५ सप्टेंबरजागतिक धर्मादाय दिन-संयुक्त राष्ट्र
जागतिक धर्मादाय दिन दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हे संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये जाहीर केले होते. जागतिक धर्मादाय दिनाचा मुख्य हेतू म्हणजे स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:च्या हेतूसाठी व्यक्ती, धर्मादाय, परोपकारी आणि स्वयंसेवक संघटनांसाठी जागरूकता वाढवणे आणि जगभरातील दान संबंधित कामांसाठी एक सामान्य व्यासपीठ उपलब्ध करणे. धार्मिक किंवा नैतिक उद्देशाने दान करण्याकरिता निर्माण झालेला निधी किंवा आर्थिक उपयुक्त साधन म्हणजे धर्मादाय. त्याचप्रमाणे निधी किंवा आर्थिक मूल्य असलेले साधन यातून केलेले दान किंवा आर्थिक साधनांचा गरजूंस करून दिलेला उपयोग म्हणजेही धर्मादायच होय.
उदा. धर्मादायमधून निर्माण केलेला विश्वस्त निधी, रुग्णालय आणि औषधालय, पाणपोई, धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृह, अनाथालय, अपंगसेवा केंद्र इ. गोष्टी धर्मादाय म्हटल्या जातात व त्याद्वारे दिलेले अनुदान किंवा त्यांचा करू दिलेला उपयोग हाही धर्मादायच होय. धर्मादाय हा दानाचाच एक प्रकार आहे. अन्नदान, विद्यादान, द्रव्यदान, प्राणदान, कन्यादान, भूमिदान, वस्त्रदान इ. स्वरूपात व्यक्तीने किंवा समूहाने धार्मिक किंवा नैतिक बुद्धिने केलेला परोपकार म्हणजे दान होय. दान हे पुण्यकारक कर्म आहे. भिक्षेकऱ्यास घातलेली भिक्षा किंवा धार्मिक कार्यासाठी महसुलातून प्रत्येक वर्षी काढून ठेवलेली रक्कम किंवा धर्मशील व्यक्ती किंवा धार्मिक कार्य यांच्या खर्चासाठी नेमून दिलेली रक्कम हेही धर्मादायात मोडते. सारांश मानवजाती संबंधी सद्भावना व प्रेम या भावना धर्मादाय संकल्पनेशी निगडीत आहेत.
‘धर्मादाय’ यातील ‘धर्म’ हे पहिले पद त्यामुळेच आले आहे. आज पर्यंत पुण्यप्राप्ती हाच प्रामुख्याने धर्मादायाचा उद्देश राहिलेला असला, तरी बदलत्या काळाची पाऊले पाहून आज मानवतावादी व भूतदयावादी दृष्टीकोनातूनच धर्मादायाची प्रस्थापना व व्यवस्थापन करणे समाजाच्या दृष्टीने अधिक हिताचे ठरणार आहे. माणसा माणसांच्या मध्ये असणारा सामाजिक, सांस्कृतिक व अर्थिक असमतोल नष्ट करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून धर्मादायाकडे पाहण्यास आता हरकत नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत