महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे भाग ६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहीले आहे की, भिक्खू रठ्ठ्पाल यांना सम्यक सम्बुध्दांनी चार तत्त्वे सांगितले. ते असे-
१ जग अनित्य असून सतत बदलत आहे.
२. जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.
३. आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.
४. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दु:ख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक ऊणीवा असून ते सारखे धडपडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात म्हणतात की, अनित्यतेच्या सिध्दांताला तीन पैलू आहेत-
अनेक घटकांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत.
व्यतिगत रुपाने प्राणी अनित्य आहेत. आणि
प्रतित्यसमुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्त्व अनित्य आहेत.
सर्व वस्तू ‘हेतू आणि प्रत्यय’ यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसते. जो प्राणी भूतकाळात होता. तो तसाच वर्तमानकाळात दिसणार नाही. शरीरातील प्रत्येक अणु-रेणू बदलत असतात. शरीर, मन बदललेले असते. विचार आणि विचार करणारी यंत्रणा बदललेली असते. पूर्वी लहान होतो. नंतर तरुण, वयस्क व शेवटी म्हातारे झालोत. म्हणजेच मनुष्य आणि इतर सर्वच प्राणी, वनस्पती हे परिवर्तनशील आहेत. जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते. जग जर परिवर्तनशील नसते तर सर्व प्राणीमात्राचा विकास झाला नसता. म्हणून भगवान बुध्दांनी सांगितले की, जग हे अनित्य आहे. ते सतत बदलत असते.
अनात्मतता:
अनात्मता हे दुसरे लक्षण आहे. अनत्तलक्खण सुत्तात भगवान बुध्दांनी अनात्मवादाची लक्षणे सांगितली आहेत. अनात्मतेला पाली भाषेत अनत्त असे म्हणतात.
जगात जर आत्मा असेलच तर तो स्वतंत्र असला पाहिजे. पण तसे आढळत नाही. शरीर म्हणजे रुप हे काही आत्मा असू शकत नाही. जर शरीर हे आत्मा असते तर त्या शरीराला क्लेश झाले नसते. त्यात परिवर्तन झाले नसते. काळमानानूसार बदललेले नसते. पंचस्कंधापैकी इतर चार स्कंध म्हणजे वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्कार हे सुध्दा आत्मा असू शकत नाही. कारण ते नाक, कान, डोळे, जिव्हा आणि त्वचा या इंन्द्रियावर आणि त्याचे विषयावर म्हणजे गंध, आवाज, दृश्य आकृती किंवा रंग, स्वाद आणि स्पर्श या विषयावर अवलंबून आहे. जसे इंद्रिय, इंद्रियविषय अनित्य आहेत. तसेच वेदनास्कंध, विज्ञानस्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध हे सुध्दा अनित्य आहेत. म्हणून ह्या परिवर्तनशीलतेमुळे आत्मा आहे असे म्हणता येणार नाही.
मनुष्याला जेव्हा जाणीव होते की, जगातील सर्व गोष्टी म्हणजे ‘मी नाही, माझे नाही, माझा आत्मा नाही’ तेव्हा त्या गोष्टीबद्दलची त्याची आसक्ती नष्ट होते आणि तो आसक्तीपासून मुक्त होतो. आत्म्यासंबंधीच्या ‘मी आहे, माझे आहे, माझा आत्मा आहे’ या भ्रामक कल्पनेमुळेच मनुष्य स्वत:च्या हिताकडे जास्त लक्ष देतो. मग दुसर्‍याचे नुकसान झाले तरी त्याचे त्याला काही सोयरसूतक नसते. अशा मनुष्याच्या प्रवृतीमुळेच सर्व प्रकारचे दु:ख उत्पन्न होते. दु:ख रोगावर सर्वात प्रभावी औषध म्हणजे जगात आत्मा नाही याची जाणीव ठेवणे होय.
अनत्त (अनात्मता) या शब्दाचे स्पष्टीकरण तीन प्रकारे केले आहे-
१) असार कत्थेन अनत्ता:
माणसाचे शरीरातील प्रत्येक अणु-रेणू बदलत असतात. शरीर, मन बदललेले असते. विचार आणि विचार करणारी यंत्रणा बदललेली असते. पूर्वी लहान होतो. नंतर तरुण, वयस्क व शेवटी म्हातारे झालोत. जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते म्हणून या बदलणार्‍या नाम आणि रुपात म्हणजेच शरीर आणि मनात न बदलणारा असा आत्मा वास करु शकत नाही.
२) असामी कत्थेन – अनत्ता:
नाम आणि रुपात सतत उदय आणि लय किंवा बदल होत असल्यामुळे त्यांचा कोणी स्वामी अथवा मालक असणे शक्य नाही. अनित्यमुळे वस्तुमात्रात उदय आणि लय होणे हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. हा उदय आणि लय कोणी सांगतो म्हणून किंवा कोणाच्या हुकूमावरुन होत नसून संस्कारीत गोष्टीच्या मूळ गुणधर्माप्रमाणे होतो. म्हणून त्यांना कोणी स्वामी अथवा मालक नाही. ते स्वत:ही त्यांचे मालक नाहीत, म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल. जर पंचस्कंधाचा (रुप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार) कोणी स्वामी अथवा मालक असता तर आत्मा म्हणाला असता की, माझ्या शरीराला काही क्लेश अथवा दु:ख देऊ नको. पण तसे काही होत नाही. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.
३) अवसवत्तनत्थेन-अनत्ता:
पंचस्कंधात जे अव्याहतपणे बदल होत असतात तो कोणाच्याही इच्छेने होत नसतो. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.
जर आत्मा असता तर त्याने इच्छा केली असती की, माझे रुप असे असे व्हावे. पण तसे होत नाही. कोणाच्या इच्छेने बदल होत नाही तर ते नैसर्गिकरीत्या अनित्यमुळे घडत असते. नैसर्गिक बदलामुळे म्हातारपण येते, मरण येते. तेथे आत्म्याचे काहीही चालत नाही. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.

क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१९.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!