भारतीय राजकारणाचे आजचे वास्तव
सुनील खोबरागडे
वचितांनी रा.स्व.संघ-भाजपला बळ देणे हे राजकीय शहाणपणाचे नाही – भाग १
सद्य:स्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. भारतीय राजकारणाचे आजचे वास्तव लक्षात घेतले तर मागील १० वर्षाच्या काळात एकूणच भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात उजव्या फॅसिस्ट धर्मवादी शक्तींनी आपली पकड घट्ट केली आहे. फॅसिस्ट शक्तींच्या मूलतत्त्ववादी धोरणामुळे संपूर्ण भारतीय समाज विस्कळीत आणि विघटित झालेला आहे. फॅसिस्ट धर्मवादी शक्तींनी भारतीय संविधानाने संकल्पित केलेली भारताची एकात्मता, अखंडता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांना ठोकरून लावले आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याचे आणि व्यक्ति-व्यक्तींमध्ये बंधुता प्रवर्धित करण्याचे संविधानाचे अभिवचन समाप्त करण्यात आले आहे. केंद्रातील रा.स्व. संघ- भाजप सरकारने प्रत्यक्षात संविधानात कोणताही बदल केलेला नसला तरी संविधानाला धाब्यावर बसवून सत्ता राबविली जात आहे हे ढळढळीत वास्तव आहे. रा.स्व. संघ- भाजप सरकार कडून भारतीय संविधानाला आणि शांततामय सहजीवनाला निर्माण झालेला धोका परतवून लावायचा असेल तर वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजुला ठेऊन सर्वोच्च प्राधान्य देशातील संसदीय लोकशाही वाचविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला रा. स्व. संघ-भाजपा कडून निर्माण झालेला धोका परतवून लावणे या बाबी सर्वोच्च प्राथम्याच्या बाबी आहेत. ही बाब लक्षात घेतली तर तूर्त तरी वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजुला ठेऊन संवैधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही बाब सर्वोच्च प्राथम्याची बाब आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन राजकारणाचा विचार केल्यास, वैय्यक्तिक किंवा सामजिक हित यापेक्षा देश हित महत्वाचे मानले पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा भारतीय संविधानाचा प्रमुख शत्रू असलेल्या रा.स्व.संघ-भाजपला पराभूत करण्यास सर्वोच्च प्राथम्य दिले पाहिजे. यासाठी भारतीय संविधाननिष्ठ पक्षांशी एकजूट करणे हे सर्वात जास्त महत्वाचे मानले पाहिजे.
स्वायत्त रिपब्लिकन राजकारणाचा बिनडोक पणे पुरस्कार करणाऱ्या आततायी लोकाना मात्र देशहितापेक्षा स्वतःचा अहंकार आणि वैय्यक्तिक हित महत्वाचे वाटते ही रिपब्लिकन राजकारणाची शोकांतिका आहे. या अहंकारी राजकारणाचे आताचे मुखंड एड. प्रकाश आंबेडकर आहेत. एड. प्रकाश आंबेडकरांच्या ताठर भूमिकेमुळे महाराष्ट्रात मतविभागणी होऊन त्याचा फायदा रा.स्व.संघ-भाजपच्या उमेदवारांना मिळतो हे २०१९ च्या निवडणुकांपासून ते नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. स्वतःच्या पक्षाचा जास्तीत-जास्त फायदा करून घेण्यासाठी, महाविकास आघाडी व अन्य संविधाननिष्ठ पक्षांशी वाटाघाटी कराव्यात व रा.स्व.संघ-भाजपच्या विरोधात एकास-एक लढती होतील अशी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अनेक लेखक, साहित्यिक, विचारवंत, अनुभवी पत्रकार, त्यांचे पूर्वीचे सहकारी असलेल्या डाव्या पक्षातील नेते व समाजाच्या सर्व स्तरातील संविधाननिष्ठ लोक यांनी विविध माध्यमातून व्यक्त केली होती व अजूनही करीत आहेत. मात्र अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या लेखक, साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, निष्पक्ष पत्रकार तसेच अनुभवी नेत्या-कार्यकर्त्यांना प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीचे क्रमांक एकचे शत्रू म्हणून वर्गीकृत केले आहे. त्यांचे भक्त आणि कार्यकर्त्यांनी लेखक, साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरावर निदर्शने केली आहेत तर काहीवर शारीरिक हल्ला सुद्धा केलेला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या राजकरणाशी असहमती दर्शविणाऱ्या लेखक, साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांना प्रकाश आंबेडकरांचे भक्त आणि कार्यकर्त्यांनी सामजिक माध्यमातून ट्रोल करणे सुरु केले आहे. असे लोक कॉंग्रेसचे दलाल आहेत, दलित-बौद्धांच्या स्वतंत्र राजकारणाचे विरोधक आहेत असा शिक्का मारून त्यांच्याविषयी गैरसमज पसरविण्याची मोहीम या ट्रोल्स टोळ्यांनी व भक्त मंडळींनी सुरु केली आहे. यासाठी कॉंग्रेसने आपल्या सत्ताकाळात दलितांवर कसे अत्याचार केले, अत्याचार करणारांना कसे संरक्षण दिले, बाबासाहेबांच्या काळापासून कॉंग्रेसने अनुसूचित जातींशी कसा विश्वासघात केला, कॉंग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत हरविले, कॉंग्रेस पक्ष आरक्षण विरोधी आहे इत्यादी सर्व दाखले दिले जात आहेत. कॉंग्रेसने केलेल्या त्या काळात अनुसूचित जातींच्या संदर्भात केलेल्या पापांचे व पक्षपाताचे समर्थन होऊ शकत नाही ही बाब एकवेळ मान्य करता येण्यासारखी आहे. मात्र याचा अर्थ रा. स्व. संघ-भाजपच्या संविधान विरोधी आणि संवैधानिक राष्ट्र विरोधी राजकारणाला फायदा पोहोचविणारे राजकारण आंबेडकरवाद्यांनी करावे असा होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५२ नंतरचे राजकारण अभ्यासल्यास, कॉंग्रेस पक्ष मजबूर असावा व त्याची जागा दलित,मागास, अल्पसंख्य, आदिवासी आणि पुरोगामी समूहांचे वर्चस्व असलेल्या आंबेडकरवादी, भारतीय संविधाननिष्ठ पक्षांनी घ्यावी ही रिपब्लिकन राजकारणाची दिशा असली पाहिजे असे दिसून येते.यासाठी भारतीय राजकारण हिंदुराष्ट्र निर्मितीचे विशिष्ट राजकीय आणि सामाजिक तत्वज्ञान अंगिकारलेला रा. स्व. संघ-भाजप विरुद्ध कल्याणकारी राज्याची प्रस्थापना करण्याचे प्रमुख ध्येय असलेले आंबेडकरवादी व भारतीय संविधाननिष्ठ पक्ष यांची आघाडी या अक्षावर स्थिरावले पाहिजे. आंबेडकरवादी, भारतीय संविधाननिष्ठ पक्षांच्या वाढीसाठी व विकासासाठी अनुकूल वातावरण हिंदुराष्ट्रवादी रा.स्व.संघ भाजपच्या सत्ताकाळात मिळू शकत नाही. ते केवळ कोणतेही विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक तत्वज्ञान न अंगिकारलेल्या कॉंग्रेसच्या सत्ताकाळातच मिळू शकते. हे समजून न घेता कॉंग्रेस आणि रा.स्व.संघ भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणून कॉंग्रेसला समाप्त करणे व रा.स्व.संघ-भाजपला बळ देणे हे राजकीय शहाणपणाचे नाही ही बाब स्वायत्त आंबेडकरी राजकारणाचा आग्रह धरणाऱ्या आततायी वंचितांनी लक्षात घेतली पाहिजे. (क्रमश:)
सुनील खोबरागडे
स्वतंत्र पत्रकार,
संस्थापक-संपादक दैनिक जनतेचा महानायक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत