संविधानाची वैशिष्ट्ये
बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील थोडीफार माहिती अधूनमधून नजरेखालून गेल्यास काय हरकत…..
१) भारतीय संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची प्रथम बैठक
९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली येथे भरली. या सभेत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान सभेचे एकूण २९९ सदस्य होते. सुरवातीला मुस्लीम लीगने बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
२) संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ च्या सभेत केली.
३) संविधानाचा मसुदा
४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत प्रस्तुत करण्यात आला. त्याआधी जनतेच्या माहितीसाठी तो राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. जनतेच्या सूचना व हरकती प्राप्त होण्यासाठी आठ महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.
४) संविधानाच्या मसुदा संबंधी एकंदर ७६३५ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २४७३ सूचनांचा विचार संविधान सभेत केला गेला.
५) भारतीय संविधानाचे एकंदर ३९५ अनुबंध असून त्यांना १२ अनुसूचींची जोड आहे. त्यातून घटनेची मुलभूत चौकट किंवा ढाचा साकार होऊन तिचा पाया रचला गेला आहे.
७व्या अनुसूचित केंद्राचे व राज्याचे कायदे करण्याविषयीच्या अधिकारांच्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
६) संविधान सभेत संविधानाच्या मसुद्याचे वाचन ३ वेळा करण्यात आले. त्यावर सखोल चर्चा होवून तसेच सूचित करण्यात आलेल्या सुधारणा किंवा बदल यांच्यावर गांभियनि विचार करुन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले व त्यावर संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली.
७) संविधान सभेचे कामकाज ११ सत्रांमध्ये झाले. एकंदर २ वर्षे ११ महिने १७ दिवस या सभेचे कामकाज चालले.
८) ११ वे सत्र ११४ दिवस चालले व शेवटच्या दिवशी प्रस्तावित मसुदा आवश्यक ते बदल व सुधारणा करुन स्वीकृत करण्यात आला.
९) संविधानाच्या निर्मितीत डॉ. राजेंद्र प्रसाद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, गोपाल स्वामी आयंगार, कन्हैयालाल मुन्शी, कृष्णास्वामी अय्यर, राजगोपालचारी, सय्यद मोहम्मद आदीसह अनेक कायदेतज्ञ, समाजसुधारक व विचारवंतांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
१०) ब्रिटिश संसदेने १९३५ साली जो संविधानात्मक कायदा भारतासाठी मंजुर केला होता त्या कायद्यातील अर्ध्यापेक्षा अधिक भाग उचलून संविधानात टाकण्यात आला आहे, आणि उरलेल्यापैकी बराचसा भाग अन्य राष्ट्रांच्या संविधानातून उसना घेण्यात आला आहे, असा आक्षेप सभेत घेण्यात आला होता. या आक्षेपाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत समर्पक उत्तर दिले होते व हा आक्षेप फेटाळून लावण्यात आला.
११) भारतीय संविधानाने पारंपरिक राजेशाही व राज्यपद्धती समूळ नष्ट केली.
१२) स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, समाजवाद व धर्मनिरपेक्ष तत्वांच्या पायावर उभी राहणारी लोकतांत्रिक आधुनिक गणराज्याची स्थापना संविधान निर्मितीमुळे भारतात प्रथमच झाली.
१३) राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रनिष्ठा यांच्या आधारावर भारतीय संघराज्याची निर्मिती करण्यात आली.
१४) नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करुन त्यांच्या व्यक्तीगत सन्मानाचे व जिवीताचे रक्षण करण्याचे अभिवचन संविधानाने भारतीय जनतेस दिले.
१५) भारतात जनहितकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था राबविली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे.
१६) संविधानाची मूलभूत चौकट भक्कम व अपरिवर्तनीय आहे.
१७) भारतीय संघराज्याचे स्वरुपही अपरिवर्तनीय ठेवण्यात आले आहे.
१८) भारतीय जनता व तिने स्वतःप्रत अर्पण केलेले संविधान सर्वोच्च म्हणून समजण्यात आले.
- आपले सर्वश्रेष्ठ आशास्थान-प्रेरणास्थान, भारतीय संविधान, भारतीय संविधान.
- संदर्भ… भारतीय संविधानाचे अंतरंग.
लेखक… अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी.
पान क्र. ४०, ४१
संकलन… संतोष साळवे प्रसारक : मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत