महाविकास आघाडीला मतदान करण्याची अपरिहार्य अगतिकता !
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा खुला प्रचार येत्या ३ दिवसात समाप्त होईल. या निवडणुकीत कॉँग्रेस+शपरा कॉँग्रेस+ठाशीवसेना यांची महाविकास आघाडी आणि रा. स्व. संघ-भाजप + शिंशीवसेना + अपरा कॉँग्रेस यांची ब्राह्मणवादी महायुती या दोन्ही छावण्यांचा प्रचार, एकमेकांची उणिदुणी काढणे आणि मतदारांना आर्थिक व अन्य प्रलोभने दाखविणे याच मुख्य मुद्यांवर केंद्रित झाल्याचे दिसते. नाही म्हणायला महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या कोंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, राहुल गांधी यांनी रा. स्व. संघ-भाजपकडून संविधानाला निर्माण झालेला धोका, आरक्षणाची मर्यादा वाढविणे,जातीय जनगणना, संसाधनाचे न्याय्य वाटप हे मुद्दे प्रचारात घेतले आहेत. मात्र त्यांच्या पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी राहुल गांधी यानी भर दिलेल्या मुद्द्यांचा प्रचारात फारसा उल्लेख करीत नाहीत किंवा ओझरता स्पर्श करतात. हे पाहता कॉँग्रेस पक्षाचे पक्षाचे राज्यातील नेते सामाजिक न्यायाच्या आणि अजा/अज, भटके-विमुक्त, ओबीसी, धार्मिक अल्पसंख्यक या वर्गांशी निगडीत मुद्द्यावर फारसे गंभीर नाहीत असेच म्हणावे लागेल. या ही स्थितीत अनुसूचित जाती, जमाती,भटके-विमुक्त, ओबीसी, धार्मिक अल्पसंख्यक या वर्गाला महाविकास आघाडीला मतदान करण्याची अपरिहार्य अगतिकता या वर्गावर ओढवली आहे. ती का ओढवली आहे आणि ती अपरिहार्य का आहे याचे विश्लेषण करणे भविष्यातील गैरकॉँग्रेस आणि गैर आरएसएस-भाजप राजकारणाची उभारणी करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील कॉँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष व मागसावर्गीया संबंधी दृष्टीकोण
भारतातील राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख राजकीय पक्षांपैकी कॉँग्रेस हा असा पक्ष आहे ज्यास विशिष्ट असे सामाजिक-राजकीय तत्वज्ञान आणि सुस्पष्ट असे ध्येय नाही. कॉँग्रेसचे नेतृत्व मोहनदास गांधी यांच्या हातात निर्विवादपणे आल्यानंतर त्यांनी कॉँग्रेसला उदार ब्राह्मणवादी चेहरा देण्याचा प्रयत्न केला आणि स्वातंत्र्य प्राप्ती हे ध्येय निश्चित केले. मात्र त्यांनी कॉँग्रेसला एखाद्या विशिष्ट तत्त्वज्ञानावर अधिष्ठित केले नाही. यामुळे देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर राष्ट्र कोणत्या तत्त्वज्ञानात्मक पायावर उभे करावे याचे सुस्पष्ट आकलन कोणत्याही कॉँग्रेसी नेत्याकडे नव्हते. यामुळे कॉँग्रेस पक्षाच्या अंतर्गत परस्पर विरोधी तीन गट निर्माण झाले होते. यातील पहिला गट हा आर एस एस समर्थक हिंदुत्ववादी विचारांचा होता. याचे नेतृत्व सरदार पटेल करीत होते. या गटामध्ये पुरुषोत्तमदास टंडन,पंडित मदन मोहन मालविय, के. एम. मुंशी, रविशंकर शुक्ला, गोविंद वल्लभ पंत इत्यादी नेते होते. कॉँग्रेस पक्षातील पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट उदारमतवादी लोकशाही मानणारा गट होता. कॉँग्रेस पक्षातील तिसरा गट समाजवाद्यांचा होता. यांचे नेतृत्व जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव हे करीत होते.
मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर कोंग्रेस पक्षातील अंतर्गत भांडण विकोपाला गेले. या भांडणातून मार्च १९४८ मध्ये जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया व अन्य समाजवादी नेत्यानी कॉँग्रेस पक्षातून बाहेर पडून सोशलिस्ट पार्टी ची स्थापना केली. पटेलांनी नेहरू परदेशात असताना कॉँग्रेसचे अध्यक्ष पद नेहरूंच्या विरोधी असलेले संघभक्त पुरुषोत्तमदास टंडन यांच्याकडे सोपविले. आणि नेहरूना कॉँग्रेस पक्षातून बाहेर काढण्याची योजना आखली होती. मात्र त्यापूर्वीच पटेलांचा मृत्यू झाला (डिसेंबर १९५०). नेहरूना आर एस एसच्या या योजनेची कल्पना येताच त्यांनी १९५१ मध्ये पुरुषोत्तमदास टंडन यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. यामुळे कॉँग्रेस मधील आर एस एस समर्थक हिंदुत्ववादी गट प्रचंड नाराज झाला होता व तो नेहरूंच्या विरोधी कारस्थाने करीत होता. याबरोबरच कॉँग्रेस पक्षांमध्ये त्यावेळी ब्राह्मण नेत्यांची संख्या जास्त होती व त्यांचे पक्षाच्या संघटनेमध्ये वर्चस्व होते. या पार्श्वभूमीवर नेहरूंना आर एस एस समर्थक हिंदुत्ववादी गटांचा विरोध कमी करण्यासाठी ब्राह्मणसंरक्षक धोरणे राबविणे भाग पडत होते. नेहरूंची हिंदू कोड बिल पारित करण्या संदर्भातील नरमाईची भूमिका, इतर मागासवर्गीयांच्या ओळखीसाठी आयोग स्थापन करण्यास विलंब लावण्याची व त्यानंतर अहवाल न स्वीकारण्यामागची भूमिका, धर्मांतरीत बौद्धांना अनुसूचित जाती म्हणून मिळणारे आरक्षण पूर्ववत चालू न ठेवण्याची भूमिका या सर्व धोरणांचे मूल्यमापन कॉँग्रेस पक्षातील सरदार पटेलांना मानणाऱ्या आर एस एस समर्थक हिंदुत्ववादी नेत्यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने करणे आवश्यक आहे.
पंडित नेहरू थोड्याफार प्रमाणात उदारमतवादी लोकशाहीला व फेबियन समाजवादी विचारांना अनुसरून जमीन सुधारणा कायदे, अनुसूचित जाती जमातीना शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण लागू करण्यासंबंधीचे धोरण, अस्पृश्यता निवारण कायदा पारित करणे यासारखी, जी काही प्रागतिक धोरणे राबवित होते तीसुद्धा कॉँग्रेस पक्षातील आर एस एस समर्थक हिंदुत्ववादी नेत्यांना मान्य नव्हती. यामुळे त्यांनी कॉँग्रेस पक्षातुन बाहेर पडून सी. राजगोपालाचारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.
इंदिरा गांधी यांच्या काळातही कॉँग्रेस पक्षातील उदारमतवादी लोकशाहीवादी आणि आर एस एस समर्थक हिंदुत्ववादी यांच्यातील अंतर्गत सुप्त संघर्ष कायम होता. तरीही इंदिरा गांधी यांच्या काळात आरक्षण धोरणाची अमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे, अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष विकास निधीची तरतूद करणे आणि त्यास योजना आयोगाच्या नियंत्रणाखाली आणून वैधानिक आधार देणे यासारख्या अत्यंत महत्वाच्या धोरणाची अमलबजावणी करण्यात आली. यामुळे अनुसूचित जाती जमातींच्या हजारो तरुणांना बँकामध्ये, निमसरकारी उपक्रमामध्ये शासकीय नोकऱ्या मिळाल्या. यातून अनुसूचित जाती जमातींमध्ये एक माध्यम वर्ग तयार झाला. या नोकरदार मध्यमवर्गामुळे मागास वर्गीयांनी उल्लेखनीय असा शैक्षणिक व सामाजिक विकास साधला ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.
कॉँग्रेस हे जळते घर आहे या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा अन्वयार्थ.
कॉँग्रेस पक्षाचा विरोध करताना प्रत्येक आंबेडकरवादी नेता बाबासाहेबांच्या या विधानाचा संदर्भ देतात. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे विधान कोणत्या पार्श्वभूमीवर केले होते त्याची कारणमीमांसा करीत नाही. कॉँग्रेसच्या भूतकाळातील व वर्तमान काळातील राजकारणाचे स्वरूप समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या या विधानामागील पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. “काँग्रेस हे जळते घर आहे” या बाबासाहेबांच्या विधानाचे आकलन होण्यासाठी तत्कालीन काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटांच्या संघर्षाची उपरोक्त नमूद पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी काँग्रेस संदर्भातील हे विधान लखनऊ येथे भरलेल्या संयुक्त प्रांत शेड्युल कास्ट फेडरेशनच्या पाचव्या अधिवेशनाला संबोधित करताना दिनांक 25 एप्रिल 1948 रोजी केले होते. ते म्हणाले की, काँग्रेसची स्थिती आज आग लागलेल्या घरासारखी झाली आहे. त्यात प्रवेश करण्याने आपणच भस्मसात होऊ. येत्या दोन वर्षात काँग्रेसचा नाश झाला तर त्यात मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. (Congress is a burning house and we cannot be prosperous by entering in it. I shall not be surprised if it is ruined in a couple of years. Socialists have come out of the Congress. That will certainly weaken the Congress.)
ते पुढे म्हणतात की, समाजवादी आज काँग्रेस मधून बाहेर पडले आहेत त्यामुळे काँग्रेसचे बळ निश्चितपणे कमी होणार आहे. अशावेळी आपण तिसरा पक्ष या नात्याने आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर काँग्रेस किंवा समाजवादी यापैकी कोणालाही हुकमी बहुमत प्राप्त झाले नाही तर ते आपल्या मतांची भीक मागण्यासाठी येतील. अशावेळी आपला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या अटी पुढे करून सत्तेतील समतोलपणा राखू शकतो.” (संदर्भ : डॉ.. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3, पृष्ठ क्रमांक 91 )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विधानाचा बारकाईने अन्वयार्थ लावल्यास असे दिसून येते की कॉंग्रेस पक्ष त्यांच्यामधील अंतर्गत संघर्षामुळे खिळखिळा होत होता व त्यांचे बळ कमी होत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉँग्रेस पक्षाचे बळ कमी होणे याकडे एक संधि म्हणून पाहतात. ते म्हणतात की, तिसरा पक्ष या नात्याने आपण आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर कॉँग्रेस किंवा समाजवादी यापैकी कोणालाही बहुमत मिळाले नाही तर तिसरा पक्ष म्हणून काही अटींवर आपण आपला पाठिंबा देण्यास पुढे आले पाहिजे. याचाच अर्थ कॉँग्रेस पक्षाला कोणत्याही स्थितीत पाठिंबा देऊ नये या मतांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नव्हते हेच दिसून येते.
महाविकास आघाडीला मतदान करण्याची अपरिहार्य अगतिकता !
आजघडीला कॉँग्रेस पक्ष कधी नव्हे इतका कमजोर झालेला आहे. रा.स्व.संघ/भाजपची युद्धनीती व युद्धसामर्थ्य पाहता त्यांचा निर्णायक पराभव करण्याची क्षमता आजतरी भारतातील कोणत्याही एका राजकीय पक्ष/गटाकडे नाही ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. यामुळे रा.स्व. संघ भाजपचा निर्णायक पाडाव करण्यासाठी ब्राह्मणराष्ट्र विरोधी विविध गटांची आघाडी तयार करणे हाच एकमेव पर्याय उरतो. महाराष्ट्राच्या राजकारणापुरता विचार केल्यास या आघाडीचा मुख्य घटक कॉंग्रेस पक्षच आहे. मात्र काँग्रेस पक्ष रा.स्व. संघ/भाजपला पराभूत करण्यासाठी आवश्यक गांभीर्य ( Seriousness ) दाखवीत नाही. त्याबरोबरच रा.स्व.संघ भाजपच्या तत्त्वज्ञानाचे घोर विरोधी असलेल्या ब्राह्मण्यवाद विरोधी राजकीय पक्षांची वाढ होऊ नये असे डावपेच कॉंग्रेस पक्ष अवलंबितो. स्व.संघ/भाजपच्या जातीय/धार्मिक पक्षपाताचे बळी असलेले मतदार, काँग्रेस पक्षाकडे जाऊन रा.स्व.संघ/भाजपविरोधी मतांचे धृवीकरण होऊ नये यासाठी रा.स्व.संघ/भाजप आटोकाट प्रयत्न करीत असतो. कॉंग्रेस पक्ष नेहमीप्रमाणे रा.स्व.संघ/भाजपच्या भीतीमुळे कोणत्याही ठोस भूमिकेशिवाय बौद्ध मते आपल्याकडे येतील असे गृहीत धरून रा.स्व.संघ/भाजपचा धाक दाखवून मते मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. रा.स्व.संघ/भाजप आणि कॉंग्रेस पक्षाच्या या सापळ्यात बौद्ध,मुस्लीम,ओबीसी,दलित, आदिवासी मतदार आजवर अलगद अडकत आला आहे. यातून मार्ग काढून स्वतःचे राजकीय सक्षमीकरण कसे करता येईल ? आपल्या समूहाचे राजकीय सक्षमीकरण करण्यासाठी सुयोग्य धोरण (Strategy) परिस्थितीनुरूप नवनवे डावपेच (Tactics) आणि मनुष्यबळाचा परिणामकारक वापर (Mobilization of Troops ) कसा करता येईल हे बौद्ध,मुस्लीम,ओबीसी,दलित, आदिवासी मतदार समूहांच्या पुढील प्रश्न आहेत.
बौद्ध,मुस्लीम,ओबीसी,दलित, आदिवासी समूहानच्या विविध प्रश्नावर चिंतन करून ब्राह्मण्यवाद विरोधी राजकारण उभे करणे आणि परिवर्तनवादी राजकारणाचे सक्षमीकरण करण्यासाठी यामुळेच रा.स्व.संघ/भाजपची ब्राह्मणवादी हुकुमशाही सत्ता पराभूत करणे
सुनील खोबरागडे
संस्थापक, संपादक,
जनतेचा महानायक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत