एक धर्मीय देशाच्या वेडगळ कल्पनांत रममाण होणाऱ्या लोकांसाठी,
भारतात इस्लाम आला सातव्या शतकात.
केरळ-तामिळनाडू ,गुजरात मध्ये किनारपट्टी प्रदेशात आधी आगमन झाल्याचे उल्लेख इतिहासात आहेत.
उत्तर हिंदुस्तानात राज्य स्थापन करून इथ राहून राज्यकारभार, मुलकी महसुली राज्यव्यवस्था राबवण्याच काम बाबरापासून पुढे ज्याचा राज्यविस्तार बराच मोठा.
बाबर अरब किंवा आखाती देशातून आलेला नव्हता तर तो उझबेकिस्तान मधून आलेला होता, आता नकाशा घेऊन हा देश शोधत बसा.
दक्षिणेत गुलबर्गा राजधानी करून बहामनी सल्तनत स्थापन झाली १३४७ ला.
विजयनगरकडून तिचा पराभव झाल्यावर तिची पाच शकल झाली.
विजापूरची आदिलशाही
गोवळकोंडा येथे कुतुबशाही
अहमदनगर येथे निजामशाही
बिदर येथे बरिदशाही
बेरार इथे इमादशाही
कधी इतर हिंदू राज्यांच्या सोबत कधी आपसात लढाया करून यांनी अस्तित्व टिकवायचा प्रयत्न केला.
उत्तरेत आणि दक्षिणेत दोन्हीकडे संपूर्ण सैन्य मुस्लीम असणार एकही राज्य नव्हत.
कुठल्याही राजाकडे संपूर्णपणे परकीय म्हणजे अरब किंवा भारतीय उपखंडाच्या बाहेरून आलेल सैन्य नव्हत.
उत्तरेत आणि दक्षिणेत दोन्हीकडे सैन्यात असणारे मुस्लीम भारतीय होते, म्हणजेच धर्मांतरित मुस्लीम होते.
सगळ्या राज्यांच्या पदरी स्थानिक हिंदू सरदार असण आणि मुलकी राज्यव्यवस्था स्थानिकांना दिलेली असण सामान्य होत.
शहाजीराजे निजामशाही आदिलशाही अस आलटून पालटून करून शेवटी आदिलशाही राज्याचे सरदार झाले आणि त्यांना आदिलशहाने ‘ फर्जंद ‘ किताब देऊन बंगळुरू मध्ये स्वतंत्र दरबार भरवण्याची परवानगी दिलेली होती.
दक्षिण विजयाला गेल्यावर शिवाजी महाराजांचे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने जंगी स्वागत केले आणि महाराजांचे त्याच्याशी सलोख्याचे संबंध होते.
गझनीचा महमूद जेवढ सैन्य घेऊन आला त्या सैन्याला अफगाणिस्थान पासून गुजरात पर्यंत रस्तामार्गे दोन हजार किलोमीटर प्रवासात किती राजांनी मदत केली आणि किती राजांनी विरोध केला ? मदत करणारे सगळेच मुस्लीम होते कि सर्वधर्मीय होते ? विरोध करणारे सगळेच मुस्लीम होते कि सर्वधर्मीय होते ?
महाराष्ट्रापुरत बोलायचं ठरल तर आदिलशाही -निजामशाही -मुघल तिन्हीकडे मराठा सरदार सोयीने नोकऱ्या करायचे.
कधी स्थानिक पातळीवर विरोध असलेला सरदार जिकडे जाईल त्याच्या विरोधातल्या राजाकडे दुसऱ्या सरदाराने जाणे हेही सामान्य होत.
अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही आजोळकडचे कुटुंबीय याच नोकऱ्या करत होते हेही वास्तव नाकारता येत नाही.
मग लुटालूट , गाव उध्वस्त करणार , शेतांची जाळपोळ , कत्तली करणारे सरदार आणि सैन्य फक्त मुस्लीम होत हे कितपत सत्य आहे ?
राणा प्रतापाचा सेनापती हाकिम खान सुरी आणि अकबराचा सेनापती राजा मानसिंग ,
कर्नाटकात शृंगेरीच्या मठाला उध्वस्त करणार सैन्य पेशव्यांचे आणि त्या मठाची दुरुस्ती करून शारदेची मूर्ती पुन्हा स्थापित करायला देणगी देणारा राजा टिपू,
शहाजीराजांना अटक करणारा बाजी घोरपडे अफजलखानाच्या मदतीला असणं,
पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून वेशीत पहार ठोकून तुटकी चप्पल टांगणारा मुरार जगदेव,
याची संगती नेमकी कशी लावायची हा प्रश्न पडतो.
इथल्या स्थनिकांचे राज्य व्हावे म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली.
दक्षिणेतील बहामनी राजवट आणि नंतरच्या पाच छोट्या राज्यांचा दक्षिण भारतावर राजकीय, सांस्कृतिक , सामाजिक असा नेमका कोणता आणि किती प्रभाव पडलेला आहे याचा अभ्यास कुणी केलेला आहे का ?
वर उल्लेख केलेली दक्षिणेतील मुस्लीम राज्य सुद्धा स्थानिकच म्हणावी लागतील ना ?
धर्माचा चष्मा काढला कि या सगळ्या गोष्टींची उत्तर स्पष्टपणे मिळतात.
हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून तेच फक्त चांगले आणि मुस्लीम वाईट हे गृहीतक समोर ठेवून सगळी मांडणी केली तरीही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.
वाईट प्रवृत्ती आणि जन्मदत्त धर्म यांचा संबंध नसतो, ती फक्त राजकीय पोळी भाजायला हलकट लोकांनी केलेली भंपक मांडणी असते एवढ समजल तरी पुरेस.
पण इतिहासाचे थडगे खोदून आपल्याला सोयीची मढी बाहेर येत नाहीत तर गैरसोयीची मढी सुद्धा बाहेर येतात हे सत्य नाकारता येत नाही.
आनंद शितोळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत