लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असे चित्र दिसत असेल तर…
लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असे चित्र उभे ठाकल्यास आपण काय निवडावे याबाबत बाबासाहेबांचे अत्यंत मार्गदर्शनपर विचार आहेत.
प्रसंग दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भूमिका घेण्याचा होता. दृढनिश्चय करण्याचा होता. त्यावेळी आपल्यावर (भारतावर) इंग्रजी राजवट होती. इंग्लंडचे राज्य होते. आपल्यावरील 'इंग्रजी राज्य' हे काही आपल्याला तेव्हा फार प्रिय होते असे नाही. मात्र प्रश्न 'लोकशाही मूल्यांचा' होता. लोकशाहीच्या शत्रूंविरुद्ध उभे ठाकण्याचा होता. ठाम भूमिका घेण्याचा होता. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. इंग्लड हा त्या महायुद्धात जर्मनीच्या विरुद्ध उतरला होता. आणि तेव्हा जर्मनीतील नाझीझमचा पाया 'वांशिक उद्धटपणा' होता. जसा भारतात 'ब्राह्मणवाद आहे तसा तो तेथील वंशवाद ! येथील ब्राह्मणवादाचा पाया हा अत्यंत अमानवीय असून 'स्वातंत्र्य, समता व बंधुत्वास नकार देणारा आहे. हे आता जगास लपून राहिलेले नाही.
तर त्या महायुद्धाप्रसंगी बाबासाहेबांची भूमिका ही नाझीझमच्या पुरस्कर्त्या तत्कालीन जर्मनीस पराभूत करणे हाच आपला मार्ग असला पाहिजे अशी होती. ही अत्यंत सुज्ञ भूमिका घेतांना बाबासाहेब त्याबाबत स्पष्टीकरणही देतात. भारतावर तर इंग्रजांचे राज्य असतांना, का म्हणून आम्ही आमच्यावर राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या बाजूने, जर्मनीच्या विरुद्ध या युद्धात उभे राहावे? आपला शत्रू तर इंग्लंड होता. असा कोणालाही प्रश्न पडणे साहजिकच आहे. याचे उत्तर प्रज्ञावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून स्पष्ट होते. ते अत्यंत लाखमोलाचे विचार असून अत्यंत दिशादर्शक आहेत. लोकशाही मूल्यांना प्राणप्रिय मानून लोकशाहीस जगू इच्छिणाऱ्या प्रत्येक मनुष्यमात्रास सदासर्वकाळ ध्यानीमनी ठेवण्याजोगे ते विचार आहेत.
बाबासाहेब म्हणतात,
” हे लोकशाही आणि हुकूमशाही यामधील युद्ध आहे. ती सुद्धा उदारमतवादी कल्याणकारक हुकूमशाही नव्हे तर ती अत्यंत रानटी स्वरूपाची हुकूमशाही होय. तिचा पाया नीती नसून वांशीक उद्धटपणा आहे. पुर्णतः नायनाट करून टाकण्याजोगी जर कोणती हुकूमशाही असेल तर ती हीच नीच नाझी हुकूमशाही होय. नाझीझमचा विजय झाल्याने जी भयंकर विपत्ती ओढवणार आहे तेवढी भयंकर गोष्ट अजून घडली नाही व भविष्यातही कदाचीत दुसरी घडणार नाही, हे आपण विसरून जाण्याची शक्यता आहे. तिचा वंशावर आधारलेला पाया हा भारतीय लोकांना अधिक धोकादायक ठरणार आहे ही फार महत्त्वाची बाब आहे. परिस्थिति संबंधीचे हे विचार जर बरोबर असतील तर या जगाच्या पाठीवरून माणसामाणसातील संबंधाचे योग्य पालन करविणारे लोकशाहीचे तत्व लुप्त होऊ नये म्हणून लक्ष देणे आपले जबरदस्त कर्तव्य ठरते असे मला वाटते. आपला जर त्यावर विश्वास असेल तर आपण त्याशी एकनिष्ठेने व सत्याने वागले पाहिजे. आपला लोकशाहीवर खंबीर विश्वास असूनच भागणार नाही तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्वांचा मुळासह नाश करणाऱ्या लोकशाहीच्या शत्रूला कोणत्याही कृत्याने आपण मदत करणार नाही, असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे.”
आजमितीस आपण हे बघतो आहोत की, खाजपयुतीने या देशात ब्राह्मणवादाचा भरभक्कम पुरस्कार केला तर आहेच. शिवाय या 'खाजप-युतीने' ब्राह्मणवादाच्या अंमलबजावणीस मोठया वेगाने हात घालून लोकशाहीस ध्वस्त करण्याचा विडाही उचलल्याचे चित्र आपल्या अवतीभवती राजरोसपणे दिसते आहे. अशाप्रसंगी आपण काय करावे म्हणून प्रत्येक सुज्ञ भारतीय नागरिकास प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. लढाई दिवसागणिक अटीतटीची होते आहे. तेव्हा लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, लोकशाही मूल्यांना जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांच्या हाती जे घटनादत्त शस्त्र आहे ते म्हणजे 'मतदानाचे' ! मतदानाच्या या शस्त्राचा वापर लोकशाहीच्या शत्रूस पराभूत करण्यासाठी कसे उपयोगात आणता येईल यादृष्टीने व्हावयास हवा. आणि तसा आपण दृढनिश्चय करणे हे लोकशाही हितार्थ आहे. जनतेच्या हितार्थ आहे. ते स्वजनहितार्थही आहे.
बहुमतास मान्यता असणाऱ्या आपल्या देशाच्या लोकशाहीत 'मतांच्या विभागणीने' बहुमतात येणे सहजशक्य आहे. याचे गणित मांडून, लोकशाहीचे शत्रू स्वतःचा डाव साधण्यात तरबेज झाले आहेत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याचे ब्राह्मणी षडयंत्र ते निलाजरेपणाने अंगिकारतात. साम दाम दंड भेद हा त्यांचा मार्ग सर्वश्रुत आहे. मत विभागणी, अधिकाधिक मत विभागणी हा त्यांच्या डावपेचांचा भाग ! स्वतः बलाढ्य असूनही युतीने लढायचे आणि इतरांना मात्र विभागणीत लढवायचे. आधीच हजारो जातींमध्ये विभागलेला तसेच धर्म, भाषा, पंथातही विभागलेला या देशातील लोकसमूह !! त्यांच्या सहज गळाला लागतो. हे ते ओळखून आहेत. त्यांच्या ध्रुवीकरणाचे कसब त्यांच्यात पुरेपूर आहे. हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणूनच आपल्या कोणत्याही कृत्याने लोकशाहीच्या शत्रूला मदत होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. लोकशाहीच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी आपण तसा दृढनिश्चयचं केला पाहिजे.
आपले मत (Vote) शस्त्र दुधारी आहे. त्याचा वापर अग्रक्रमाने लोकशाहीच्या शत्रूंनाच पराभूत करण्यासाठी करू या. बाबासाहेबांच्या आदेशानुसार, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्वांचा मुळासह नाश करणाऱ्या लोकशाहीच्या शत्रूला कोणत्याही कृत्याने आपण मदत करणार नाही, असा आपण दृढनिश्चय करूनच आपलं कर्तव्य पार पाडू या.
जय भारत !❤️🇮🇳
प्रशिक आनंद, नागपूर
दि. १९.११.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत