संविधान सन्मान च्यानिमित्ताने … !
प्रा रणजित मेश्राम
लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक समीक्षक आहेत
संविधान सन्मान चा जागर हितावह आहे. उद्दिष्टानुकूल जनामनात रुजला तर अधिक हितावह ठरेल. ते ‘ईव्हेंट’ असे गेले तर प्रासंगिक वा थांबते व्हायचे.
संविधान सन्मान म्हणजे नेमके काय हा प्रश्न उठतोय. कारण रोजच्या रोज ते प्रतिकात्मकतेकडे नेले जातेय. संविधानाचे पुस्तकदर्शन, मस्तकपूजन असे ते नेलेय. संविधान सन्मानाची अशी व्याख्या नापास ठरावी.
लोकं कळते झाले आहेत. त्यांना कळते. ते चरते कळप नाहीत. कुणीही हाकावे. हा समारोह विशिष्ट शहरात होतोय. जे ‘हे’ की ‘ते’ चे उगमस्थान आहे. समता की समरसता इथूनच निघाले. म्हणून समारोहाला विचारसभेचे स्वरूप यावे. ते देशभर जाऊ शकेल.
संविधानाचा सन्मान सांगतांना प्रतिकात्मक दृश्यकृती वा वक्तव्ये बटबटीत झालीत. ती प्रतिकात्मक वळणावर नेतात. ‘अरे त्यांना छळू नका रे… ती देवाची लेकरं आहेत.. हरीची जन आहेत..!’ या वळणावर नेतात. दया दाखविणारी. दयेतून प्रश्न मांडणारी.
ती पायाभूत नसतात. निदानदेई नसतात.
इथे दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक हे निर्णय प्रक्रियेत किती .. हा प्रश्न विचारणे आता प्रारंभिक झालेय. मात्र, संविधानिक विचाराचे किती... विचारणे असे जावे. या वर्गवारीचे निर्णय प्रक्रियेत राहुनही संघ विचाराचे असले तर..?
संख्या सांगणे व ओळख देणे यात मुलभूत अंतर आहे. या ८५ टक्के संख्येला चेहरा हवा. अमुकाने तुला फसवलय हे सांगणे मर्यादित झालेय. ओळखीला अस्तित्व द्यावे. हा देश तुझा आहे. तुला सांभाळायचाय. ते नायकत्व घे. ती दुर्दम्यता द्यावी.
जातवर्गाला गोंजारुन काय होईल ? मतपेटी ठळक होईल. उत्तरपेटी रिकामी राहील. ती भरावी. केवळ सवंग भाष्य उत्तर नसते. भाष्यामागे इच्छाशक्ती हवी. ती इच्छाशक्ती लोकांना संविधानिक मनाचे करण्याकडे जावी. ते योजन असावे. उत्तरे तिथे आहेत. केवळ संविधानाचा जप…जपकारा बुडबुडा ठरतो.
अलीकडे विधीमंडळाच्या इच्छेवर (मर्जीवर) देश चालायला लागला. ते बहुमताचे असो वा अल्प बहुमताचे असो. जे असंवैधानिक आहे. देश विधीनियमाने चालतो. संविधान निर्दिष्ट दिशेने चालतो. हे सांगणे लोकजागरण व्हावे. शेवटच्या माणसापर्यंत ते व्हावे. ताकदीने व्हावे. देश ढवळून निघावा. तिथे खरा संविधान सन्मान आहे.
हा देश India that is Bharat (भारत) आहे. संविधानाचा प्रारंभ या ओळीने आहे. प्रारंभाचा मान जपायला हवा.
मने घडवितांना छोटी वा मोठी अशी कोणतीही गोष्ट नसते. उद्दिष्ट स्पष्ट असले की सारे सूचत जाते.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत