कोणाचेही सरकार आले तरी सत्तेत वाटा हा मोजक्याच विशिष्ट प्रस्थापित सत्ताधारी लोकांचा
समाज माध्यमातून साभार
निवडणूका संपल्यात. 36 तासात निकाल सुद्धा येतील. आमच्यासारखे लोक जे सदैव सत्तेच्या विरोधी बाजूने असतात, त्यांना कोणती आघाडी सरकार स्थापन करते, ह्याने काही फरक पडणार नाहीये. कोणाचेही सरकार आले तरी सत्तेत वाटा हा मोजक्याच विशिष्ट प्रस्थापित सत्ताधारी लोकांचा आणि त्यांच्या जातींचाच असणार आहे. बाकी 80-85% बहुजनांचा राज्याच्या सत्तेमध्ये सहभाग हा एकदम किरकोळ स्वरूपाचा असेल. त्यामुळे निकालाची उत्सुकता अजिबात नाही. आणि कोण जिंकणार, कोण हरणार ह्यावर काही आपले मत पण नाही.
पण भंडारा विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचा भोंडेकर हाच निवडून येईल हे पक्के आहे. ह्याचे कारण स्पष्ट आहे. हा राखीव मतदार संघ आहे. 2019 मध्ये, भोंडेकर स्वतंत्र उभा होता. त्यावेळी बीजेपी+शिवसेना कडून एक बौद्ध उमेदवार होता आणि काँग्रेस + राष्ट्रवादी कडून सुद्धा बौद्ध समाजाचा उमेदवार होता. परंतु ह्या दोन्ही आघाड्यांच्या ओबीसी मतदारांनी त्यांच्या आघाडीच्या बौद्ध उमेदवाराला वोटिंग न करता, भोंडेकर ह्या हिंदु दलित समाजातील अपक्ष उमेदवाराला बहुमताने निवडून दिले. ह्यावेळेस तर भोंडेकर हा महायुतीचा उमेदवार आहे, म्हणजे बीजेपी+ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची एक मोठी ताकद त्याच्या सोबत आहे. दुसऱ्या बाजुला महाविकासआघाडीच्या काँग्रेसच्या बौद्ध उमेदवाराला काँग्रेसचे किती ओबीसी मतदार वोटिंग करतील ह्याची शंका आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघात एकतर्फे निकाल भोंडेकर च्या बाजूने लागेल हे निश्चित आहे. भंडाराच नाही तर राज्यातील एससी साठी राखीव सर्व मतदार संघात हेच राजकारण खेळल्या जाते. ह्या सर्व राखीव मतदार संघात बौद्ध उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा का असेना त्याला हरवायचे आणि हिंदु दलित उमेदवाराला निवडून आणायचे हे त्या मतदार संघातील 70-80% असलेले हिंदु मतदार ठरवतात. त्यामुळेच लोकसंख्येच्या प्रमाणात 28 राखीव मतदार संघातुन 18-20 आमदार हे बौद्ध समाजाचे निवडून यायला पाहिजेत पण प्रत्यक्ष येतात ते 7 ते 8. यासाठीच बाबासाहेबांना स्वतंत्र मतदार संघ पाहिजे होते जिथे एससी साठी राखीव मतदारसंघात फक्त एससीचे लोकच मतदान करून त्यांचा खरा प्रतिनिधी निवडून पाठवतील. पण आज राखीव मतदारसंघात निवडून येत असलेले भोंडेकर सारखे लोक हे एससीचे नाही तर बहुसंख्य असलेल्या हिंदुंचे प्रतिनिधी म्हणुन निवडून येतात. हा पुणे कराराचा सर्वात वाईट परिणाम आहे. ही साधी गोष्ट आणि साधे राजकारण बौद्धातील शिकलेल्या नोकरी पेशातील काँग्रेसचा वोटर आणि समर्थक असलेल्या लोकांना कळत नाही. असो.
ह्या निवडणुकीतील सर्वात प्रशंसनीय गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी पक्षाप्रती आणि विचारधारेप्रती दाखवलेली निष्ठा. मीडियाचा सपोर्ट नाही, पैसा नाही, साधन सामुग्री नाही, अशा अतिशय कठीण परिस्थीत सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. वंचित च्या उमेदवारांना किती मत मिळतील ही गोष्ट दुय्यम आहे. चळवळ आणि विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी, प्रस्थापित पक्षांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढणे हे महत्वाचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत