14तास ..
गाडी चालवत ..विचार करीत करीत संध्याकाळी माझ्या गावात पोहचलो तर एरवी उजाड आणि उदास वाटणार गाव आज गजबजलेले होत …
प्रत्येकाची देहबोली काहीतरी वेगळंच सांगत होती .. आज आपली माणसं कोण ? परकी कोण ..काही काही समजत न्हवत ?
मतदान करून बाहेर पडलो .बरेच गावातील पुढारी मंडळी भेटली चर्चा सुरु ..एकजण म्हणाला मतदान किती झालं ..दुसरा म्हणाला , 2300मग .. आयला, रात्री तर आमचे जास्त लोकांचे पैसे गेलेत ..अरे ..ती लोक मतदानाला येणार कि नाही .. त्यांनी फसवलं तर नाही ..
एकजण मुरलेला राजकारणी सांगत होता …अहो ..एका ज़िल्हा परिषद गणात अंदाजे 4.5 ते 5 करोड वाटायला लागतात ..तुम्हीच हिशोब लावा .. एका मतदारसंघात जि .प .गण किती आणि पैसे किती लागतात ….आज एका उमेदवाराला अंदाजे 50 कोटी खर्च येतोय …अंदाजे 2 ते 3 स्पर्धेतील उमेदवार ..
जिंकण्यासाठी अंदाजे किमान एक लाख मत हवीत ..
आकड्यांचा खेळ त्याच गणित ऐकून घशाला कोरड पडली …गावाची परस्थिती बघितली तर सर्व तिशीच्या आतील व्यसनाधीन मुलं .. पण अंगावर दर्शनी भागावर टॅटो काढलेले , केस आणि दाढी वाढवलेले ,नजरेत बेफिकिरी असणारी गावाकडील तरणीबांड पोर .. त्यांना बघून त्यांच्या भविष्याचा विचार सुद्धा करवत नाही ..सगळं अंधकारमय असणार .. हे सांगायला ज्योतिषी कशाला ? लग्न न झालेली 40 च्या उंबरठ्यावर असणारी पिढी ..आणि म्हातारी माणसं संपली कि काय ? असं वाटावं औषधाला फक्त शिल्लक राहिलेली जेष्ठांची पिढी … गावात गेल्या 8दिवसात किमान 12लाख रुपये खाण्यापिण्यावरती खर्च झालाय एकाने सांगितलं …. चर्चेत एकदम एकजण म्हणाला ..कोल्हापुरात एका उमेदवाराने तर 25000 किलो मटण मतदारांना वाटलंय ..मनाला वाटलं काय करून ठेवलंय ..आपण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं आणि आपल्या आपल्या गावाचं ?
कितीतरी जण चहापाण्याचा आग्रह करीत असताना सुद्धा ..कधी एकदा गाडीत बसतोय असं मला झालं .. इतक्या गोष्टी घडतात ऐकून वाटलं …कशाला आपण तरी आलो मतदानाला ..? वेळ आणि पैसा घालवून ..
गाडी सुरु केली ..
विचार सुरु झाला ,तोही गाडीसारखा थांबायला तयार न्हवता .. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ अंदाजे 7 ते 10 प्रमुख पक्ष … गंभीरपणे निवडणूक लढणारे अधिकृत आणि अपक्ष किमान स्पर्धक 2ते 3 पकडले तर अनुक्रमे 576 आणि 864 असे एकूण 2024 ला विधानसभेला उमेदवार …
एका उमेदवाराचा खर्च 50कोटी पकडला तर महाराष्ट्रातील विधानसभेतील काळ्या पैश्याचा व्यवहार होतोय 28800 कोटींचा ….
कमाल 70 कोटी पकडला तर होतोय 40320 कोटी ..
आता पराभूत उमेदवार ..खर्च तुम्हीच काढा आणि मला सांगा …
आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले होते ..काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी नोटबंदी मग इतक्या कमी वेळात एवढी काळी माया जमा झाली ? कशी झाली ?आपण कधी विचार करणार ?
आपण मध्यमवर्गीय उगीचच निवडणुका आल्यावर निवडणूक मनावर घेतो …
राजकारणी ती व्यवहाराच्या, व्यवसायाच्या चष्म्यातून बघत असतील .. आणि त्यांनाही समाजाचा असा अनुभव आल्यावर ते त्यांच्या ठिकाणी योग्यच ..
त्यांना ..त्यांचे अनेक प्रश्न सोडवायचे असतील ..
त्याच उत्तर “निवडणूक ” आणि निवडून येणं हे असेल ..
आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला महिन्याकाठी “धन “आणि ” धान्य ” याची सोय सरकारनं केलीय ..
किमान 4जणांच्या कुटुंबाला महिन्याला 10000 नगद मिळणार ..
त्यांनी काही करायचं नाही ..फक्त सुस्त राहायचं .. मौजमजा करायची .. स्मार्ट फोन , अलीकडे आयटी इंजिनिअर पेक्षा त्यांच्या हातात आयफोन जास्त दिसतात ..दीड GB डेटा reel पाहण्यात व्यस्त राहायचं ..सरकार आता त्यांना ..त्यांच्या ताटात वाढणार ..त्यांनी फक्त जयघोष करायचा ..सतरंज्या उचलायच्या ..
मध्यमवर्ग कोक , कॉकटेल , बर्गर , पिझ्झा , मुलांच्या शिकवण्या , वीकएंड ट्रिप , मुलांना परदेशात पाठवणं त्याची स्वप्न बघणं ,आंतरराष्ट्रीय राजकारण त्यातील घडामोडी , sharemarket यात व्यस्त … त्याला राजकारण सामाजिक परस्थिती यांचेशी काही देणं घेणं नाही ..त्याबाबतीत तो अजगरासारखा सुस्त आहे .त्यासाठी त्याच्याकडं स्वतः ,आईवडील ,मुलबाळ यांच्यासाठी वेळच नाही ..कशासाठी जगतोय हेच त्याला कळेना ..
एकंदर परिस्थिती अशी आहे
तो मस्त जगतोय कि व्यस्त जगतोय याचा ताळमेळ नाही त्याचा त्याला नाही ..
त्याला स्वतःला शारीरिक आणि मानसिक आजाराच्या गोळ्या चालू होत नाहीत तोपर्यंत त्याला वेळच मिळत नाही ..
तो नेहमी राजकारणाच्या धुळवडीच्या रंगात रंगण्याऐवजी दिवाळी पहाटेत IPL मध्ये रमणे पसंत करतो .. मग मला वाटलं माझा तरी काय प्रॉब्लेम आहे ?..
प्रॉब्लेम हा आहे मग या भ्रष्ट निवडणुकांचं करायचं काय ? लोकशाहीच होणार काय ?
ग्रामीण भागातील तरुणांचं होणार काय ?
त्यांच्या भविष्याचं, रोजगाराच काय ?
गरिबाला पैसा देऊन मत विकत घेतल जातंय
त्याला गुलाम बनवलं जातंय त्याला स्वतंत्र करायला हवंय .. स्वाभिमानानं जगायला शिकवायला हवं ..
मध्यमवर्गाला कोणी विचारात नाही त्याला गृहीत धरलंय ..
उच्च वर्गीय याना काही या प्रक्रियेशी देणं घेणं नाही ..
आज विधानसभेला एका एका मतदार संघात 100कोटीहून जास्त जर काळ्या पैश्याची उलाढाल होत असेल तर त्या त्या मतदारसंघातील नागरिकांनी उमेदवाराकडे छोटया छोट्या उद्योगधंद्याच्या उभारणीची मागणी करायला हवी ..त्यातून रोजगाराची निर्मिती झाली तर शाश्वत विकास होऊ शकेल गावं समृद्ध होतील .. पण ग्रामीण भागातील नागरिकांनांच हे नकोय .. नागरीक ,राज्यकर्ते ,कार्यकर्ते यांनी मिळून लोकशाहीच्या या उत्सवाला तिरडीवर नेऊन ठेवलंय
एखादा उमेदवार 50 ते 70 कोटी खर्च करतो आणि एखादा 40 लाख
कोण निवडणूक प्रचारात आघाडी घेणार ?
अर्थात पैसेवाला . पक्षाच्या सोशल मीडिया वरील जाहिरातींना काही बंधन हवीत..
नाहीतर एखादा सुशिक्षीत उमेदवार मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण असणारा
तो सोडवण्याची धमक असणारा
यावर हा अन्याय नाही का ?निवडणूक आयोग म्हणतय 40 लाख खर्चाची मर्यादा आहे . आतापर्यंत पोलिसांना 708 कोटी सापडलेत.. 2024ला माणसी 5000 रु पर्यंत दर पोहचला आहे ..
कसली लोकशाही आणि कसल्या निवडणूका ? मला वाटत निवडणुकांचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलीय .. बघता बघता ..गाडी चालवत बोपदेव घाटात पोहचलो ..विकासाचं नवं मॉडेल पुण्यनगरी लाईटच्या लखलखाटात न्हाऊन निघालय जसं की आकाश धरतीवर आलंय .. असंच वाटलं ..आकाशातील चांदण्या मनमोहक असतात इथल्या झगमगाटात गर्दीत रोजच श्वास गुदमरतोय माझा आनंद हरवलाय त्याच काय ?
मला वाटतंय परिस्थिती सतत सारखी राहत नाही ..बदलत असते ..एक दिवस विस्थापितांचा ,शोषितांचा उठाव झाल्याशिवाय राहणार नाही ..एवढं नक्की …
लेखक
डॉ रवींद्रकुमार काटकर
पुणे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत