निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

निवडणुकीचे विश्लेषण का , कशासाठी ?

निवडणूकीत जय, पराजय होतच राहतो. पण त्यातून हुरळून न जाता किंवा खचून न जाता अचूक विश्लेषण करत आपल्याला मिळालेला विजय किंवा पराजय कशामुळे मिळाला याची कारणे शोधणे हे राजकीय पक्षांचे काम असते. मतदार कसा मत देतो यासाठी विश्लेषण कामाला येते.

मतदाराच्या दृष्टीकोणातून देखील विश्लेषण महत्वाचे असते. कारण त्यामुळे आपण मत दिले ते योग्य ठिकाणी दिले का याचा उलगडा होऊ शकतो. आपली चूक झाली का ? आपण ट्रेण्डसोबत वाहवत गेलो का ? चूक झाली असेल तर जे निकाल लागलेत त्यामुळे आता आपली लाईफ झंड होणार किंवा कसे याचे मार्गदर्शन विश्लेषण करतं.

आता सध्या माझ्याकडे मायक्रो डेटा नाही. सध्या तो उपलब्ध नाही हे एक आणि प्रत्येक वेळी तो डेटा जमवून त्याचे संख्यात्मक आणि गुणात्मक विश्लेषण करण्य़ासाठी त्याचं स्टॅटिटिक्स करण्याइतका उत्साह आणि वेळ नाही. त्यामुळे जेव्हां हा डेटा उपलब्ध होईल तेव्हां त्याचे विश्लेषण करूयात.

राजकीय पक्ष म्हणून विश्लेषण करताना टक्केवारी महत्वाची आहे. वंचित ला लोकसभेला जितकी मतं होती साधारण तितकीच आताही आहेत. त्यात वृद्धी झालेली नाही तसेच घसरण सुद्धा झालेली नाही. ही सुद्धा एक कामगिरीच आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही जण विधानसभेला तुमची यापेक्षा वाईट अवस्था करू अशा वल्गना करत होते. अनेक लॉक्ड प्रोफाईल्सने ही लाईन चालवली आणि नंतर अचानक ते बंद झाले. कदाचित उडवलेही असेल. तसेच काही पत्रकार, तथाकथित विचारवंत हे वंचित या निवडणुकीनंतर संपणार आहे अशी भविष्यवाणी करत होते.

त्यानुसार वंचितने गाशा गुंडाळलेला नाही. टक्केवारी कायम आहे. २.५% मत ही बॉटमलाईन आहे. यापेक्षा खाली वंचित आघाडी जात नाही. मात्र ०.३४% ते ०.४% मतं घेतलेल्या छोट्या पक्षांना एक का होईना जागा मिळालेली आहे आणि वंचितला एकही जागा नाही हा मेसेज मतदारापर्यंत जास्त ठळक जातो. त्यांच्या दृष्टीने मतदान घेण्यापेक्षा जागा येणे महत्वाचे असते. मीम सारख्या पक्षांचे पॉकेट्स आहेत. त्या पॉकेट्समधेच ते निवडणूक लढवतात. यामुळे त्यांचा खर्चही कमी राहतो आणि त्यांना वेळही देता येतो. एका ठिकाणीच मतदार एकवटलेला असल्याने निवडून येणे सहज शक्य होते.

वंचितचा मतदार हा राज्यभर विखुरलेला आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी इतर समाजघटकांचे मतदान गरजेचे असते.
असे असले तरी काही विधानसभा मतदारसंघ हे बौद्ध मतदारबहुल आहेत. उदाहर्णार्थ पूर्वीचा बोपोडी. हा तोडून वडगाव शेरी आणि शिवाजीनगर बनला असला तरीही बौद्ध मतदान वडगाव शेरीत मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कॅण्टोन्मेण्ट.

या ठिकाणी पूर्वीच्या रिपब्लिकन पक्षाचे जे नगरसेवक होते त्यांनी मविआचे काम केले. त्यांच्या मुळे मतदान मविआला गेले हे समजते.

असाच डेटा मतदारसंघ निहाय,जिल्हानिहाय मिळाला तर बौद्धांनी कुठे कुणाला मतदान केले याचा तपास करता येईल. या तपासाविना काढलेले कोणतेही निष्कर्ष हे फसव्या रस्त्यावरून घेऊन जातील. समजा पुणे शहरातल्या या दोन मतदारसंघांतला हा ट्रेण्ड आपण राज्यभर लागू केला तर बौद्धांचे मतदान मविआ ला झाले असा निष्कर्ष काढता येईल.

तर १०% बौद्धांपैकी २.५% मतं वंचितला मिळाली. उर्वरीत मतं जर मविआला मिळालेली असतील तर कॉंग्रेस , राष्ट्रवादी (शप), शिवसेना या पक्षांना १२% ते १६% इतके मतदान झाले असे दिसते. यातील ७.५% बौद्ध आणि २% बौद्धेतर दलितांचे मतदान धरले तर जवळपास दहा टक्के दलित मतदान आणि बारा टक्के मुस्लीम मतदान असे २२% मतदान फक्त या दोन समूहांचेच झाले असेल तर मग मविआ कडे स्वत:ची मतं किती हा प्रश्न उपस्थित होतो.

मविआची एकून टक्केवारी काढलेली नाही. पण ती ४० % आहे. म्हणजे मविआकडे १८% मतदान हे इतर जातींचे आहे. यातले मराठा जास्तीत जास्त असेल असे समजले तर ओबीसी आणि अन्य जातींनी मविआला धडा शिकवला असाच याचा अर्थ निघेल.

अर्थात बौद्ध मतदान मविआकडेच राहिले हा पुण्याच्या दोन मतदारसंघातला ट्रेण्ड गृहीत धरून केलेले हे विश्लेषण आहे. जिल्हानिहाय तपास केला तर अचूक डेटा उपलब्ध होईल. बारामती मतदारसंघात बौद्धांचे मतदान अजितदादांना झाले. कारण प्रचारात सुद्धा रोजचे ५०० रूपये मिळालेत. घरटी दोन ते चार जण रोज जात होते. शिवाय जेवण. दहा दिवसात कुणी वीस हजार कुणी तीस हजार कमवले. काही जण जास्त काळ प्रचारात होते. या पैशामुळे कृतज्ञता म्हणून लोकांनी अजितदादांना मत दिले.

अशा पद्धतीने अजितदादा, शिंदे गटाकडे किती मतदान झाले हा डेटा जमवावा लागेल.

सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा दहशतीने ओबीसी एकवटला आणि त्याने वंचितला मतदान न करता भाजपला केले एव्हढे आपण म्हणू शकतो. बाळासाहेबांनी अचूक मुद्दे उचलले. ओबीसींच्यात जागृती केली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा क्लिक झाला. पण ओबीसींनी वंचितवर विश्वास टाकला नाही. मविआ सत्तेत येऊ नये या दहशतीने ओबीसींना निवडून येणारा पर्याय हा महायुती वाटला असावा.

महायुतीनेही न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात काहीही हालचाल केलेली नाही. पण ज्याप्रमाणे दलित आणि मुस्लिमांना भाजपचे भय दाखवून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून मविआला मतदान करा असे ब्रेनवॉश केले जाते. त्याच प्रमाणे ओबीसींना मराठा सरंजामशाहीच्या मविआपेक्षा भाजप मऊ वाटला असेल.

वंचितला मत दिले तर ते निवडून येणार नाहीत, मत वाया जाईल यामुळे ओबीसींनी मतदान केले नसावे हा याचा अर्थ.
सध्या तरी इतकेच विश्लेषण करता येईल.

यावरून बोध घेण्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग होईलच. मात्र सामाजिक विश्लेषण हा भाग उरतो. तो आपण खुल्या प्लॅटफॉर्म वर चर्चेला घेऊ शकतो.
सामाजिक विश्लेषण करताना महायुतीला जरी ओबीसींनी मत दिले तरीही बारामतीप्रमाणे त्यांनी मराठेच निवडून दिले आहेत.

बीड जिल्ह्यामधे वंजारी समाजाने सत्ता आणली होती. इथे मुंडे प्रभावी होते, पक्ष छोटा होता. गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीने , विशेषत: शरद पवारांनी मुंडे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याला भाजपची साथ होती. हा पाहुण्याच्या काठीने विंचू मारण्याचा प्रकार होय. मुंडे वर्चस्व संपवण्यात भाजपने बाहेरून मदत घेतली.

सरंजामी मराठ्यांनाही राज्याच्या राजकारणात इतर जाती मांडीला मांडी लावून बसलेल्या नकोत तसेच ब्राह्मणांनाही नकोत. ब्राह्मण या बाबतीत जास्त धूर्त आहे. कारण त्याला मराठेही नको असले तरी राज्याराज्यात आपण अल्पसंख्यांक आहोत हे तो जाणून आहे. प्रत्येक राज्याच्या राजकारणात ब्राह्मण अल्पसंख्य असला तरी एकूण देशाचा विचार केला तर ब्राह्मण हीच जात सर्वात मोठी आहे. आसेतुहिमाचल ब्राह्मण हा त्याच नावाने उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. ३.५% ब्राह्मण ही राष्ट्रीय राजकारणातली सर्वात मोठी जात आहे.

त्यामुळे ब्राह्मणांनी ज्या प्रदेशात दांडगी जात असेल तिच्यासोबत समझौता केलेला आहे. हा समझौता करतानाच ज्या राज्यात शक्य आहे त्या राज्यामधे त्या प्रबळ जातीला दुसरी प्रबळ जात संघटीत करून असुरक्षित करण्याचा प्रयत्न काळाच्या ओघात ब्राह्मण करत आलेला आहे.

गुजरातची प्रयोगशाळा असे ज्याला म्हटले जाते तो ब्राह्मणांचा प्रयोग आहे.
ब्राह्मणांनी या राज्यात भाजपच्या काठीने पाटीदार जातीचे वर्चस्व मोडून काढलेले आहे. भाजपला कॉंग्रेसने फ्री हॅण्ड दिला होता. ज्यांनी राज्यात भाजप रूजवली त्या शंकरसिंग वाघेला यांनाच कॉंग्रेसने आपले प्रदेशाध्यक्ष नेमले. वाघेला हे मोदींचे गुरू. हार्डकोअर संघी. या माणसाने कॉंग्रेस संपवली. खरे तर कॉंग्रेसलाच संपून घ्यायचे होते कारण राज्यात पटेल वर्चस्वापुढे त्यांचे काहीही चालत नव्हते. चिमणभाई पटेल असताना पटेलांनी शहा, मेहता, गांधी अशा बनियांची मक्तेदारी मोडून काढली आणि उद्योगधंदे ताब्यात घेतले. पाटीदार ही कुणबी जमात आहे. तेलबियांचा व्यापार ते बनियाशी करायचे. तेलबिया विकत घेणारा व्यापारी तो मोदघांची. मोद म्हणजे व्यापारी म्हणजे मोदी. आणि घांची म्हणजे तेलबियांचा किंवा तेलाचा व्यापार करणारा.

नरेंद्र मोदी मोदघांची आहेत. पटेलांनी या मोदघांचीला बाजूला काढले आणि शासनाच्या माध्यमातून सहकारी संस्था बनवून धारा हा ब्रॅण्ड विकसित केला. धारा तेल अल्पावधीत लोकप्रिय झाले. यामुळे तेलबिया लावणारे पटेल हे व्यापारीही बनले. त्यांचे वर्चस्व वाढले. त्या माध्यमातून गुजरातमधे त्यांची मोनोपॉली निर्माण झाली.

ही मोनोपॉली मोडून काढण्यासाठी इतरांमधे पटेलांपासून असुरक्षितता वाटण्यासाठी संघाने स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून काम सुरू केले. स्वाध्यायने आदिवासींना एकत्र केले. फूटसोल्जर्स तयार केले. त्यांच्या माध्यमातून संघटनेची आंदोलने सुरू केली. आता इतर ओबीसींना पंखाखाली आणण्यासाठी त्यांना एक ओळख देणे गरजेचे होते. ब्राह्मणांना हिंदू आयडेन्टिटी देणे सोपे होते. ओबीसींना हिंदू बनवण्यासाठी शत्रू उभा करणे गरजेचे होते. तो त्यांनी मुस्लीम दाखवला. गुजरात या प्रयोशाळेत जे काम चालू होते त्याला देशाच्या उर्वरीत भागात सेक्युलर पुरोगामी ब्राह्मण सुद्धा खतपाणी घालत होता. मुस्लिम दशहतवाद हे भूत अमेरिकेने उभे केले होते. तेच भूत ब्राह्मणी मीडीयाने उचलले. त्या काळात बामसेफने खासगी वाहीन्यांना विरोध केला होता. बामसेफच्या विरोधानंतर डाव्यांनी इतिहासात आम्ही सुद्धा विरोध केला होता म्हणून दहा ते पन्नास लोक जमवून चौकात आंदोलने केली. त्यात कसलाच जीव नव्हता. फक्त रेकॉर्डवर असावे म्हणून केलेले आंदोलन होते. अर्थात बातमी त्यांची झाली, बामसेफची नाही.

खासगी वाहीन्यांनी हिंदू मुसलमान लाईन चालवली. ब्राह्मणांनी आपापल्या जागा घेतल्या. सेक्युलर ब्राह्मणांनी प्रो मुस्लीम आणी सनातनी ब्राह्मणांनी ऍण्टी मुस्लीम. दोन्हींनी हिंदू विरूद्ध मुसलमान हा झगडा तयार केला, उभा केला, त्याला हवा घातली आणि हा फुगा फुगवला.

याने काय झालं ?
तर पटेलांचं नाव न घेता पटेल सोडून अन्य समाज भाजपच्या खेम्यात जमा झाला तो हिंदू बनून. मुसलमानांकडे जरी बंदूकीचे टोक असले तरी गोळीचा निशाणा पटेलवर्चस्व होते. गुजरातेत झालेल्या दंगलीनंतर (बाबरी नंतरची तसेच त्यानंतर अहमदाबाद दंगल आणि शेवटची २००२ ची मोदींची दंगल ) पटेल सोडून सर्व जाती हिंदू बनून भाजपच्या खेम्यात गेल्या. काही पटेलही त्यात होते. याचा परिणाम म्हणून पटेलांचे वचस्व संपले. पटेलांच्या जिवावर चालणार्या कॉंग्रेसची सत्ता संपली. कॉंग्रेसने ते पसंत केले. कारण कॉंग्रेस बनियांची आणि ब्राह्मणांची आहे. पटेलांनी त्यांचेच वर्चस्व मोडीत काढले. त्यामुळे अशा सत्तेत कॉंग्रेसला रस नव्हता.

हेच ते गुजरात मॉडेल. हे मॉडेल मग कॉंग्रेस आणि भाजपने देशात लागू केले.

महाराष्ट्रात २०१४ नंतर मराठा वर्चस्व मोडून काढण्यासाठी कॉंग्रेसने गुजरात प्रमाणेच भाजपतून आलेला माणूस प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमला. याने शिवसेना संपवायला भाजपला मदत केली. त्याचे कारनामे तपास केल्यावर उघडकीला येतीलच. पण शिंदे पितापुत्रीने भाजपला मदत केली ते नानाच्या संगनमतानेच.

मुंडेंचं नेतृत्व बीड मधून भाजपने संपवले ते शरद पवारांच्या मदतीने.
बौद्धांचा पक्ष संपवला तो यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवारांनी.

धनगर समाजाने भाजपला मतदान केले. त्याला नादाला लावण्य़ाचा प्रयत्न शरद पवारांनी केला. पण या वेळ अजितदादाच वेगळेझाल्याने धनगरांचे मतदान भाजपकडे दिसतेय. मात्र यातून धनगरसमाज हा भाजपवर पूर्णपणे अवलंबून होत चालला आहे. मांडलिक झाला आहे.

गुजरात मॉडेल नंतर मुसलमान हवालदिल समाज झाला आहे. हा स्वत:चे नेतृत्व उभे करत नाही इतका भ्हयग्रस्त आहे. तो फक्त जिवंत राहण्यासाठी कॉंग्रेसला मत देतो.

अशाच पद्धतीने प्रत्येक जात हतबल करून त्यांना शरण आणणे हे ब्राह्मणवादाचे ध्येय आहे.
मागच्या काळात सत्तर वर्षांपूर्वी राज्याराज्यात जरी ब्राह्मणांनी प्रबळ जातींना फ्री हॅण्ड दिला होता तरी सत्तर वर्षे ते गप्प बसलेले नाहीत. महाराष्ट्रात मराठा वर्चस्व संपत चाललेले आहे. मराठ्यांनी जो उतमात केला त्यामुळे त्यांना अजिबात कुणाचेही समर्थन अथवा सहानुभूती नाही. अजूनही ते या माजात आहेत कि भाजपमधेही आमचे लोक आहेत. पण फर्क आहे. भाजपत गेलेले मराठे मांडलिक आहेत. जसे मविआतले बौद्ध असतात. हे होयबा लोक आहेत. मराठ्यांचे निर्णयप्रक्रियेतले महत्व संपलेले आहे. फडणवीस हे निर्णय घेणारे झाले आहेत. अजित पवार आणि शिंदेंना फायदा करून देऊन त्यांना साक्षीला ठेवून फडणवीस निर्णय घेतील.

जसे बौद्धांचे एखादे नाव पुढे करून शरद पवार निर्णय घेत किंवा छगन भुजबळांचा चेहरा पुढे करून मराठाच निर्णय घेत तसे आता भाजप करत आहे. कॉंग्रेसकडे संयम आहे. एकदा का देशातल्या राजकारणात प्रबळ झालेल्या जाती गुलाम झाल्या कि मग कॉंग्रेस पुन्हा सबळ होईल. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस हे दोनच पक्ष उरतील.

काही ठिकाणी आप, काही ठिकाणी डावे हे प्रयोग झालेले आहेत. ते अजून काही काळ चालू राहतील.
शेवटी या एकाच ब्राह्मणवादाच्या निरनिराळ्या नाटककंपन्या आहेत. एक सेक्युलर असण्याचे नाटक करते. एक पुरोगामी, एक साम्यवादी, एक समाजवादी तर एक हिंदुत्ववादी. हे आतून एकच आहेत. मात्र यांना जनतेसमोर बेमालूम नाटक वठवण्यासाठी नया नया मुसलमान पांच बार नमाज पढता है तसे आम्ही आमच्या भूमिकेत फार कडवे आहोत हे दाखवावे लागते. मात्र ब्राह्मण हा त्याच्या उक्तीने नाही तर कृतीने ओळखला जातो.

निखिल वागळे मी आंबेडकरवादी आहे हे कानठळ्या बसेल एव्हढ्या जोरात बोलतो. पण जेव्हां बौद्धांचा पक्ष उबा राहतो त्याला सपोर्ट करण्य़ाऐवजी तो उद्ध्वस्त होईल अशी भूमिका तो घेतो. हा ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मण सगळे एकच आहेत.

जे ब्राह्मणवादाचे शिकार आहेत ( ब्राह्मणवादी विचाराने इतरांचे दमण करतात) ते सरंजामी मराठे, पटेल, यादव, जाट सुद्धा ब्राह्मणवादीच आहेत. हे जेव्हढा माज करतील तेव्हढेच ब्राह्मणवादी उघड त्यांच्याशी युती करून पाठीमागे षडयंत्र करून त्यांच्या विरोधात इतरांना एकत्र करत त्यांचा काटा काढत जाणार आहे.

शेवटी एक है तो सेफ है हा नारा बहुजनांनी नीट ध्यानात घेतला पाहीजे.
माज केला म्हणून मराठ्यांचा अंत सुरू झाला आहे. ब्राह्मणांनी इतरांना सोबत घेत त्यांचा काटा काढला. हेच या सरंजाम्यांनी केले असते प्रत्येक जातीला न्याय्य वाटा दिला असता तर आज सत्ता त्यांच्याकडे असती.

राहुल गांधीने फक्त चार सभा घेऊन भाजपला मराठेशाही संपवण्यासाठी फ्री हॅण्ड दिला. त्याच बरोबर शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा वापर केला. भाजपने त्यासाठी शिंदेंचा वापर केला. बाळासाहेब ठाकरेंना शह देण्यासाठी आनंद दिघेंच्या नावाचा वापर केला. त्यासाठी धर्मवीर १, २ असे सिनेमे बनवले.

आता बाबासाहेब आंबेडकरांना शह देण्यासाठी अण्णाभाऊ साठेंना मोठे केले जात आहे. आरक्षणात वर्गीकरण आणून दलित जातींमधे यादवी माजवण्याचा हा खेळ आहे. मराठे, जाट , पटेल यांना ओबीसीत घुसवून ओबीसी आरक्षणाचे जे केले ते दलितांच्या आरक्षणाचे होणार,

धनगरांना एसटी आरक्षणात घुसवून एसटी आरक्षणाचे मातेरे होणार.

फोडा आणि झोडा या नीतीने प्रत्येक जात एकमेकांच्या विरोधात उभी केली जाईल आणि त्यासाठी दोन पक्ष ब्राह्मणांचे उभे केले जातील. हे पक्ष हे भांडण निरंतर चालत राहतील याची काळजी घेतील. त्यांची नावे भाजप आणि कॉंग्रेसच राहतील असे नाही. बदलतही जातील.

मात्र राजकारण असेच राहील.
सामाजिक विश्लेषण सध्या तरी असे आहे. ढोबळ आकडेवारी तेच सांगते आहे.
अचूक आकडेवारी फाईन ट्युनिंग करेल.

निव्वळ राजकीय पक्षाच्या दृष्टीकोणातून या प्रश्नाकडे पहाल तर तुम्हाला तोडगा कधीच सापडणार नाही.

यासाठी नेहमीच बसपा आणि वंचित अशी टर्म वापरली. कारण अजून विभाजित नको व्हायला.

Mandar माने

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!