आदरणीय बाळाराम आंबेडकर स्मृतिदिन
✹ १२ नोव्हेंबर ✹
स्मृती – १२ नोव्हेंबर १९२७ (मुंबई)
डॉ. आंबेडकरांचे पूर्वजांचा मोगलबादशाही, मराठेशाही व पेशवाई मध्ये लष्करी पेशा होता. त्यांचे आजोबा मालोजी सकपाळ हे कंपनी सरकारच्या सैन्यातून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाले. रामजी, त्यांचे दोन भाऊ यांची लष्करात ‘रिक्रुट’ या पदावर नियुक्ति झाली होती. ‘सुभेदार’ या पदावर रामजी सेवानिवृत्त झाले. डॉ.आंबेडकरांच्या आईचे नाव ‘भीमाबाई’ होते. भीमाबाईंचे वडील आणि सहा चुलते सैन्यात सुभेदार मेजर होते. बाळाराम आंबेडकर डॉ.आंबेडकरांचे थोरले भाऊ, हे सैन्यात बँडपथकात होते. त्यांच्या चारही बहिणींचे पती सैन्यात होते. एकदा मारवाडी विद्यालयात त्यावेळचे सर्व हिंदु पुढारी एकत्र जमले होते. त्यांचे भाषणं होत असतांनाच बाळाराम आंबेडकर यांनी भरसभेत मधेच उठून अस्खलीत इंग्रजीत प्रश्न विचारून वक्त्यांना भंडावून सोडले होते. त्यांचा एक एक प्रश्न असा होता की, “हिंदु धर्मात ज्यांना तुम्ही अस्पृश्य मानता, ते लोक जर आज त्या धर्माबाहेर गेले तर तुम्हाला काय वाटेल? आणि ते तसे जाणार नाहीत यासाठी तुम्ही काय करणार आहात? जर हिंदु धर्माला ग्लानी नको असेल तर त्यांना समजून घेतले पाहीजे. त्यांची गाऱ्हाणी ऐकली पाहीजे.” अशा प्रकारे जिथे सापडेल तिथे ते अस्पृश्यांची गाऱ्हाणी वेशीवर टांगत. हे भाषण ऐकून त्यावेळचे बॅरिस्टर चंदावरकर हे बाळाराम आंबेडकर यांच्या जवळ आले व त्यांची विचारपुस केली तेव्हा त्यांनी सांगितले की, “विलायतेत जो आंबेडकर शिकतो, तो मी नव्हे, त्यांचा थोरला भाऊ आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तिचे व्यासंगी विद्वान म्हणून सर्व विश्वाला परिचित आहेत. मात्र ते उत्तम चित्रकार, उत्तम व्हायोलीन वादक होते तसेच त्यांनी आपले मोठे बंधू बाळाराम आंबेडकर यांचेकडून तबला वादनाचे अप्रतिम कौशल्यही शिकून घेतले होते. अमरावतीच्या लोकांनी ‘वराहाड प्रांतिक अस्पृश्य परिषद, अधिवेशन दुसरे’ असे अधिवेशन १३ नोव्हेंबर १९२७ रोजी घेण्याचे व त्या अधिवेशनात अंबादेवी मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहा विषयी विचार विनिमय करण्याचे निश्चित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले. त्या अधिवेशनास हजर राहण्यासाठी डॉ.आंबेडकर एक दिवस अगोदर म्हणजे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी अमरावतीला पोहचले. १३ नोव्हेंबर १९२७ रोजी अमरावती इंद्रभुवन थीयटर मध्ये डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली ‘वराहाड प्रांतिक अस्पृश्य परिषद, अधिवेशन दुसरे’ सुरु झाले. इतक्यात डॉ.आंबेडकर यांचे थोरले बंधू बाळाराम यांचे निधन झाल्याची तार मुंबईहून आली. १२ नोव्हेंबर १९२७ रोजी आपल्या राहत्या घरात ह्रुदय क्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले होते. बाबासाहेबांनी ती तार वाचून जवळच बसलेल्या कार्यकर्त्याकडे दिली. त्यानंतर ते लगेच परिषदेच्या कामात मग्न झाले. परिषदेने प्रथम बालारामाच्या दुखावट्याबद्दल ठराव करून १० मिनिट परिषदेचे काम बंद ठेवले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिवेशनाचे काम व्यवस्थित चालविले. त्यांनी आपले वैक्तिक दुःख आपल्या अंतकरणात ठेऊन अध्यक्षीय जबाबदारी व्यवस्थित सांभाळले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईला पोहचल्या नंतर २५ नोव्हेंबर १९२७ च्या ‘बहिष्क्रुत भारत’ मध्ये लिहीतात, ‘माझ्या वडिल बंधुच्या मरण समयी मी मुंबईत नव्हतो. अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी जी अमरावती येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी माझ्या अध्यक्षतेखाली परिषद भरण्याचे ठरले होते त्या परिषदेला मी गेलो होतो. माझ्या गैरहजरित तिन चार हजार बंधुंनी प्रेतयात्रेस हजर राहून असल्या दुःखद प्रसंगी आपली सहानुभूती दर्शवली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.”
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत